आजार म्हणजे काहीतरी कारणाने शरीराच्या नियमित कार्य पद्धतीत बदल करणारी स्थिती. यात वेगवेगळी लक्षणं शरीरात निर्माण होतात. या आजार निर्माण करणाऱ्या कारणांना प्रत्येक मानवी शरीर वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या प्रमाणात प्रतिसाद देते. यामुळेच सारखा आजार असणारे कुठलेही दोन रुग्ण वेगवेगळी लक्षणं दाखवू शकतात. एवढच नव्हे, तर या आजारांमध्ये लक्षणांची विभिन्न तीव्रता दिसून येते. याचाच परिणाम म्हणजे उपचारांच्या मार्गातील बदल, कालावधीतील तफावत आणि शेवटी साध्य परिणाम अथवा फलित. हे सर्व शुद्ध भाषेत लिहीणे वा समजावून सांगणे तितकेच कठीण आहे जितके आजार आणि उपचारांच्या भविष्याबद्दल आडाखा बांधणे..!!
वैद्यकीय क्षेत्र हे एक शास्त्र आहे. मानवी शरीराचै शास्त्र. जीवनाला जपणारे शास्त्र. मानवाच्या उत्पत्तीपासून आजतागायत मानवी जीवन, जन्म ते शेवटापर्यंतचा प्रवास, ही नैसर्गिक दैवी देणगीच आहे. शिल्पकाराने मानवी जीवन घडवतांना पुढील प्रवास हा नियतीकडे सोपवलेला असतो. त्यामुळेच या जीवनाच्या रक्षकांची लढाई असते ती नियतीशी. वैद्यकीय शास्त्र, डाॅक्टर्स ही लढाई लढतांना आपले सर्वस्व पणाला लावतात. आणि म्हणूनच कोरोना सारख्या महामारीत एकट्या भारतात दोन हजारांहून जास्त डाॅक्टर्स लोकांवर उपचार करत, नियतीशी लढत आपले प्राण देतात. हे शब्द नाहीत, वस्तुस्थिती आहे. याचा उहापोह करण्याचे कारण म्हणजे तिन्ही लोकांतील बलवान अशा नियतीबरोबर लढा देणारे वैद्यकीय क्षेत्र हे एक शास्त्र आहे, या सत्त्याची लोकांना जाणीव करुन देणे..!!
आजारांविषयी सांगायचे म्हणजे, यात काही प्रमुख प्रकार असतात. जंतुसंसर्गातून होणारे इंफेक्शन्स, शरीरातील काही कमतरतेमुळे होणारे आजार, अनुवांशिक आजार आणि शेवटचे म्हणजे शारीरिक अवस्थेमुळे होणारे आजार. यात प्रकारानुसार, व्याधीनुसार, प्रतिसादानुसार, इतर गुंतागुंती नुसार उपचारांची दिशा ठरत असते. काही आजार हे अनुवांशिक असतात, काही गुणसुत्रांच्यात जनुकीय बदलामुळे असतात. या काही आजारांवर कायम असा तोडगा नसतो. या आजारांची लक्षणं, परिणाम यांना आपण काबूत ठेवू शकतो. रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार हे काबूत ठेवणे महत्वाचे असते. अन्यथा ह्या आजारांचा परिणाम इतर अवयवांवर होऊ शकतो. औषधोपचार घेतांना तज्ञ मंडळींच्या सल्ल्यानुसारच घेणे योग्य आहे. तब्येत, आजार आणि उपचार यांत हेळसांड नसावी.
आजकाल कुठल्याही आजारांवर खात्रीशीर किंवा गॅरेंटी सहीत उपचारांच्या जाहिराती दिसून येतात. कधी अस्मितेच्या नावावर तर कधी इतर कारण दाखवून लोकांना भुरळ पाडण्याचा प्रकार सर्रास दिसून येतो. कुठले तरी औषध कुठल्यातरी प्राॅडक्टची, मालाची अशी जाहिरात केली जाते की जणू दैवी देणगीच असल्याचा आभास निर्माण केला जातो. असाध्य रोग साध्य करण्याच्या खोट्या भुरळ पाडणाऱ्या जाहिरातींमुळे लोक फसतात. लोकांच्या मनात या प्राॅडक्ट्स विषयी असे विचार बिंबवले जातात की जनता यांना दैवी चमत्कारच मानू लागते. खोट्या जाहिरातींमधून लोकांच्या मनातील नैसर्गिकपणे असणाऱ्या भावनांशी खेळ केला जातो. यातुन आपल्याच कुठल्यातरी मालाची जाहिरात केली जाते. या चुकीच्या आणि असुरक्षित पद्धतींवर जनहितार्थ आळा घालण्याचे सोडून उलटपक्षी त्याकडे कानाडोळा करण्याचे महान कार्य आपल्याकडे चालते. हे करतांना देशातील जनतेच्या भावनांशी खेळ केला जातो. अजाण आणि आजारामुळे भावनिक झालेल्या रुग्णांना चुकीचे मार्गदर्शन करणे हे अत्यंत चुकीचे आहे. ह्रदयरोग, मधुमेह, कर्करोग, रक्तदाब असले आजार जादूगारासारखे बरे करण्याचे दावे लोक भावनेपोटी स्वीकारतात. त्यात त्यांना आशा दिसते. आजाराचे स्वरूप, गुंतागुंत आणि पुढील काळात काय होण्याची शक्यता असेल हा सर्व कौन्सिलिंगचा भाग असतो. पेशंट आणि नातेवाईकांना या सर्व गोष्टी शास्त्रीय दृष्ट्या कळेल अशा भाषेत स्पष्टपणे समजवणे अतिशय महत्त्वपूर्ण असते. परंतू हे होतांना बर्याच गोष्टी मानवी मन स्विकारत नाही. असे हळवे मन जिथे चांगलेच ऐकावयास मिळते तिकडे आकर्षित होते. हा मानवी मनाच्या भावनेचा नैसर्गिक प्रतिसादच असतो. पण अशा मानवी भावनांचाच गैरफायदा घेऊन चुकीचे अशास्त्रीय दावे करुन आपला व्यवसाय पुढे रेटणे, खोट्या जाहिराती करणे हे घृणास्पद आहे. आणि अशा मंडळींना आपल्याकडे घरजावयाप्रमाणे जपणे ही त्याहून मोठी घोडचूक आहे.
लोकांना खरे काय, शास्त्रीय काय याचे ज्ञान देणे आवश्यक आहे. जेणेकरून खोट्या जाहिरातींना आमिषांना बळी पडणे कुठेतरी कमी होईल. आज जग वेगाने पुढे जात असतांना आपण भंपकगिरीला वाव देणे ही भविष्यातील धोक्याची घंटा ठरेल.
डाॅ. मंगेश पाटे
(Please share unedited)