“मेरे पियाss..
मेरे पिया गए रंगून, किया है वहाँ से टेलीफून
तुम्हारी याद सताती है, जिया में आग लगाती है”
आठवतंय का? शमशाद बेगमच्या आवाजातलं “पतंगा” चित्रपटातलं हे गाणं. हो! त्याच ‘रंगून’ शहरातली हि गोष्ट! १९२७ मध्ये रंगून (तत्कालीन बर्मा – आत्ताचे म्यानमार) शहरातील एका श्रीमंत घराण्यात एक मुलगी ‘सोन्याचा चमचा’ घेऊन जन्माला आली! हो, अक्षरशः सोन्याचा चमचा घेऊनच; कारण त्या मुलीचे वडील सोन्याच्या खाणीचे मालक होते! सुखवस्तू घरातील मंडळींनी त्या मुलीचे नाव “राजामणि” ठेवले. राजामणिच्या वडिलांचा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा होता; त्यासाठी ते वेळोवेळी आर्थिक मदत देखील करीत असत. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित नेते किंवा भारतीय व्यावसायिक ‘रंगून’ ला गेले तर त्यांच्या घरी आवर्जून जात असत.
एकदा गांधीजी या कुटुंबाच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले होते. घरातील सर्वांचा परिचय झाला. राजामणि मात्र कुठे दिसली नाही म्हणून सर्वजण तिला शोधत असता; घराच्या बागेत राजामणि हातात बंदूक घेऊन निशाणेबाजी करतांना आढळली. दहा वर्षाच्या एका मुलीच्या हातात बंदूक पाहून गांधीजींना आश्चर्य वाटले, ते तिच्या जवळ गेले आणि तिला म्हणाले, “बेटी, तुला बंदुक शिकायची काय गरज?”
“इंग्रजांचा खात्मा करण्यासाठी”, आपले निशाणावरील लक्ष जराही विचलित न होऊ देता राजामणि उत्तरली.
“हिंसा हि काही एखाद्या प्रश्नाचे उत्तर नाही मुली… आम्ही सर्वजण अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांचा विरोध करीत आहोत… तुला देखील हातात शस्त्र न घेता विरोध करता आलं पाहिजे,” गांधीजींनी तिला समाजावणीच्या सूरात अहिंसेचे महत्व सांगितले.
“का? आम्ही डाकू, लुटारूंना मारीत नाही? हे इंग्रज आमच्या देशाला लुटत आहेत, त्यामुळे ते लुटारू आहेत! त्या लुटारूंना मारणे हि काही हिंसा नाही”, अतिशय निर्भय आणि स्पष्ट शब्दात राजामणि उत्तरली, “मी मोठी झाल्यावर निदान एका तरी इंग्रज अधिकाऱ्याला शूट करणार!”
गांधीजी अवाक होऊन ऐकण्याव्यतिरिक्त काहीच करू शकले नाहीत.
एके दिवशी राजामणिने नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे भाषण ऐकले… त्यांच्या भाषणाने ती पेटून उठली… गांधीजींची ‘अहिंसा’ आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा इंग्रजांविरुद्ध चा ‘सशस्त्र लढा’; यात तिला नेताजींचा प्रखर विरोध अधिक भावला!
एका सभेमध्ये नेताजींनी लोकांना अपील केले की, त्यांनी इंग्रजांच्या विरुद्धच्या त्यांच्या लढाईसाठी आर्थिक मदत करावी. हे ऐकून सोळा वर्षाच्या राजामणिने आपले सारे सोन्याचे दागिने काढून नेताजींच्या ‘आझाद हिंद सेनेला’ (INA-Indian National Armi- आयएनए) दान केले…. ‘एवढे सारे सोन्याचे दागिने कुणी दिले?’ याची चौकशी करत असताना नेताजींना कळाले की, एका सोळा वर्षाच्या मुलीने हे सर्व दागिने दिले आहेत… अधिक चौकशी केल्यानंतर; ते सर्व दागिने परत करण्यासाठी नेताजी स्वतः राजामणिच्या घरी गेले.
