माणुसकी
सकाळी सकाळी चहापाणी आवरून जोशी काकू आपल्या तिसऱ्या माळ्यावरील घराच्या बाल्कनीत खुर्ची टाकून बसल्या होत्या. सकाळची वेळ असून देखील बाहेर चांगले कडाक्याचे ऊन पडलेले होते. सोसायटीच्या समोरून जाणाऱ्या रस्त्यावर लोकांची ये-जा चालू होती. फेरीवाले रस्त्यावरून जाता जाता संपूर्ण बिल्डिंगला ऐकू जाईल अशा आवाजात मोठमोठ्याने ओरडून आपल्या मालाची जाहिरात करीत होते. सोसायटीच्या आवारात काही लहान मुले खेळत होती. माळी झाडांना पाणी देत होता. जोशी काकू बाल्कनीत बसल्या बसल्या बाहेरच्या सर्व हालचाली बघत होत्या. अधून-मधून खाली खेळणाऱ्या मुलांना आवाज करू नका असा दम देत होत्या.
वॉचमन नेहमी प्रमाणे गेट उघडा ठेऊन पाणी बघण्यासाठी गेला. गेट उघडाच असल्यामुळे एक मास्क विकणारी बाई सोसायटीच्या आवारात शिरली. एका हातात मास्कने भरलेली पिशवी आणि दुसऱ्या हाताने कटीवर बसलेल्या तान्ह्या मुलाला सांभाळीत जोरजोरात आवाज देऊ लागली.
“मास्क घ्या मास्क …”
जोशी काकूंनी तिला बघितले आणि हाक मारली.
“ये मास्कवाले…वरती ये”
मास्क विकणारी बाई मान वळवून इकडे तिकडे बघू लागली.
“अगं…इकडं इकडं…वरती ये”
मास्कवालीने आवाजाच्या दिशेने वर पाहिले. कडाक्याच्या उन्हामुळे ती घामाघूम झाली होती. कपाळावरून घाम ओघळत होता. वरती मान केल्यामुळे घामाचा थेंब तिच्या डोळ्यात गेला. तिने पटकन मान खाली केली आणि खालच्या मानेनेच उत्तर दिले.
“येते येते…बाईसाहेब”
बिल्डिंगला लिफ्टची सोय नव्हती, त्यामुळे ती मास्कवाली जिना चढून तिसऱ्या माळ्यावर गेली. हातामध्ये मास्कने गच्चं भरलेली पिशवी आणि कटीवर असलेल्या मुलाच्या वजनामुळे तिला धाप लागली. जरासं सावरल्यावर तिने दारावरची बेल वाजवली. जोशी काकूंच्या मुलाने दरवाजा उघडला आणि त्या मास्कवालीला पाहताक्षणी तिचे ऐकून न घेताच “नही चाहिये” असे म्हणुन दरवाजा बंद करून घेतला.
ती मास्कवालीबाई बिचारी रडकुंडीलाच आली. असा पटकन तोंडावर दरवाजा बंद केलेला बघून तिला फार वाईट वाटले. ती फार दुखावली. परंतु नाईलाजाने तिने परत बेल वाजविली. परत मुलाने दरवाजा उघडला आणि तिच्यावर डाफरला.
“अरे नही चाहिये बोला ना”
“पण दादा बाईसाहेबांनी हाक मारून वर बोलावलंय”, त्या मास्कवालीने दरवाजा बंद करायच्या आत सांगून टाकले.
“ठीक आहे…थांब जरा” असे बोलून त्याने दारातूनच विचारले, “आई, तू कोणाला बोलावलं आहेस का?’
“हो हो…आले थांब”, जोशी काकूंनी बाल्कनीतून होकार दिला.
“कशाला कोणाला बोलावतेस? तुला माहित आहे ना सध्याची काय परिस्थिती आहे”, मुलगा त्यांच्यावर जवळजवळ रागवलाच.
“अरे मास्कवाली आहे ती…म्हटले घेते एखादा”, काकू दारात येत म्हणाल्या
“अगं तुला मास्क पाहिजे तर मला सांगायचं ना, आमच्या ऑफिस मध्ये कित्येक पडलेत, आणला असता मी तुझ्यासाठी तिथून”
“अरे तसं नाही, पण म्हटले दारापर्यंत आलीच आहे तर घेते एखादा”.
