‘लता म्हणजे ब्रॅडमन, आशा म्हणजे सोबर्स. अष्टपैलू.’ इति आर. डी. बर्मन.
‘जगात दोनच भोसले झाले. एक शिवाजीराव आणि दुसरी आशा भोसले. बाकीचे नुसतेच बाबासाहेब भोसले.’ इति मी.
‘मला आयुष्यभर एक सल आहे. मी कायम ‘नंबर टू’ राहिले.’ इति आशा भोसले.
‘आमची आशा भन्नाट गाते. मला सगळ्यात आवडणारं तिचं गाणं म्हणजे रोशनचं ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ इति लता मंगेशकर.
मी महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर व परदेशात इतक्या लोकांशी बोलल्यावर माझं असं इम्प्रेशन झालंय आणि ते चुकीचं नाही की आशा लतापेक्षा काकणभर जास्तच लाडकी आहे, पण कमी नाही. हे आशालाही माहित्येय, पण तिच्या हातातला केशरी दुधाचा प्याला ओठांपर्यंत जाईपर्यंत त्यात मिठाचा खडा पडतोच. तो अहेतुकपणे टाकणारी कोण तर सख्खी थोरली बहीण. तिनं काय केलं? काही नाही, फक्त गायली, गायली आणि गायली. लता आधी आली, मोठी झाली व मोठीच राहिली. आम्ही कानसेनांनी स्वेच्छेनं तिची गुलामी पत्करली. आशा हतबुद्ध झाली आणि तरीही दिमाखदार चौकार आणि षटकार मारत राहिली. हार मानणं तिच्या रक्तातच नव्हतं. मास्टर दीनानाथांचं रक्त. तेच थोरलीत होतं, तेच धाकटीत होतं. लता लता असेल तर आशा आशा होती. फक्त आम्ही लताचे होतो आणि आशाचे होण्याचा प्रयत्न करीत होतो. माझे प्रयत्न यशस्वी होताना दिसतायत आता आता..
आशा लताच्या शिफारसीनं, पाठिंब्यानं व प्रोत्साहनानं या क्षेत्रात आली नाही. हे रोपटं स्वतंत्र रुजलं, स्वतंत्र वाढलं व स्वतंत्र फोफावलं. बाजूलाच एक महावृक्ष फोफावला होता. हा ना त्या रोपट्याचा दोष ना त्या वृक्षाचा. सुरुवातीची पाच-दहा वर्षे आशाच्या वाट्याला क्लब डान्सर, सहनायिका व दुय्यम स्त्रीभूमिकांच्या वाट्याला असलेली फुटकळ, उडती गाणी आशानं गायली हा फार मोठा गैरसमज आहे. ‘रामन’मध्ये लताच्या विनोदनं आशाला दहापैकी आठ गाणी दिली होती. ती गाजली नाहीत म्हणून त्यांना उडती व फुटकळ म्हणायचं वाटतं? ‘ठोकर’मध्ये सरदार मलिकनं आशाला आठपैकी सहा गाणी, ‘पापी’मध्ये एस. मोहिंदरनं आठपैकी सहा गाणी व ‘राजमहल’मध्ये पं. गोविंदरामनं सातपैकी सहा गाणी आशाला दिली होती. रोशन (९९ गाणी), सी. रामचंद्र (१३२), खय्याम (९०), हेमंतकुमार (७८), एस. डी. बर्मन (१४०), मदनमोहन (१९०), कल्याणजी आनंदजी (२९७), लक्ष्मीकांत-प्यारेलाल (४८५) या दिग्गजांनी वेचून फालतू गाणी आशाला दिली असं कोणायला म्हणायचंय का?
