काही दिवसापुर्वी माझ्या बाबुजींना अचानक धाप लागु लागली, डॉक्टरांकडून कळाल बहुतेक त्यांना करोना असावा, बाबुजींना आय.सी.यु. मध्ये ठेवण्यात आले आणि स्कॅन रिपोर्ट अनुसार त्यांच्या फुफ्फुसांमध्ये 72% इन्फेक्शन असल्याचे समजले. त्यावरून डॉक्टरांनी माझ्या बाबुजींना पाच दिवसाचे इंजेक्शनचे डोस देणे सुरु केले. कोरोना असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये कोणत्याही नातेवाईकास प्रवेश नव्हता.
इंजेक्शनचा पहिला डोस सुरु झाला आणि ज्या बाबुजींना बोलताही येत नव्हत ते बाबुजी पायऱ्या उतरून आय.सी.यु. सोडुन बाहेर आले. त्यांना कितीही समजवल तरी ते दवाखान्यात राहण्यास तयार झाले नाहीत. हे सर्व झाल्यावर बाबांनी मला फोन लावला व दवाखान्यात बोलावले. मी बाबुजींना एकच वाक्य सांगितले आणि ते वाक्य ऐकताच बाबुजी हॉस्पिटलमध्ये राहण्यास तयार झाले व डॉक्टरांनी त्यांच्या सोबत एका जणास राहण्यास अनुमती दिली.
आणि माझ्या आईपणास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी आम्ही खुप गप्पा मारल्या. मला त्यांचा स्वभाव नवा नव्हता पण त्यांचा हट्ट मात्र खुपच नवा होता. प्रत्येक गोष्ट बाबुजींना खुप प्रेमाने पण थोड्याश्या हुशारीने द्यावी लागत होती. हळूहळू मला समजु लागले की बाबुजींना प्लेटमध्ये खाण्यास दिले तर ते घेतच नाहीत ,पण तेच जर मी म्हणाले की बाबुजी घ्या,एक फोड तुम्ही खा, एक मी खाते तर ते पुर्ण सफरचंद खातात.
आम्ही तेथे पाच दिवस होतो. दिवसा मी तर रात्री माझा भाऊ केशव अशी 12-12 तासांची आमची शिफ्ट. डॉक्टरांनी सांगितले होते की बाबुजींच ऑक्सिजन लेवल सारख तपासा. पण सारख ऑक्सिमिटर लावलं की त्यांची चिडचिड होत होती. म्हणून मी बाबुजींना सांगितलं, ही आहे मछली आणि ही आपली दोस्त आहे, मी माझ काम करते आणि तुम्ही मला सांगत रहा त्यावर काय आकडा येतो. त्यामुळे बाबुजींही आकडा बघण्यासाठी उत्साही होऊ लागले.
आम्ही तिथे घरातल्या सगळ्यांना खुप मिस करत होतो, म्हणून आम्ही लांब असून देखील व्हिडियोकॉल द्वारे सोबतच चहा नाष्टा व जेवण करत होतो.
एखाद्या आईला कसं कळत की तिचे बाळ का रडत? तसच मलाही बाबुजींच्या चेहऱ्यावरील हाव भाव वरून त्यांना काय त्रास होतो आहे हे कळू लागले.
काही ट्रिक माझ्या लक्षात आल्या. साधारणता बाबुजींच ऑक्सिजन कमी होत असेल किंवा त्यांना चिडचीड होत असेल तर मी त्यांना दादी मां विषयी प्रश्न करायचे आणि त्याचे उत्तर देताना त्यांच्या सर्व वेदना नाहीशा होत.
बाबुजी देखील मला तेवढीच साथ देत होते, मी जर म्हणाले की बाबुजी डोळे बंद करा आणि झोपा, तर बाबुजी लगेच डोळे बंद करत. त्यांचा व्यायाम घेत असताना मी ही त्यांच्या बरोबर करत होते आणि सांगत होते, बाबुजी मोठा श्वास घ्या, हळु सोडा , मोठा श्वास घ्या, हळु सोडा .असे दहा वेळा झाले की आम्हीच आमच्या साठी टाळ्या वाजवु.
बाबुजी फोन, टीव्ही कधीच वापरले नाही, म्हणुन त्यांना त्याच कधीच कौतुक नव्हत. आम्ही त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या करत गप्पा मारायचो. दिवेलागणीच्या वेळी आम्ही देवाचे नामस्मरण करायचो. वेळ कसा घालवायचा? म्हणून मी त्यांना इंग्रजीचे काही नवे शब्द शिकवू लागले व तेही डॉक्टर आल्यावर गुड मॉर्निंग डॉक्टर, तर जाताना थॅंक्यू डॉक्टर बोलु लागले .
