मी प्रोबेशनर असतांनाची गोष्ट आहे. एक व्हीव्हीआयपी जिल्ह्याच्या मुख्यालयी येणार होते. साहजिकच त्यांच्या आगमनानिमित्त आणि बैठकीदरम्यान काय व्यवस्था असावी याबाबत जिल्हाधिकारी निवडक अधिकाऱ्यांसोबत अनौपचारिक चर्चा करत होते. मी पण त्यात सहभागी होतो. चर्चेदरम्यान एकाने व्हीव्हीआयपी यांना सकाळच्या नाश्त्याला काय दिले पाहिजे असे विचारले. त्यावर मी पटकन पोहे आणि भजी असं बोलून गेलो. एकतर हिवाळ्याचे दिवस होते आणि पोहे हा चांगला मराठी नाश्ता आहे असा माझा समज होता, अजूनही आहे. मी पोहे हा शब्द उच्चारताच ते मुळचे उत्तर भारतीय असलेले जिल्हाधिकारी फार नाराज झाले अन म्हणाले ” तुम मराठी लोगो को पोहे के सीवा दुसरा कुछ सुझता नही क्या..?”. मी पुढे फार काही बोललो नाही पण पोह्यांबद्दल एखाद्या भारतीय नागरिकाला इतका राग कसा काय असू शकतो बुवा असा प्रश्न मला नक्की पडला.
मस्तपैकी फोडणी दिलेले लुसलुशीत, मऊमऊ, पिवळेधम्म पोहे किती आकर्षक आणि ‘खाऊ’ असतात..?. अशा पोह्यांचा विचार येताच कधी हे पोहे खाऊ असे होते, पण काही लोकं या पोह्यांकडे गणिताचा खडूस मास्तर शेवटच्या बेंचवरील विद्यार्थ्यांकडे ज्या तिरस्काराने बघतो तसे का बघतात हे न उलगडणारे कोडे आहे. धगधगत्या लाईट-लेमन कलरचे (फ्लूरोसंट यलो असं म्हटलं तरी चालेल) प्लेटमध्ये व्यवस्थितपणे ढीग लावलेले पोहे… एका बाजूला चौतकोर हिरवटपिवळ्या रंगाच्या लिंबूची फोड ! अहाहा…! पोह्यांवर सुंदर, मनमोहक आणि अक्षरावर अनुस्वार शोभून दिसावा तशा काळ्याशार मोहरीची नक्षी. हिरव्याजर्द कोथिंबीरीच्या नाजूक पानांची पखरण. एकमेकांत गुंतलेल्या पाच-सहा पोह्यांच्या खाली दबलेला पण स्पष्टपणे दिसणारा हिरव्यागार मिरचीचा तुकडा. अतिशय गरम तेलात तळला गेलेला आणि आधीच्या जर्द गुलाबी रंगाला तळला गेल्यामुळे आलेला थोडा डार्कनेस व सोबत सर्वांग तेलात भिजल्याने तकाकी आलेला टप्पूसा शेंगदाणा आपल्या भावंडासोबत रेज-डीप खेळत त्या पोह्यात दडून असतो तेव्हा काय मजा वाटते..?..वाह..!!! हलकीशी साखरपेरणी आणि चटकदार आंबट लिंबू पिळल्यावर मिक्स करून एक चमचा पोह्यांचा खाल्ल्यावर काय मजा येते हो…!!!. चवीची एव्हढी श्रीमंती असूनही पोह्यांना इतर नाश्त्याच्या पदार्थांच्या तुलनेत लोकं बीपीएल च्या खाली का ठेवतात हे एक आश्चर्यच आहे.