लता सार्वभौम होती त्या पन्नास ते साठ या हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णदशकाच्या कालखंडात आशा अस्तित्वात अवश्य होती, पण ती नंतर झाली तशी राज्यकर्ती नव्हती. तिला आपला बालेकिल्ला पूर्णपणे गवसला नव्हता. ती शब्द चावून म्हणायची. आवाजात थोडी कृत्रिमता व चोरटेपणा होता. शब्दांची फेक तोकडी पडायची. आवाज गुदमरतोय व मोकळा व्हायला धडपडतोय अशी ऐकताना भावना व्हायची. आत्मविश्वासाचा अभाव हेच याचं संभाव्य कारण दिसतं. एरव्ही इतक्या दाणेदार व पल्लेदार आवाजाच्या मालकिणीला कसली आल्येय डर?
हा आत्मविश्वास तिला ओ. पी. नय्यरनं दिला. शमशाद व गीता दत्त यांना बाजूला सारून आपण ओ.पी.च्या प्रमुख गायिका झालोय या विचारानं तिच्यातली खरी आशा बाहेर आली. तिला मोकळं रान मिळालं. (ओ.पी.कडे लताच्या स्पर्धेचा प्रश्नच नव्हता.) आशाच्या पंखांना गरुडाचं सामर्थ्य देण्याची किमया नि:संशयपणे ओ.पी.च्या ठसकेबाज संगीतानं केली. ओ. पी.नं आशा घडविली हे जितकं खरं आहे तितकंच आशानं ओ.पी.च्या संगीताला चार चाँद लावले हेही तितकंच खरं आहे. दोघांनाही एकमेकांची नितांत आवश्यकता होती आणि कानसेनांना या दोघांची! ‘छम छम छम’ (१९५२) ते ‘टॅक्सी ड्रायव्हर’ (१९७३) या एकवीस वर्षांत ५१ चित्रपटांत ओ.पी.नं आशाला १६२ ‘सोलो’ व १५४ द्वंद्वगीते दिली. त्यातल्या या थोड्यांवर नजर टाका – ‘जाइये आप कहाँ जायेंगे’ (‘मेरे सनम’), ‘आँखों से जो उतरी है दिल में’ (‘फिर वही दिल लाया हूं’), ‘यही वो जगह है’ (‘ये रात फिर ना आयेगी’), ‘आओ हुजूर’ (‘किस्मत’), ‘कुछ तो ऐसी’ (‘कैदी’), ‘छोटासा बालमा’ (‘रागिनी’), ‘आइये मेहरबाँ’ (‘हावडा ब्रिज’), ‘रातों को चोरी चोरी’, (‘मुहोब्बत जिंदगी है’), ‘ये है रेशमी’ (‘मेरे सनम’), मैं शायद तुम्हारे लिए’ (‘ये रात फिर ना आयेगी’), ‘जरासी बात का हुजुरने’ (‘मुसााफिरखाना’), ‘जादूगर सावरिया’ (‘ढाके की मलमल’), ‘बेईमान बालमा’ (‘हम सब चोर है’), ‘छुन छुन घुंगरू बोले’ (‘फागून’), ‘पूछो न हमें’ (‘मिट्टी में सोना’), ‘मेरी जान तुमपे सदके’ (‘सावन की घटा’), ‘चैन से हमको कभी’ (‘प्राण जाये पर वचन न जाये’)…
बघता बघता आशा महाराणी झाली. थोरली आधीच होती.
आशा दत्तपाड्यात (बोरिवलीला) एका लहान घरात राहत होती तेव्हा तिला भेटायला तिची आई-माई आली. आशा तेव्हा घरातील कामे करीत होती. ते पाहून माई म्हणाली, ‘या असल्या कामांसाठी तुझा जन्म झालेला नाही. लक्षात ठेव, तुम्ही महाराण्या आहात.’
ओ. पी. नय्यर कधीही भेटला की तिरकसपणे मला विचारायचा, ‘क्या कहेती है वो पेडर रोड की दो महारानीयाँ?’
गाण्याच्या ‘रॉयल्टी’वरून रफी व लता यांचा वाद विकोपाला गेला तेव्हा लताच्या समोरच रफी मुकेशला म्हणाला, ‘जाहीर है, आप तो महारानी के साथही होंगे.’
‘मैं हूँही महारानी.’ लता उसळून म्हणाली, ‘लेकिन उससे आपको क्या तकलीफ है?’