सर्व दागिने राजामणिच्या वडिलांच्या हाती सुपूर्द करतांना नेताजी म्हणाले, “मला वाटतं, आपल्या मुलीने चुकून हे सर्व दागिने आम्हाला दिले आहेत… मी ते सर्व परत करायला आलो आहे.”
खरंतर, राजामणिच्या वडिलांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामासाठी असं दान अनेक वेळा केलं होतं; त्यामुळे त्यांच्या मुलीने जे केलं त्याबद्दल त्यांना अजिबात आश्चर्य वाटलं नाही… नेताजी परत करीत असणाऱ्या त्या दागिन्यांकडे पहात ते फक्त हसले…
तेवढ्यात राजामणि तिथे आली… समोरचा प्रकार पाहून ती रागात उद्गारली, “हे सर्व दागिने माझे स्वतःचे आहेत; वडिलांचे नाही! मी आता ते आपल्याला दान केले आहेत… आणि दान केलेली वस्तू मी परत घेत नाही.”
त्या षोडश वर्षीय मुलीचा दृढनिश्चय पाहून नेताजींना तिची प्रशंसा केल्याशिवाय रहावले नाही… ते राजामणीला म्हणाले, “लक्ष्मी येते आणि जाते; परंतु सरस्वतीचं तसं नाही… सरस्वती म्हणजे बुद्धी! ती आली की परत कधीच जात नाही; तर ती सतत वाढत जाते! तू सरस्वती सारखीच बुद्धिमान आहेस; म्हणून मी आजपासून तुझं नाव “सरस्वती” ठेवतो! त्या दिवशीपासून राजामणि आता “सरस्वती राजामणि” या नावाने ओळखू जाऊ लागली.
परंतु राजामणी एवढ्यावरच थांबली नाही… तिने नेताजींच्या शिबिरात जाऊन त्यांची भेट घेतली… तिला त्यांच्या आर्मी मध्ये सहभागी करून घेण्यासाठी विनंती केली. सरस्वती राजामणि चा निश्चय एवढा पक्का होता की; नेताजी तिला नाही म्हणू शकले नाहीत. तिला ‘आयएनए’ मध्ये समाविष्ट करून घेण्यात आले!
सुरुवातीला सरस्वती राजामणि सैन्याच्या सेवा-सुश्रुतेचं काम करू लागली. परंतु केवळ या कामावरती सरस्वती राजामणिचे समाधान झालं नाही… तिला अधिक जोखमीचं काम हवं होतं. तिची जिद्द आणि बुद्धी पाहून नेताजींनी तिला गुप्तहेराची कामगिरी दिली. इंग्रजांच्या छावणीमध्ये जाऊन तिथल्या बातम्या काढणे आणि त्या ‘आयएनए’ च्या कार्यालयापर्यंत पोचवणे अशी महत्वाची जिम्मेदारी देण्यात आली. अशाप्रकारे सरस्वती राजामणि ही सर्वात कमी वयाची गुप्तहेर ठरली!
खरंतर गुप्तहेराचे काम म्हणजे; सदैव प्राण संकटात ठेवणे! गुप्तहेर जर पकडल्या गेला तर त्याला हाल-हाल करून मारण्यात येतं… शिवाय आपली माहिती शत्रूला जाण्याची शक्यता असते; म्हणून गुप्तहेर जर शत्रूकडून पकडल्या गेला तर त्याला स्वतःच प्राणार्पण करण्याचे आदेश देण्यात आलेले असतात… आझाद हिंद सेनेसाठी आपले प्राण पणाला लावण्याची जबाबदारी या सोळा वर्षाच्या मुलीने हसत-हसत स्वीकारली!
लांबसडक केस कापण्यात येऊन मुलांसारखे छोटे केस करून झाले… मुलींच्या पेहरावाऐवजी मुलाचे कपडे घालण्यात आले… राजामणि आता “मणि” नावाने मुलगा झाला! तसेच वेष बदलून नीरा आर्य, मानवती आर्य आणि दुर्गा मल्ल गोरखा या तीन तरुणी देखील हेरगिरीच्या कामगिरी साठी नियुक्त केल्या गेल्या.
सफाई-कर्मचारी, लाउंड्री-बॉय आदींच्या माध्यमातून आझाद हिंद सेनेचे हे वीर हेरगिरी करण्यासाठी इंग्रजांच्या छावणीत प्रवेश मिळविते झाले… काकदृष्टीने आणि प्रसंगावधान राखून इंग्रजांच्या छावणीतील हालचाली, गोपनीय माहिती, बातम्याच नव्हे तर प्रसंगी शस्त्र देखील नेताजींच्या शिबिरापर्यंत पोचवणे सुरु झाले… सुमारे दोन वर्षे त्यांची हेरगिरीची कामगिरी बिनबोभाटपणे चालू होती… दुर्दैवाने एके दिवशी “दुर्गा” इंग्रजांच्या तावडीत सापडली… तिचे आत्महत्या करण्याचे प्रयत्न विफल झाले.. इंग्रजांनी तिला पकडून जेलमध्ये बंदिस्त केले! आता सारेच बिंग बाहेर येण्याची परिस्थिती निर्माण झाली… दुर्गाला एकटीला इंग्रजांच्या विळख्यात सोडून पळून जाणे सरस्वती राजामणिच्या मनाला पटेना… शेवटी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने धाडस करायचे ठरवले… पुन्हा आपला वेष बदलून; ती दुर्गाला जिथे डांबून ठेवले होते तिथे पोचली… पिनच्या सहाय्याने कुलूप उघडून दुर्गाला सोडवले आणि पहारेकऱ्यांच्या हातावर तुरी देऊन दुर्गासह पसार होण्यात यशस्वी झाली… परंतु लगेचच हि बाब इंग्रज सैन्याच्या निदर्शनास आली… एकच गोंधळ माजला… “लडकी भाग गयी, लडकी भाग गयी” करीत इंग्रजी सैन्याने शोधाशोध सुरु केली… सरस्वती राजामणि, नीरा आर्य आणि दुर्गा जंगलाच्या दिशेने पळत सुटल्या… त्यांच्या मागे इंग्रजी सैनिक लागले… मुली हाताशी येत नाहीत हे पाहून सैनिकांनी मुलींच्या दिशेने गोळ्या झाडल्या, त्यातील एक गोळी सरस्वती राजामणिच्या पायाला लागली… रक्ताळलेला पाय तसाच घेऊन ती खुरडत खुरडत पळू लागली… कोणत्याही परिस्थितीत त्यांना इंग्रजांच्या हातात सापडायचे नव्हते! आझाद हिंद सेनेच्या त्या शूर सेनानी होत्या! आता पळणे अशक्य झाल्याचे पाहून त्या तिघी एका झाडावर चढल्या… गोळीमुळे झालेली भळभळती जखम घेऊन नि उपाशीपोटी त्यांनी तीन दिवस झाडावरच काढले… केव्हढे ते साहस, धडाडी, सहनशीलता, जिद्द, त्याग नि नेताजींवरील निष्ठा!
जंगलातील शोधाशोध थांबल्याचा अदमास घेऊन त्या खाली उतरल्या आणि नेताजींच्या शिबिरापर्यंत पोचल्या. अवघ्या अठरा वर्षाच्या त्या कोवळ्या सरस्वती राजामणिचे धाडस नि जिद्द पाहून नेताजी खुश झाले. तीन दिवस पायात बंदुकीची गोळी घुसून राहिल्याने सरस्वती राजामणि एका पायाने कायमची अधू झाली. तिच्या या साहसाबद्दल नेताजींनी सरस्वती राजामणिला आझाद हिंद सेनेच्या ‘राणी झाँसी ब्रिगेड’ मध्ये “लेफ्टिनेंट” चे पद देऊन तिचा सन्मान केला!