बाबुजींच्या तब्बेतीत कसा सुधार झाला? तर मी त्यांना एकच प्रश्न चार दिवस विचारले, बाबुजी नाईक सर तुमचे गुरुजी होते ना?, पहिल्या दिवशी फक्त मान हलवत बाबुजी हो म्हणाले, दुसऱ्या दिवशी ते हसून हो म्हणाले, तिसऱ्या दिवशी ते मला गणित शिकवत होते, असे म्हणाले, तर चौथ्या दिवशी, सरांनी मला सहामाई झाल्यावर मधुनच अॅडमिशन दिली, हे देखील बोलले. हा आईपणाचा धडा मला बाबुजींनी शिकवला
आपलं बाळ असलं ना, की त्यानी कितीही त्रास दिला तर आपण सांभाळून घेतो, मग आपल्या वडिलांना फक्त त्यांच्या आजारपणात का सांभाळू शकत नाही?
मला आज घरी सगळे विचारतात की, तु त्या दिवशी त्यांना असे काय सांगितले की ते दवाखान्यात राहण्यास तयार झाले? त्याच उत्तर म्हणजे , मी त्यांना एवढेच सांगितले की बाबुजी, तुमची तब्बेत खरच खुपच खराब आहे आणि तुम्हाला माझं लग्न बघायच असेल तर तुम्हाला येथे रहावे लागेल. मी तुमच्या बरोबर इथे राहणार आहे. आणि एवढ्या एका वाक्यावर ते तयार झाले. सांगायचे तात्पर्य हे की या उतार वयात त्यांना नातवंडाशिवाय इतर काही नको आहे.
आम्ही सगळ्या घरातल्यांना फोन करत होतो आणि जस अक्षय भय्या म्हणायचा, बाबुजी आपला वजन काटा जोरात सुरु आहे. आपला ग्राहक ऑर्डर देतोय, त्या वेळी जी चमक त्यांच्या चेहऱ्यावर येत होती ती अतिशय गोड होती. केशव त्यांच्या बरोबर रात्रभर असायचा. त्यांच्या डोक्यावर थपकी देत त्यांना झोपी करायचा. दर तासाला ऑक्सिजन बघणे हे त्याचं काम . आमच्या इवलास्या मंथनने बाबुजींसाठी स्वत: जाऊन टी शर्ट आणला, हे ऐकताच बाबुजींना अश्रु आवरेनासे झाले. माझ्या वहिनीवर बाबुजींच जीवापाड प्रेम , ह्याच वाहिनी जेंव्हा त्यांच्या कोकीळवाणीत, दिवसातून दोन वेळा बाबुजींसाठी भजन म्हणतात, तेंव्हा बाबुजी; एवढी गुणी नातसुन दिल्याबद्दल देवासमोर नतमस्तक होतात.
मला सांगा, आज आपल्या आजी आजोबांना प्रेमाचे दोन शब्द व आपला वेळा या पलीकडे काही नको आहे, ते जगतातच आपल्यासाठी, मग अशा आजारपणाच्या अवस्थेत आपण त्यांचा हात सोडला तर त्यांनी जगाव तर कुणासाठी?
सगळ्या गावांने मला आणि घरातल्या सगळ्यांना सांगितले की, सृष्टी आणि केशव आजारी पडले तर? पण आमच्या सर्वांचे उत्तर एकच होते की, आम्ही आजारी पडलो तर,औषध घेऊन ठीक होऊ पण आमच्या बाबुजींना आमची गरज आहे. त्यांची सेवा करण्याच सौभाग्य आम्हास प्राप्त झाले आहे, या पेक्षा जास्त सुखाची गोष्ट आमच्या साठी काहीच नाही. आणि आमचे बाबुजी आज अगदी टकाटक होऊन घरी परतले, ह्याचा आम्हा सर्वांना खुप अभिमान आहे.
शेवटच एकच सांगेन, एकत्र कुटुंबाच सुख काय असत? तर बाबुजीं डिसचार्ज होऊन घरी आल्यावर ते जेवावयास तयार नव्हते, तर आम्ही सगळ्यांनी, माझ्या हाताने एक तर घास घ्या असे करत त्यांना जेवण दिले. डिसचार्ज झाल्यानंतरही वेळ कसा जातो याचे आम्हास भान रहात नाही.
ह्या कठीण वेळेत आमचे काही हितचिंतक फोन वरून विचारपूस करत, तर आमचे कर्मचारी माणुसकी जपत पूर्ण प्रेमाने आम्हास लढण्याची ताकद देत.
सुखात सगळेच आपले असतात पण या कठीण प्रसंगात ज्यांनी आमची साथ दिली त्या सर्वाना हात जोडून नमस्कार.
आज की औरतें
आज की औरतेंचाय की तरह कड़क हैंपक पक कर स्वादिष्ट हो गयींज़िन्दगी जीने में माहिर हो गयीं दूध बन कर ससुराल आयी...
Read more