जसजसं गाव जवळ येत होतं, हुरहूर वाढत होती. बसमधून सगळं बदललेलं वाटत होतं. बस स्टॉप आलं आणि लगेच चुकल्यासारखं वाटलं. चुकून दुसऱ्याच बसमध्ये तर बसली नाही ना म्हणून बसच्या पुढे जाऊन नावाची पाटी वाचली. १०-१२ वर्षाआधी तिथे प्रसन्न आणि धामधूम वाटायचं. ज्या बस स्टॉप वरून मी काहीदा कामासाठी प्रवास करायची, ते आज जुनं, पावसाच्या पाण्याने खराब झालेलं होतं. स्वतःला सावरून मी मुलांसोबत ऑटोरिक्षाकडे वळली, आधी बाबा किंवा भाऊ घायला यायचा पण आत्ता भाऊ बिझी आणि बाबांना पायाचा त्रास असल्याने, मलाच घरी जायच होतं. ऑटोवाला जास्तच भाव सांगत होता, त्याला जरा झापल्या सारखाच बोलले, “लहानाची मोठी मी इथेच झाली”. तोही गप्पच झाला. घराजवळ येता येता, मला बोलला, “सॉरी ताई ओळखल नाही , तुमच्या लग्नात खुप मज्जा केली आम्ही”. पैसे घ्यायलाही तयार नव्हता, मी म्हटलं, “पैसे घे, तुझ्या कामाचे आहेत, गाव विसरलंय मला मी नाही!!!”
घराकडे वळली, तर १२ वर्षाआधीच प्रसंग आठवला, जेमतेम लग्नाला एक महिना झाल्यावर माहेरी आले होते मी. व्हरांडा नातेवाईकांनी भरून होता. आईबाबांच्या डोळ्यात पाणी होतं. बहीण, भाऊ आनंदाने हसत होती, शेजारच्या काकू कौतुकाने बघत होत्या. घराशेजारची लहान पोरं ताई आली म्हणत होती, आज ते काहीही नव्हतं!
मी दाराची बेल वाजविली, भावाच्या बायकोने मनात नसतानाही गोडं हसून दार उघडलं. माझे डोळे घरच्यांना शोधात होते तेवढ्यात वाहिनीने सर्वांची चौकशी केली आणि कोण कुठे आहे याची माहिती दिली. आई तिच्या खोलीत आराम करत होती. बाबा बाहेर बँकेत गेले होते. मी मुलांचं आवरत हॉल मध्ये वाहिनीच्या बोलण्याची वाट बघत होती. तेवड्यात भाऊ ऑफिस मधून आला आणि आम्ही गप्पा करत बसलो. वहिनींने बनवलेला पोहा भावासमोर छान झालंय म्हणावचं लागलं. घराचं चित्र पार बदललेलं होतं. मनातल्या मनात मी जुनं घर शोधत होती. जुन्या आठवणी आठवत होती. माझी रूम आता भाऊवाहिनीची होती, ती पूर्णपणे बदललेली होती. मी सामान ठेवलं आणि आईकडे गेली, ती अजूनही झोपलीच होती, तिला आवाज देऊन उठवलं आणि तिच्याशी भरपूर गप्पा केल्या. तिच्यासाठी चहा बनवण्यासाठी मी स्वयंपाक घरात गेले. सगळं बदललेलं होतं, कसबस चहाच भांड भेटलं, चहापत्ती भेटली, साखरेचा डबा मात्र भेटेना, ज्या स्वयंपाक घरात मी नवनवीन पदार्थ बनवायची आणि बाबा आवडीने कौतुक करत खायचे, त्याच स्वयंपाक घरात मला साखरेचा डब्बा दिसेना, शेवटी हैराण होऊन मी वहिनीला आवाज दिला. चहा आई ला दिला तर कळलं ,कि आई आत्ता साखरेचा चहाच घेत नाही, तिने माझ्या ऐवजी वहिनीला हाक मारली आणि दुसरा चहा बनवायला सांगितला…….चुकल्यागत झाल मला.