“ठीक आहे… घे मग”, असे बोलून मुलगा घरात निघून गेला.
“हां, बोल… कसे दिले मास्क?”, पिशवीतील एक मास्क उचलीत काकूंनी विचारले.
“वीस रुपये”
“वीस रुपये? बापरे !! काय मस्करी करतेस कि काय? इतके महाग असतात होय मास्क?”
“होय बाईसाहेब वीस रुपयालाच विकते मी…दुकानात हाच मास्क पंचवीस रुपयाला आहे”
“नाही नाही, वीस रुपये खूप जास्त आहेत. काहीतरी कमी कर”
“नाही बाईसाहेब, वीस रुपये बरोबर आहे”
“काय नाही? वीस रुपये खूप जास्त आहेत. पंधरा लाव”
“नाही बाईसाहेब, पंधराला नाही परवडत, दिवसभर फिरल्यावर दहा पंधरा रुपये मिळतात कसेतरी”
“नाही नाही, वीस रुपये नाही देणार”
“नका बाईसाहेब असं नका करू…बरं अठरा द्या”
“अगं आई मी तुला सांगितलं ना नको घेऊ म्हणून”, मुलगा बेडरूम मधून बाहेर येत म्हणाला.
“ठीक आहे घ्या पंधराला”, मास्कवाली नाईलाजाने म्हणाली.
“मी तर तुला आधीच म्हटले होते, पण तुम्हा लोकांना किटकिट केल्या शिवाय होत नाही, बरं दे एक चांगला काढून”, जोशी काकूंनी इलॅस्टिक आणि शिलाई जोरजोरात खेचून बघितलेला मास्क परत तिच्या पिशवीत टाकीत म्हटले.
मास्कवालीने कटीवरच्या मुलाला सांभाळीत दुसऱ्या हाताने पिशवीतून एक नवा मास्क काढून दिला. जोशी काकूंनी त्याची पण शिलाई आणि इलॅस्टिक तपासून पाहिली.
“चांगला आहे बाईसाहेब, अजून पर्यंत कोणाची काही तक्रार नाही आली”, मास्कवालीने आपल्या मालाची हम्मी दिली.
“ठीक आहे, ठीक आहे. सगळे धंद्यावाले असेच बोलतात. हे घे पैसे आणि पाच रुपये परत दे”, काकूंचा मुलगा तिला वीस रुपयांची नोट देत म्हणाला.
“दादा, पाच रुपये सुट्टे नाहीत. तुमच्या हातची बोहनी आहे”, मास्कवालीने दिलगिरी व्यक्त केली.
“हे तुमच्या लोकांचे नाटकंच असतात, पैसे सुट्टे नाहीत, मग दोन वस्तू घ्या नाहीतर बाकीचे पैसे सोडा”
“दादा असं नका बोलू, खरंच नाही हो सुट्टे”
“ठीक आहे मग सुट्टे झाल्यावर ये”, असे बोलून मुलाने काकूंच्या हातून मास्क घेऊन पिशवीत टाकला आणि वीस रुपयांची नोट परत घेतली.
मास्कवाली स्तब्ध झाली. तिला काय बोलावे हे कळेना. ती त्या मायलेकांकडे बघतच राहिली.
“आई तू असं कुणाला पण नको बोलवत जाऊस. लोकडाऊनचा फायदा घेऊन ह्या लोकांनी लूट माजवली आहे”, मुलगा काकुंवर रागावला.
“दादा मी कुणी चोर भामटी नाहीये, लोकडाऊन मुळे नवऱ्याची नोकरी गेली म्हणून घर चालवण्यासाठी नाईलाजाने हा धंदा करतेय”, मास्कवालीने आपली व्यथा मांडली.
त्यांचा बोलण्याचा आवाज ऐकून समोरच्या घरात राहणाऱ्या भाडेकरू अनिल चव्हाणच्या बायकोने दरवाजा उघडला. मास्कवाली जवळ येऊन विचारले,
“कसे दिले मास्क?”
“वीस रुपयाला एक”
“वीस रुपये? खूप महाग आहे. दुकानात पंधरा रुपयाला आहे. काही कमी कर”
“अगं मला पण अगोदर वीसच म्हणाली होती. भाव केल्यावर पंधराला द्यायला तयार झाली. पण पैसे सुट्टे नाही म्हणून नाही घेतला”, जोशी काकूंनी मधेच बोलून आपली हुशारी दाखवली.