इ. स. १९४५ मध्ये इंग्रजांचा विजय होऊन दुसरे विश्व युद्ध समाप्त झाले… आझाद हिंद सेना बरखास्त करून नेताजींनी सैनिकांना भारतात परतण्याची मुभा दिली… दुर्दैवाने त्याच दरम्यान तैवानमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विमानाला अपघात झाला आणि आझाद हिंद सेनेचे हजारो देशभक्त पोरके झाले!
पुढे दोन वर्षात १९४७ ला हिंदुस्थान स्वतंत्र झाला… या नव्या भारताला सरस्वती राजामणि सारख्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांची गरज उरली नव्हती… भारतीय स्वतंत्रता संग्रामात आपल्या सुखी नि ऐश्वर्यसंपन्न तारुण्याची राखरांगोळी करून घेणाऱ्या अनेक क्रांतीकारकांच्या वाट्याला उपेक्षाच आली! एकेकाळी सोन्याच्या खाणींची वारसदार असलेल्या सरस्वती राजामणि; चेन्नईमधील एका पडझड झालेल्या घरात किरायाने राहू लागल्या… सुमारे पंचवीस वर्षांनंतर मिळालेली स्वातंत्र्य सैनिकांसाठीची मिळालेली तुटपुंजी पेन्शन यावरच त्यांची गुजरान चाले. तशाही परिस्थितीत त्यांनी समाजसेवाच केली… ड्रेसेस शिवणाऱ्या टेलर कडून उरलेल्या कापडाचे तुकडे त्या आणायच्या… त्यांना जोडून-त्याचे कपडे शिवून; ते गरीब नि गरजू लोकांना फुकटात देऊ करायच्या.
दरम्यान स्वातंत्र्यप्राप्तीची पन्नास वर्षे उलटून गेल्यावर; एका शोध पत्रकाराने ‘सरस्वती राजामणिला’ शोधलं… त्यांची माहिती आणि सद्यस्थिती वर्तमान पत्रात छापली… तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय जयललिता यांच्या निदर्शनास ती बातमी आली; पन्नास वर्षानंतर का होईना पण जयललिताजींनी त्यांचा यथोचित सन्मान केला, सरकारी घर आणि भत्ता देऊ केला!
दिनांक १३ जानेवारी २०१८ रोजी नेताजींच्या आझाद हिंद सेनेतील सरस्वती राजामणि या शूर सेनानीने शेवटचा श्वास घेतला!
©शिरीष अंबुलगेकर, मुंबई
चेन्नईमधील छोट्याशा सरकारी घरात आयुष्य काढणाऱ्या सरस्वती राजामणि, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या अनेक ‘अनसंग हीरोज’ चे प्रतिनिधित्व करतात… ज्यांना ना इतिहासाच्या पानांवर गौरवास्पद स्थान मिळाले, ना राजकीय नेत्यांनी लक्ष दिले, ना हि जनतेने त्यांच्या कर्तृत्वाचे गीत गायले!
हा इतिहास आम्हाला कधी शिकवलाच गेला नाही; तो नवीन पिढीपर्यंत पोचला नाही तर कदाचित त्यांना स्वातंत्र्याची किंमत कळणार देखील नाही. आणि मग स्वातंत्र्य म्हणजे केवळ “सत्याग्रह आणि अहिंसेचे बक्षीस” अशीच धारणा बनली जाण्याचा धोका संभवतो.
सरस्वती राजामणि सारख्या देशभक्तांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले… आपण सारे त्यांचे ऋणी आहोत… स्वातंत्र्य दिन साजरा करीत असतांना सरस्वती राजामणि सारख्या देशभक्तांचे कर्तृत्व आणि योगदान सर्वदूर पोचवण्याचे काम केले तरी आपण काहीप्रमाणात का होईना, त्यांचा गौरव करू शकलो असे म्हणता येईल.. “स्पाय गर्ल” सरस्वती राजामणिला ही एक श्रद्धांजली!
जय हिंद!
©शिरीष अंबुलगेकर, मुंबई.
आठवण: माझा ब्लॉग, माझे विचार
(7021309583)