आईच्या हातच जेवण करण्याचे दिवस संपले होते. वाहिनीच्या हातच जेवण गोडं मानून घेतलं. बाबापूर्वी सारखे गप्पा करत नव्हते. मीही मुलांच्या नादात, तब्बेतीची चौकशी करून मोजकं बोलून झोपण्यासाठी निघून गेली. रात्रभर धड झोपही आली नाही, सतत माझ्या घरचा विचार येत होता, “हे जेवले असतील ना”, “मी गीझर ऑफ केला होता ना”, “अरेरे नळाच्या पाण्याचं बिल भरायचं राहिलच”. असे बरेच विचारांनी मन अशांत झालं होतं. कधी एकदा सकाळ होते आणि मी ह्यांना फोन करते असं झालं होतं. मुलांना झोपूनच ठेऊन मी सकाळी फिरायला निघाली. रास्ता तोच होता पण आभास तो नव्हता. दहावी बारावीत असतांना ह्याच रस्त्यानी मैत्रिणीशी वर्गातल्या गप्पा करत क्लासला जायची पण आज मात्र वाट चुकली होती. तो रास्ता किती बोलका वाटायचं त्यावेळेस जणू रस्त्यावरची सर्व लोक मलाच बघतायेत अस्संच वाटायचं, पण आज तो रस्ताही बदललेला वाटला.
दुपारी वाहिनी सोबत शॉपिंग साठी बाहेर गेले. रस्त्यावर कुणीच ओळखीचं दिसत नव्हतं. गावातली शेम्बडी पोरं मोठी झाली होती. गाव जुनं झालं होतं कि नवीन कळतच नव्हत. जो तो वहिनीला विचारात होता, तिने ओळख करून दिली कि मग माझी चौकशी करायचा. अख्या गावात माझी ओळख मी स्वतःच होती, पण आज माझी ओळख करून द्यावी लागली. ज्या गावात लहानाची मोठीं झाले, जिथला रास्ता न रास्ता मला ओळखायचं, तिथे आज मी अनोळखी झाली होती.
मुलांसोबत आणि घरच्यांनशी गप्पा करण्यात कसेबसे दोन दिवस काढले. शेजारी जाऊन बसाव म्हटलं तर काकू मुलीकडे गेलेल्या आणि त्यांच्या सुनेने धड पाणीही विचारल नाही. मला इकडे तिकडे घेऊन जातांना भावाची आणि वाहिनीची कामे रेंगाळत होती हे लक्षात येत होतं. माझ्या मुलांचे लाड पुरवताना आई बाबांची कसरत चालू होती. आपल्या येण्याने आनंदापेक्षा अडचण झाली कि काय असं सतत वाटत होत. ना TV वर माझी चँनल दिसत होती, ना मी फार बिझी होती, शेजारी पाजारी, नातेवाईकांत कोण वारल, कोण जन्मल, लग्न, बारस, वाढदिवस याच हिशोभही संपला होता. भाऊ, नवरा झाला होता, अणि आई बाबा म्हातारे. माहेरी येण्याची उत्सुकता दोन दिवसात फुस्स झाली होती. सगळीकडे नवीन चेहरे दिसत होते. ना घराघरात मैत्रिणी दिसत होत्या, ना चौकात चिडवणारे मित्र. ज्या परिसरात मन रमायचं तिथं कंटाळा आला होता. मला परतीचे वेड लागले होते. कधी एकदा घरी जाते असं होत होतं. शेवटी सात दिवसाची सुट्टी संपली होती. घरातून निघतांना डोळे भरून आले होते. माहेरहून निघतांना आठवणी ऐवजी माझ्या घरची ओढ होती. मानत वाटलं, अनोळखी लोकांत, अनोळखी गावात, आता माझी ओळखच राहिली नाहीं, मन अगदी सहज बोललं “मी अजूनही ओळखते माझ्या माहेराला पण त्यानेच मला अनोळखी केलंय”. परत येतांना, बस जस जशी गावबाहेर निघत होती मन एकच गाणं गात होतं, जणू काही मला ते चिड़वत होतं,
ये गलियाँ ये चौबारा,
यहाँ आना न दोबारा
अब हम तो भए परदेसी
के तेरा यहाँ कोई नहीं
के तेरा यहाँ कोई नहीं…….
कसं असत ना! ज्या गावात लहानच मोठं होतो, ते गाव एक दिवस अनोळखी वाटतं. ज्या घरात कधीकाळी आपल्याशिवाय पानही हलत नसतं, तिथे आज कुणीतरी दुसरच हुकूमत गाजवत असतं. ज्या गावाचं कधीकाळी आपण अभिमान असतो, तिथेच आज आपण पाहुणे असतो,…….खरंच ओळखीतलं माहेर आता अनोळखी वाटतं.