लता व रफी यांच्या एकापेक्षा एक सरस द्वंद्वगीतांइतकेच (नेमका आकडा ४४७) हे ‘रॉयल्टी’वरून झालेलं द्वंद्व मनोज्ञ आहे.
ओ. पी.व्यतिरिक्तही इतर संगीतकारांकडे आशाची उत्तम गाणी आहेत. (संख्या अर्थातच कमी) नमुना म्हणून ही काही गाणी बघा – ‘दिल श्याम से डूबा जाता है’ ‘संस्कार’ अनिल विश्वास, ‘दिल लगाकर हम ये समझे’ ‘जिंदगी और मौत’ – सी. रामचंद्र, ‘सबासे से कहे दो’ – ‘बँक मॅनेजर – मदन मोहन, ‘निगाहे मिलाने को’ (कोरस) – ‘दिल ही तो है’ – रोशन, ‘पान खाये सैंय्या’ – ‘तिसरी कसम’ – शंकर-जयकिशन, ‘काली घटा छाये’ – ‘सुजाता’ – एस. डी. बर्मन, ‘किस जगह जाये’ – ‘लाइट हाऊस’ – एन. दत्ता, ‘मेरा कुछ सामान’ – ‘इजाजत’ – आर. डी. बर्मन, ‘पिया तू’ – ‘कारवान’ आर. डी. बर्मन, ‘नजर लागी राजा’ – काला पानी’ – एस. डी. बर्मन, ‘दम मारो दम’ – ‘हरे राम हरे कृष्ण’ – आर. डी. बर्मन, ‘मुझे गले से लगा लो’ – ‘आज और कल’ – रवी, ‘मेरे जीवन में आया है कौन’ – ‘प्यासे नैन’ – एस. के. पाल. ‘दिल चीज क्या है’ – ‘उमराव जान’ – खय्याम, ‘झूठे नैना बोले’ – ‘लेकिन’ – हृदयनाथ मंगेशकर, ‘तन्हा तन्हा यहाँ पे जीना’ ‘रंगीला’ – रहेमान, ‘इन आँखो की मस्ती के’ – ‘उमराव जान’ – खैय्याम.
एकदा मी आशाच्या घरी गप्पा मारीत बसलो असताना आशा मला म्हणाली, ‘माझ्या ‘ये है आशा’ या कार्यक्रमात मी तुमच्या ‘माझी फिल्लमबाजी’तले गाजरका हलवा वगैरे किस्से सांगते.’
‘काही हरकत नाही.’ मी म्हणालो, ‘मीदेखील माझ्या एकपात्री कार्यक्रमात तुमची काही गाणी म्हणतो. लोक म्हणतात की, मी जास्त चांगला गातो.
लोक म्हणतात, बाबा!’
आशा खळखळून हसली. इतक्या वैयक्तिक निर्घृण आघातानंतर आशा इतकी निर्मळ व खळखळून हसू शकत असेल तर ती फार मोठी गोष्ट आहे. त्यासाठी सिंहाचं काळीज लागतं. आशा जन्मजात लढवय्यी आहे.
जुग जुग जियो, आशाजी. अशाच लढत राहा, हसत राहा, गात राहा.
म्हणा पाहू –
‘पत्ता पत्ता यहां राजदा है मेरा,
जर्रे जर्रे में रख दी है मैंने जुबाँ
पूछते है सभी मुझसे ये हर घडी
भूल बैठे है क्या प्यारको मेहेरबाँ‘
भूल जाओ जो तुम तो मुझे गम नही है
सभी गम के मारे मुझे जानते है
मैं शायद तुम्हारे लिए अजनबी हूँ
मगर चांदतारे मुझे जानते है…’
– shireesh.kanekar@gmail.com
*********************
पोस्ट शिरीष कणेकर
आजची सावित्री डॉ. सौ.रीना कैलास राठी
शुक्रवार दिनांक 23/2/2024 ची ती काळ रात्र ! काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण सिद्ध करणारी रात्र ! नाशिक...
Read more