अख्ख्या महाराष्ट्रात जी लग्ने जुळतात त्यात पोह्यांचा खूप मोठा वाटा असतो हे कुणीही मान्य करेल. पोह्यांशिवाय जुळलेली लग्ने फार काळ टिकत नाहीत असा माझा अभ्यास आहे. माझ्याजवळ आकडेवारी मात्र नाही. मुलगी बघण्याचा कार्यक्रम हा पोह्यांशिवाय अधुरा असतो. आजकाल बाहेरून मागवलेले समोसे, रेडिमेड ढोकळा, बर्फीचा तुकडा हे गडी पोह्यांच्या सोबतीला असतात खरे पण यात मानाचे स्थान पोह्यांनाच. मी लहान असतांना आमच्या वेटाळात राहणाऱ्या आमच्या सर्वच भगिनींच्या वधूपरिक्षा कार्यक्रमात भाऊ म्हणून पाहुण्यांना पोह्यांच्या प्लेटी नेलेल्या आहेत. पोहे नाकारणाऱ्या शिष्ट लोकांचा राग माझ्या मनात लहानपणापासूनच आहे असे म्हटले तरी चालेल. ‘अजून एक प्लेट मिळेल का..? किंवा दुसरा फेर पातेल्यातून प्लेटीत टाकत असतांना ‘अजून टाक बेटा थोडेसे..’ असे म्हणणारे डेरिंगबाज पोहेबहाद्दर मला खूप आवडतात. मी अशांकडे कौतुकाने पाहतो. नवऱ्या मुलाने पोह्यांना नकार दिला तर माझ्या तत्कालीन भगिनींना मी हा ‘भाऊजी’ नको किंवा ‘आपल्या बालीला असला बिन-पोह्या नवरा करू नका काका’ असा पोक्त सल्ला दिल्याचे मला आठवते. जे अरसिकतेने हळूहळू चघळत पोहे खातात ते लोकं मला अजिबात पटत नाहीत. पब्लिक टॉयलेटमध्ये गर्दी असतांना जशी बाहेर वाट बघणाऱ्याला बेचैनी असते तसली बेचैनी मला ह्या मुद्दाम वेळखाऊ म्हणजे मंदगतीने पोहेखाऊ लोकांची प्लेट संपवण्याची वाट बघतांना होते. एकदा मी रागाने एका वयस्क पाहुण्याच्या हातातून प्लेट हिसकून आणलेली आठवते, कारण हा शिष्ट गृहस्थ नुसता चघळत होता पोहे. बाकीच्यांचा दुसरा फेर संपला तरी याच्या प्लेटीत अर्धे पोहे शिल्लक होते, मग काय घेतली प्लेट ओढून ट्रे मध्ये. पोहे थंड होण्याच्या आत गपागप खाणे हे पोह्यांचा मान राखण्यासारखे असते, मग कुणी अधाश्या म्हटलं तरी हरकत नाही.
पोह्यांमधले टप्पू शेंगदाणे किंवा हिरव्या मिरचीचे तुकडे चमच्याने बाजूला काढून पोहे खाणारे लोकं हे माझ्यालेखी वर्णद्वेषी किंवा वंशद्वेषी लोकं होत. हे आपल्या सामाजिक किंवा वैयक्तिक जीवनात सुद्धा इतर लोकांशी डिस्क्रिमिनेशन करत असावेत असा माझा अंदाज आहे. अहो… मला सांगा ज्यामुळे पोह्यांना चव आली आहे अशा घटकांना असे बाजूला काढणे योग्य आहे का..? मान्य आहे की मिरची लागते …!.पण तिचा असा अपमान..? सत्ता आली की कार्यकर्त्याना जसं खड्यासारखं बाजूला फेकल्या जातं तसे वाटले का तुम्हाला शेंगदाणे अन मिरच्यांचे तुकडे…? बरं असे करतांना यांना ते अनाहूत अन बाहेरून वेळेवर आलेले बारीक शेव बरे चालतात पोह्यांवर….!!!. काही महाभाग तर नारळ किसून घाला पोह्यांवर असे शहाजोगपणे सांगतात. अशा बाहेरच्यांना पोह्यात स्थान देणाऱ्यांचा मला राग मात्र येत नाही कारण शेवटी पोह्यांना ते वाजवी मान देतात, पोहे आवडीने खातात एव्हढं माझ्यासाठी पुरेसं आहे.
पोह्यांना काही लोकांकडून एव्हढं हिणवलं जातं याचे कारण महाभारतात आपल्याला सापडते. कृष्ण-सुदामा यांची मैत्री आणि भेट आठवा जरा. सुदाम्याच्या पुरचुंडीतले घासभर पोहे खाऊन कृष्ण तृप्त झाल्यामुळे त्या पोह्यांना खरं ग्लॅमर आलं असं कदाचित तुम्हाला वाटत असेल. पण हे ग्लॅमर गरिबीचं आहे. सुदामा बिचारा गरीब असल्याने पोहे पण गरीब झाले. आजही महाराष्ट्रातल्या काही श्रीमंत घरांत पोहे हा केवळ हा गरिबांचा पदार्थ आहे म्हणून बनवला जात नसावा अशी मला शंका वाटते. एव्हढ्यात जे नवश्रीमंत झाले तेसुद्धा चारचौघात पोहे खात नाहीत. मात्र मला डाऊट येतो की आजूबाजूला कुणी नसतांना यथेच्छ पोहे बनवून खात असतील लेकाचे. एखादा साऊथ इंडियन दिसला की मग तो तेलंगी असो की कानडी किंवा मग तामिळ अन मल्याळी दिसला तरी आपल्याला पांढरीशुभ्र रवाळ इडली अन नारळाची चटणी डोळ्यासमोर येते तसं महाराष्ट्री मनुष्य परप्रांतात गेल्यावर समोरच्या माणसाच्या नजरेत पुरणपोळीनंतर लगेच पोहे येत असले पाहिजेत.
