बाराशे रागांचा डेटाबेस आणि सहाशे रागांच्या ऑडिओ क्लिप्स उपलब्ध करून देणारी ‘ओशन ऑफ रागाज्’ ही वेबसाइट म्हणजे संगीतप्रेमींसाठी तसेच अभ्यासकांसाठी एक पर्वणीच ठरली आहे. यामुळे भारतीय संगीतातील सगळी घराणी जवळ आली आहेत. त्याविषयी…
www . oceanofragas . com
अभिजात भारतीय संगीत हे महासागराप्रमाणे विशाल आहे. असं म्हणतात की त्याच्या तळाशी शंख-शिंपल्यांचा सडा पडला आहे आणि प्रत्येक शिंपल्यात एकेक राग आहे. त्यातील काही शंख-शिंपले वेचण्याचा कौतुकास्पद पण तितकाच आव्हानात्मक प्रयत्न पुण्याच्या सुधीर विश्वनाथ गद्रे यांनी केला आहे. प्रचलित तसेच अप्रचलित रागांचा संग्रह करण्याचा त्यांचा मूळ छंद. या छंदाला त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आणि त्यातून बाराशे रागांचा डेटाबेस असलेली आणि सुमारे सहाशे रागांच्या ऑडिओ क्लिप्स असलेली ‘ओशन ऑफ रागाज्’ ही वेबसाइट गद्रे यांनी निर्माण केली.
प्रचलित रागांपासून ते मैफलींमध्ये सहसा गायले न गेल्याने अप्रचलित असलेले अनेक दुर्मिळ राग या वेबसाइटमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. मैफलींमध्ये सहसा गायला जात नसल्यामुळे अमूक एक राग नष्ट झाला असं होऊ नये या भावनेने गद्रे यांनी अप्रचलित रागांचाही समावेश यात केला आहे. कारण भारतीय संगीत टिकणं, पुढच्या पिढ्यांपर्यंत हा खजिना पोहोचणं महत्त्वाचं आहे असं त्यांना वाटतं. हा ठेवा चिरंतन राखण्यासाठीच गद्रेंनी ‘ओशन ऑफ रागाज्’ ची निमिर्ती केली जेणेकरून हा ठेवा कायमस्वरुपी जतन होईल.
टाटा मोटर्स कंपनीतून निवृत्त झालेले गद्रे यांचा हा वैयक्तिक संग्रह वेबसाइटवर आल्यामुळे आता सर्वांसाठी खुला झाला आहे. आपल्या पंचवीस वर्षांच्या संग्रहाचे रुपांतर ‘ओशन ऑफ रागाज्’ मध्ये करण्यासाठी त्यांना दीड वर्ष लागलं. गद्रे सांगतात, ‘माझंही ‘संगीत प्रभाकर’ परीक्षेपर्यंत संगीताचं शिक्षण झालेलं आहे. पण नोकरीमुळे गाण्यासाठी वेळ देता येत नसे याची खंत वाटायची. गाणं पुढे नेता आलं नसलं तरी किमान गाण्याच्या सतत सानिध्यात राहावं म्हणून मग मी संग्रह करू लागलो. माहिती जमा करीत गेलो. ऑडिओ क्लिप्स जमवल्या. शेवटी माझ्या संग्रही एवढी माहिती जमली की आता या माहितीचा काहीतरी उपयोग केला पाहिजे असा विचार मनात आला. संगीत म्हणजे आनंद आहे. हा आनंद इतरांनाही मिळावा असा विचार करीत असताना वेबसाइटची कल्पना सुचली.’
रागाचे स्वरूप कळावे यासाठी लिखित माहिती बरोबरच त्याच्या ऑडिओ क्लीप्स टाकण्यात आल्या आहेत. या क्लिप्समधून रागाच्या स्वरूपाची कल्पना येऊ शकते. काही राग हे गायकांनी गायलेले आहेत तर काही राग वाद्यांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. वेगवेगळ्या धाटणीच्या, अंगांच्या, थाटाच्या, स्वरांच्या रागांची माहिती आणि झलक एकाच वेबसाइटवर उपलब्ध करण्याचे काम या वेबसाइटने केले आहे. त्यामुळे आता अभ्यासकांना, संगीतप्रेमींना रागाची माहिती मिळवणे आणि तो अभ्यासणं सोपं झालं आहे. या वेबसाइटवर सर्च व्हील आहे. तिथे सॉफ्टवेअरच्या मदतीने आद्याक्षर, नावं, स्वरसंख्या, मेलकर्ता, रागांग थाट, राग समय, रागाचे स्वर अशा आठ पर्यायांच्या सहाय्याने राग शोधता येतात. याशिवाय रागांची शास्त्रीय माहिती, त्यांचे महत्त्व आणि त्यांची झलक ऐकायला-पाहायला मिळते. वेगवेगळे राग ऐकले जावेत म्हणून ‘राग ऑफ दी मन्थ’ असा एक उपक्रम या वेबसाइटवर चालवला जातो.
याशिवाय रागांवर आधारित पुस्तकांची सूची उपलब्ध आहे. ऑडिओ क्लिप्स न मिळालेल्या सहाशे रागांची यादी सुद्धा या वेबसाइटवर आहे. गद्रे म्हणाले, ‘अनेकदा लोकांकडे दुर्मिळ ऑडिओ, रेकॉर्डींगचा ठेवा असतो पण त्याचं महत्त्व माहित नसल्यामुळे किंवा ते कसे जतन करायचे हे माहित नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग कालांतराने असा ठेवा नष्ट होतो. हे टाळण्यासाठी तुमच्याकडील सांगितिक ठेवा या वेबसाइटमध्ये समाविष्ट करा असे आम्ही आवाहन करतो.’ महासागराप्रमाणे विशाल असलेल्या भारतीय संगीताची ही वेबसाईट अधिकाधिक परिपूर्ण करण्यासाठी गद्रेंना या कामात इतरांच्या सहभागाचीही अपेक्षा आहे. ते म्हणतात, ‘माझ्या ओंजळीतले शंख-शिंपले मी वेबसाइटमध्ये टाकले आहेत. अशा आणखी बऱ्याच ओंजळी भरून ही वेबसाइट समृद्ध करायची आहे, जेणेकरून इथून पुढे राग अभ्यासण्यासाठी, ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि संगीतप्रेमींना फार शोधाशोध करावी लागणार नाही.
या संकेतस्थळाला आत्तापर्यंत ३० देशातील १,००,००० हून जास्त संगीतप्रेमींनी भेट दिली असून oceanofragas याच नावाने प्ले स्टोर वर अँड्रॉइड अँप या स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे.