सर जमशेदजी टाटा – काय महान दृष्टिकोन आहे बघा! सर जमशेदजी टाटाना सविनय प्रणाम !💐💐💐
– एका विलक्षण मृत्यूपत्राची कथा –
जुनी टीपणे चाळत असताना एक अनमोल टीपण हाती आले. रोमांचित झालो. होतेच ते तसे. वृत्तपत्राचे एक जुने कात्रण. विस्मरणात गेलेले. ते सर्वांसमोर मांडलेच पाहिजे अशी अनिवार ईच्छा झाली. म्हणून हा लेखन प्रपंच. जमशेटजी टाटा – टाटा उद्योग विश्र्वाचे मूळ पुरुष. त्यांचे हे मृत्यूपत्र ! अत्यंत प्रेरणादायी. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ ही संस्था त्यांच्या द्रष्टेपणातून उभी राहिली. संस्थेविषयी ज्यांना माहिती आहे, त्यांना तिचे महत्त्व निश्चित कळते. या संस्थेची आर्थिक व्यवस्था नीट लागावी यासाठी हे विलक्षण मृत्यूपत्र !
मृत्यूपत्रात ते लिहितात, “माझा देश स्वतंत्र होईल. विकासासाठी उत्तमोत्तम प्रशिक्षण मिळालेले तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ मोठ्या प्रमाणावर सिध्द असणे गरजेचे असेल. त्या योगे माझा देश प्रगती करु शकेल. असे प्रशिक्षण देणारी पूर्ण विकसित चांगली संस्था उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा लागेल. सरकार परंपरागत शिक्षणावर खर्च करीत असल्याने अशा संस्थांसाठी पैसा उपलब्ध नसेल, ही जाणीव मला आहे. अशा संस्थेला मी माझा तिसरा मुलगा मानतो. म्हणून माझ्या सर्व स्थावर-जंगम मालमत्तेचा तिसरा भाग संस्था स्थापनेसाठी वापरला जावा…….” विचारांची व प्रत्यक्ष आचरणाची केवढी ही झेप. कर्णाला लाजविल एवढी ही उदारता. कल्पनेच्या पलीकडचे दिव्य काहीतरी. मृत्यूपत्रात दिसतो स्वातंत्र्याचा विश्र्वास. स्वतंत्र देश भक्कम पायावर उभा करण्याचा संकल्प. त्यासाठी कायदेशीर तरतुद करुन ठेवण्याचा व्यवहारीपणा. कदाचित जगाच्या पाठीवर असे हे एकमेव मृत्यूपत्र ठरावे. जमशेटजी टाटांच्या दूरदृष्टीला सलाम !
हा विषय इथेच संपत नाही. आपली नेमकी दिशा टाटांना पक्की माहिती आहे. त्यासाठी काय करावे याचा पूर्ण विचार त्यांनी केलेला आहे. केवळ तांत्रिकता असून चालणार नाही. धर्म आणि विज्ञान हातात हात घालून चालणे गरजेचे आहे हे त्यांनी जाणले आहे. त्यासाठी स्वामी विवेकानंदांना मदतीसाठी ते साद घालतात. आपले उद्दिष्ट पत्राने स्वामीजींना कळवितात. पत्रात ते म्हणतात, “सन्माननीय स्वामीजी, जपान ते शिकागो या समुद्रप्रवासात आपला अलभ्य सहवास लाभला. हे आपणास स्मरत असेल. विज्ञान क्षेत्रात अत्युत्तम शिक्षण देणारी संस्था उभी करण्याचा माझा संकल्प आहे. या संस्थेत तंत्रज्ञान व विज्ञान यांच्या बरोबरीने ‘मानवीय विज्ञान’ या विषयाचे सखोल अध्ययन व चिंतन व्हावे. आणि यासाठी जीवनव्रती घडावेत असा प्रयत्न आहे. यासाठी संस्थेत आश्रम, ग्रंथालय व निवासाची सोय आपण करु शकू. या प्रयत्नातून धर्म व विज्ञान यांची हातात हात घालून प्रगती होऊ शकेल. ‘मानवीय विज्ञान’ महाविद्यालायाचे प्राचार्यपद स्वीकारण्याचा अनुग्रह करावा.’’ विवेकानंदांचा मार्ग वेगळा होता हे आपण जाणतो. परंतु जमशेटची टाटांच्या भविष्याचा अचूक वेध घेणा-या दृष्टीचे दर्शन येथे घडते. जे करायचे ते अत्त्युत्तम, हा ध्यास लक्षात येतो. भारताच्या उज्वल भवितव्यासाठीची धडपड जाणवते. या पार्श्वभूमीवर आपले क्षुद्र राजकारणी . कोणता विचार नाही. एकच विचार भ्रष्टाचार, स्वार्थ. त्यासाठी सत्ता. या निलाज-यांची शरम वाटते. आणि रतन टाटांचे दातृत्व त्यांचा रक्तगुण असल्याची खात्री पटते. ही संस्था आज बंगलोर येथे कार्यरत आहे.
उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!
डोक्यावर सूर्य तापला, उष्णता वाढली की एक नवीन त्रास सुरु होतो. तो म्हणजे उन्हाळी लागणे. उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे आणि...
Read more