पोहे असे गरीब असले तरी महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात पोह्यांच्या कितीतरी तऱ्हा आहेत. पोहे हे कधीचेच घराच्या उंबऱ्याबाहेर पडून कमर्शियल झाले आहेत. नागपूरकडे ‘तर्री-पोहे’ नावाचा प्रकार आहे. सकाळी-सकाळी तुम्ही लोखंडीपूल चौक, कॉटन मार्केट चौक किंवा संत्रा मार्केट, भाजी मार्केट ला गेलात तर मस्त ठेले लागलेले असतात पोह्यांचे. फोडणीच्या पोह्यांचा पिवळा पिरॅमिड एका मोठ्या परातीत खालून उकळत्या पाण्याची वाफ घेत खाणाराची वाट बघत स्वतःला शेकून घेत असतो या ठेल्यांवर. खाणारा आला की ठेलेवाला एक मोठा चमचा पोह्यांच्या ढिगात सराईतपणे खुपसतो. प्लेट मध्ये चोपून बसवतो. एका मोठ्या गंजात ( मोठ्या भांड्याला विदर्भात गंज म्हणतात) उकळत असलेली तिखट चवीची आणि तेलाचा तवंग असलेली चण्याची पातळ उसळ एका वगराळ्यात ( हे उपकरण नागपूरला जाऊन पहावे) घेऊन मस्त पोह्यांवर त्याचा अभिषेक केला जातो. या तेलसंपृक्त तिखट उसळीवरील तवंगाला ग्रामीण वैदर्भीय बोलीत ‘तर्री’ असे नादमय नाव आहे. तिखट अशा चवीचे हे ‘तर्रीपोहे’ भल्या-भल्यांना घाम फोडतात. पुण्यातले पोहे शिष्ट असतात. त्यांना ना चव असते ना दिसायला चांगले असतात. उगाच डाळिंबाचे दोन-चार दाणे टाकून का कुणी चविष्ट होत असतं?. साधी मोहरीसुद्धा टाकत नाहीत हो हे कंजूष..!. हळदीचा वाफारा दिलेले आयुर्वेदिक पोहे खायचे असेल तरच जा पुण्यात पोहे खायला.
कोल्हापूर, सांगली या भागात दडपे पोहे नावाचा कर्नाटकी प्रकार आहे. थंड झालेली फोडणी आधीच पोहे, कांदा, खोबरं अन कोथिंबिरीच्या मिक्स मध्ये ओतायची. नुसती दडपशाही हो. थंड फोडणी थंड पोहे कसं काय जमतं बुवा..? या दडप्यात कधी कधी दुधाचा हात पण लावतात म्हणे……! पांढरा अन तांबडा रस्सा खाणारे, मटण महाग झालं म्हणून आंदोलन करणारे पैलवान गडी हे दडपे पोहे कसे काय खातात देवच जाणे. पाण्यात भिजवून मस्त मॉइस्ट केलेले पोहे खरोखरच्या गरमागरम तेलात तडतडलेल्या मोहरीच्या सहवासात, तेलात न्हाऊन पारदर्शक झालेल्या कांद्याशी हितगुज करत, मिरची शेंगदाण्याशी लगट करत कढईत आयुष्य जगतात ते कुठे अन ही कोल्हापुरी दडपशाही कुठे..? ‘कानडीने केला मराठी भ्रतार’ सारखं हे युनियन अस्सल मराठी पोह्याला शोभत नाही मुळीच. पण मला यांचाही राग येत नाही कारण पोह्यांवर दडपं असलं तरी या लोकांचं प्रेम आहेच. पोह्यांचे दोन प्रकार आहेत. एक जाड पोहे आणि दुसरे पातळ पोहे. आमच्याकडे विदर्भात यांना दगडी पोहे आणि कागदी पोहे असे गुणवाचक विशेषण आहे. अनेकांचा असा गैरसमज आहे की कागदी पोहे हे फक्त चिवड्यासाठी उपयोगात येतात. मुळीच नाही. तुम्ही आम्ही जे पोहे खातो म्हणजे फोडणीचे पोहे पातळ पोह्यांपासून सुद्धा बनवता येतात. फक्त भिजवण्याची कला हवी.
