..आज मी अनारसे केले बरं का.. अगदी छान जाळी फुटली.. तळताना एकही अनारसा विरघळला नाही, मोडला नाही की जळाला नाही. हो नाहीतर गूळ कमी पडला की जाळी न पडता त्याच्या टमटमीत पु-या पण होतात काही वेळा.
माझी आई अनारसे, गुलाबजाम असे पदार्थ करताना, कोणाची नजर त्या पदार्थावर पडणार नाही असं बघायची. कधी गुलाबजामचं मळता मळता एखादी शेजीरीण काही निरोेप द्यायला, काही मागायला आली की ती घाईघाईने ते सगळं खवा बिवा झाकून टाकायची. पण तरीही गुलाबजाम तळताना विरघळला की त्या शेजारणीचा उद्धार करायची. ‘पायरव’ झाला म्हणायची. मग तिच्या चेह-यावर प्रचंड टेंशन चढायचं. मग त्या खव्यात हे घाल, ते घाल करून गाडी रूळावर आणायची. गोल गरगरीत लालसर तपकिरी रंगाचे गुलाबजाम पाकात डुंबत पडले की तिच्या चेह-यावरचं टेंशन जाऊन कृतकृत्य भाव यायचा. तसंच अनारशाचं पण. पहिलाच अनारसा विरघळला की तांदूळ भिजत घालण्या पासून अनारसे तळेपर्यंत कोण कोण येऊन गेलं त्याची आधी लिस्ट निघायची. मग गूळाचं प्रमाण कमी जास्त करणं, बाजूला काढून ठेवलेलं कोरडं पीठ मिक्स करणं वगैरे सगळे प्रकार व्हायचेे आणि अनारसे पण रूळावर यायचे.
खरं म्हणजे हे पदार्थ करताना कधी खवा ‘कच्चा पक्का’ असणं, मापात कमी जास्त होणं, अनारशाच्या गूळात पाण्याचा अंश कमी जास्त असणं.. ही कारण महत्वाची असायची. पण त्याचं संशोधन करत बसण्यापेक्षा कोणावर तरी खापर फोडून मोकळ्या व्हायच्या बायका. कढई ठेवताना पण, विशेषत: पाक करताना ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हटलं की त्याच्यावर सगळा भार सोपवून द्यायच्या. पण खरं पहायला गेलं तर हे काही काही पदार्थ किती अवघड असतात करायला. सगळंच परफेक्ट असावं लागतं. ते करताना खरं तर खूप सारे प्रेशर्स असतात बाईवर. घरच्यांपुढे आपलं सुगरणपण अबाधीत ठेवायचं प्रेशर, महागामोलाच्या वस्तू वाया जाऊ न देण्याचं प्रेशर, बिघडलेला पदार्थ मग संपवण्याचं प्रेशर. घरातल्यांचा हिरमोड होइल की काय ते प्रेशर.
अनारशावरून एक गम्मत आठवली. पंधरा एक वर्षांपूर्वी एका दिवाळीत आमच्या आईसाहेबांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं होतं. दिवाळी आटोपल्यावर माझ्या दोन्ही मुलींना घेऊन मी माहेरी गेले. आईने मला गरम गरम अनारसे खाऊ घालावेत म्हणून अनारशाचं थोडं पीठ बाजूला काढून ठेवलं होतं. आमच्या आईसाहेबांना स्वयंपाकात आणि त्यातल्या त्यात वेगवेगळे पदार्थ करण्यात महाउत्साह. अर्थात तिचं करणं पण खूप छान असतं. अगदी निगुतीने, कुठलाही पदार्थ करताना ती अगदी त्याच्या आत शिरून तो करतेय असं वाटतं. म्हणजे करंजी जर भरत असेल तर मनाने त्या करंजीत शिरून आतून पण कुठे चिकटायची राहिली का ते पहातेय असं वाटतं.
तर त्या दिवशी तिने सकाळी सकाळी चहा झाल्याबरोबर लगेच अनारसे तळायचा घाट घातला. अशावेळी मी स्वयंपाकघरात जाणे नच्छो असतं. म्हणून मी मुलींशी, भाच्याशी बाहेर हॉलमधे गप्पा मारत बसले होते. वहिनी आणि आई किचन मधे होत्या. थोड्या वेळाने मुलीला आतून हाक आली, ‘अनारसे घेऊन जा’, म्हणून. ती गेली आणि दोन काळेढूस्स अनारसे प्लेटमधे घेऊन आली. आम्हाला वाटलं पहिला तेलाचा अंदाज नसेल आला, तापलं असेल तेल जास्त. कारण आई वहिनी दोघीही सुगरण, त्यामुळे अगदीच विरळाच घटना म्हणून सगळ्यांनी मिळून ते संकट अर्ध.. चतकोर करून संपवलं. परत वर्दी. मुलगी पुन्हा दोन अनारसे घेऊन आली. हे पण आधीच्या अनारशांचेच भावंडं….काळंकुट्ट. मग मात्र मुलगी हळूच मला म्हणाली, ” अगं, आजी गॉगल लावून अनारसे तळतेय”.. तसे आम्ही सगळे ताडकन उठलो आणि आत पळालो. तर आईसाहेब शांतपणे तिसरा घाणा काळा होण्याची वाट पहात उभ्या. त्याचं असं झालं होतं, वहिनी तिला म्हणाली होती, “तुम्हाला गॅसजवळ जायचं नाहिये. तुम्ही अनारसे नुसते थापून ठेवा, तोपर्यंत मी आंघोळ करून येते”.
पण इकडे दम कुठे! थापता थापताच लगेच कढई ठेऊन तळणं पण चालू..
पण डोळ्यावर नुकतंच ऑपरेशन झालेलं असल्याने गॉगल होता. त्यामुळे तिला रंगाचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे अनारसे काळे होत होते. तोपर्यंत वहिनी आंघोळ आटोपून बाहेर आली आणि ती तळणाची मोहीम तिने हातात घेतली. पुढचे अनारसे मग नॉर्मल झाले.
मला तेव्हा एकच मनात आलं .. कुठल्याही गोष्टीकडे, घटनेकडे पहाताना तुम्ही डोळ्यावर कुठल्या रंगाचा चष्मा लावलाय हे किती महत्वाचं असतं नाही?
©® नीलिमा क्षत्रिय
25 ऑगस्ट 2020