“काय गं, मग माझ्याकडून का वीस मागतेस? मी पण पंधराच देईल”, अनिलच्या बायकोने पण संधीचा फायदा घेतला. अनिल चव्हाण दारात उभा राहून सर्व ऐकत होता. तो पुढे येऊन त्याच्या बायकोला म्हणाला,
“काय मिळेल तुला पाच रुपये वाचवून? काय होईल त्याने?”
“अहो पण भाव तर करायलाच पाहिजे ना, मागितली ती किंमत देऊन कसं चालेल?”
“तुझं म्हणणं मला पटत, पण कुठे भाव करायचा आणि कुठे नाही हे तुला समजायला पाहिजे, त्या बाईकडे बघ, एका हातात इतकी जड पिशवी, दुसऱ्या हातात लहान बाळ आणि ती पाच रुपयांसाठी तीन माळे चढून आली आहे. त्याचा तरी विचार कर…असे कितीच रुपये आपण रोज व्यर्थ खर्च करतो, कधी त्याचा विचार केलास का? मी एक सफाई कामगार आहे. रोज दारू पिल्या शिवाय नाल्यात गटारात उतरू शकत नाही. दारूवर रोज शंभर दीडशे रुपये खर्च होतात.आणि इतक्या घाणीत काम केल्यामुळे मला कधी ही काही ही होऊ शकते. समज मला काही झाले आणि तुझ्यावर अशी वेळ आली तर?”
अनिलचे असे बोलणे ऐकून त्याची बायको काहीच बोलली नाही. तिला त्याचे म्हणणे पटले. पण जोशी काकूंना त्याचा फार राग आला. त्या पटकन म्हणाल्या,
“अहो तुमच्या जिभेला काही हाड आहे कि नाही? असे अभद्र बोलणे तुम्हाला शोभते का?”
“आई तू चल घरात, अशा लोकांच्या तोंडी नको लागायला”, असे बोलून काकूंच्या मुलाने दरवाजा बंद करून घेतला.
“ओ ताई, केवढ्याला आहे ते मास्क वीस रुपयाला ना? द्या दहा, हे घ्या दोनशे रुपये”, अनिलने दोनशे रुपयांची नोट काढून दिली.
“दहा? आणि एवढ्या मास्कच काय करणार?” अनिलच्या बायकोने आश्चर्याने विचारले.
“माझ्या मित्रांना वाटणार…रोज दारू सिगरेट शेअर करतो, आज मास्क करू”
मास्कवालीने दोनशे रुपये घेतले, मास्कच्या पिशवीला आणि आपल्या कपाळी लावले. दहा मास्क काढून अनिलला दिले आणि त्याचे आभार मानले. मास्कची पिशवी उचलून पायऱ्या उतरू लागली. तशी अनिलने तिला हाक मारली,
“ओ ताई, काही पाणी बिनी देऊ का?”
पाण्याचं नाव ऐकून ती बाई थांबली, तिचा गळा सुकला होता, तिला खरोखर पाण्याची गरज होती. उतरलेल्या दोन पायऱ्या परत चढून ती वरती आली. अनिलने तिला बसायला चटई दिली. मास्कवालीने पिशवी आणि बाळाला खाली ठेवले आणि चटईवर बसली. अनिल घरात गेला. त्याचा भरलेला टिफिन एका थाळीत टाकून घेऊन आला. मास्कवालीच्या समोर थाळी ठेऊन म्हणाला,
“घे ताई, भावाच्या घरची चटणी मिरची गोड मानून घे”
अनिलची माणुसकी बघून मास्कवालीचे डोळे भरून आले. तिने डोळ्यांना पदर लावला. तिचे रडणे बघून अनिलच्या बायकोचे देखील डोळे भरून आले. तिला आपल्या नवऱ्याचा फार अभिमान वाटला. मास्कवालीचे रडणे बघून अनिल पुढे येऊन म्हणाला,
“ये ताई, रडायला काय झालं? मी तर माझं कर्तव्यच केलं. खा ते… आणि हो भावोजींना जो पर्यंत नोकरी नाही लागत तो पर्यंत काही लागलं तर हक्काने या भावाच्या घरी ये”
मास्कवालीने मानेने होकार दिला. आणि अनिलच्या माणुसकीला सलाम केला.
– प्रदीप बर्जे