आपल्या शेजारच्या राज्यात म्हणजे मध्यप्रदेशात मात्र पोह्यांना बराच सन्मान आहे. पोह्याला त्यांनी कधी आपल्यासारखं एकटं पाडलं नाही. आपण पोह्यांना कांदेपोहे, बटाटेपोहे एव्हढंच करत ब्रम्हचारी आणि अविवाहित ठेवलं. त्यांनी मात्र जिलबीसोबत पोह्यांचा शास्त्रशुद्ध विवाह लावला. या राज्यात पोहे असे एकटे खाल्ले जात नाहीत. भोपाळ च्या स्टेशनबाहेर किंवा भोपाळचाच भाग असलेल्या हबीबगंज स्टेशन बाहेर पडलात की मस्त ‘पोहा-जलेबी’ चे स्टॉल व त्याभोवती असलेली गर्दी तुमचे लक्ष वेधून घेते. एका वर्तमानपत्राच्या कागदात भरपूर गरमागरम पोहे, खुपसलेला स्टील चा चमचा अन हलकेच वर ठेवलेल्या दोन कलदार जिलब्या …..वाहवा च वाहवा….!. एक बोकना भरायचा पोह्यांचा अन हलकेच दातात जिलबीचा तुकडा तोडायचा. अप्रतिम टेस्ट. इंद्राने हे पोहे प्रकरण जर पाहिलं नं तर उद्या स्वर्गात हे सगळे स्टॉल शिफ्ट होतील याची मला खात्री आहे. मध्यप्रदेशची खाऊ राजधानी म्हणजे इंदौर. होळकर तिथे गेले सोबत मराठी पदार्थ सुद्धा पोह्याच्या रुपात इकडून तिकडे गेले असे वाटते. एखाद्या साधारण पोशाख घातलेल्या माणसाला एकदम अलंकारिक वेशभूषा द्यावी तसे इंदौरी पोहे आहेत. मूळ पोहे तेच, फोडणीसुद्धा तीच पण बडीशेप, शाबूत धन्याचे दाणे आणि हिंग यांचा साज इंदौरी पोह्यांना चढतो. ते लोकं पोह्यांना तीनचार वेळा धुवून काढतात त्यामुळे पोहे अजूनच मऊशार, लुसलुशीत होतात. आपल्याकडच्या पोह्यांचा मेक ओव्हर म्हणजे इंदौरी पोहे. प्लेटीत वाढताना वरून जीरावन (भाजलेल्या जिऱ्याची पावडर) भुजिया शेव, मसाला दाणे असे अलंकार चढवले जातात. सुकुमार व कमनीय देह असलेली ललना जशी अलंकारांच्या ओझ्याने दबून जाते तसे वाटतात मला हे इंदौरी पोहे. एकीकडे सांगली कोल्हापूरचे विनालंकार दडपे पोहे अन इंदोर चे सालंकृत इंदौरी पोहे हा टोकाचा विरोधाभास फक्त पोह्यांतच आढळत असावा.
पोह्यांचे कितीही विरोधक असले तरी माझ्या लेखी पोहे हे त्यांना पुरून उरले आहेत. पोह्यांविषयी उत्कट पोटदुखी असणाऱ्यांना मला सांगावेसे वाटते की “अरे बाबांनो 7 जून हा आपल्या देशात ‘राष्ट्रीय पोहा दिवस’ म्हणून साजरा केला जातो” या अटुकुल्लू ( दक्षिण भारतात पोह्यांना अटुकुल्लू म्हणतात) वर एकोणिसशे साठ साली बॅन आणावा लागला होता असे जर पोह्यांचा तिरस्कार करणाऱ्यांना सांगितले तर विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. त्यावर्षी तांदळाचे उत्पादन कमी झाल्याने तांदळाला चपटे करण्यावर शासनाने बंदी घातली होती. पोह्यांवर अतीव प्रेम करणारे व पोह्यांसाठी प्रसंगी युद्ध करायला तयार असणारांची मोठी फौज आज अस्तित्वात आहे. आजच्या ट्विटरी युगात #PohaOnMyPlate अशी चळवळच पोहेप्रेमींनी चालवलेली आहे. आम्ही पोहे खातो म्हणूनच आम्ही भारतीय आहोत असे या पोहू लोकांचे म्हणणे आहे.भारतीय कृषी उत्पादने जसं जिओग्राफीकल आयडेंटिफिकेशन करून घेतात ( GI मानांकन) तसा इंदौरी पोह्यांचा GI मानांकना साठी अर्ज सुद्धा दाखल झाला आहे. पोह्याशिवाय आयुष्याची कल्पनाच किती मिळमिळीत वाटते हो…!अवधूत गुप्ते यांनी पोह्यांना योग्य सन्मान दिला. सनई-चौघडा या चित्रपटात ‘आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कां….दे ….पो …..हे’ असं जे त्याने लिहिलं अन गायला आहे ते उगाच नव्हे..! मला सगळ्या मानवजातीला परत परत सांगावेसे वाटते की ‘मेरेकू पोहे के सीवा कुछ सुझताईच नही…..!’
विलक्षण खोबरेल तेल
आपल ते सोनं पण ओळखणार कोण? 👉 खोबरेल तेल खोबरे, खोबरेल तेल किती विलक्षण आणि गुणकारी आहे! माझे स्वतःचे कितीतरी गैरसमज दूर...
Read more