आमटी ही सर्व जोशी-कुलकर्णी कुलोत्पन्न मंडळींची कुलस्वामिनी!
रोजच्या भोजनात आमटी भात हवाच!
माझे वडील तर जेवणात पिठलं भात असलं तरी विचारायचे,
‘आमटी नाही केल्ये का?’
आणि मोठ्या भावाचा तर वधू परीक्षेत ठरलेला, एकमेव, सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे, ‘आमटी येते ना करता?’
म्हणजे बाकी काही नाही आलं तरी,
आमटी ही एक जीवनावश्यक गोष्ट आली की झालं.
आमटी आहे मात्र खरचं,
बहुगुणी, बहुरसदार. शाकाहारी मंडळींसाठी प्रोटिन्सचा पुरवठादार!
माझ्या आजोबा, वडील आणि भाऊ या सर्व पुरुषांना एकमेव पदार्थ नीट करता यायचा, तो म्हणजे आमटी.
आंबट, गोड, तिखट, खारट आणि तुरट या सर्व रसांच मिश्रण म्हणजे आमटी.
आमच्याकडे आमसूलच वापरतात, चिंच वर्ज्य. बाकी नेहमी लाल तिखट घालून तर चव पालट म्हणून कधी हिरवी मिरची.
कुलस्वामिनी म्हणजे तूरडाळीची , आमसूल , लाल तिखट आणि गूळ व ब्राह्मणी गोडा मसाला घालून केलेली आमटी.
मग गावोगावच्या वेगळ्या देवी म्हणजे इतर डाळी आणि इतर बदल.
मोठी मामी कधीतरी करायची ती गरम मसाला घालून आणि पुरणपोळी झाली की त्यासोबत केली जाते ती कटाची आमटी.
अगदी दीड किलो सर्फ बरोबर एक लक्स फ्री.
छान उकळी फुटली की आमटीचा एक व्यवच्छेदक वास दरवळू लागतो.
मग वरून मस्त फोडणी देताना चुरचुर आवाज येतो, तो पुढच्या मेजवानी ची वर्दीच.
आमचं एक छोटं लोखंडी कढलं होतं. आमचे आजोबा ते पूर्ण बुडवायचे आमटीत. मस्त खमंग फोडणी व्हायची आणि थोडासा धूर मिश्रित एक खमंग वास यायचा.
वर म्हणायचे, “लोह जावं पोटात”. म्हणून जणू हे त्या छोट्या कढईचं स्कुबा डायविंग.
कधीमधी मूग डाळी च्या आमटीला लसणीची फोडणी. आणि आता पुढच्या पिढीनं नवीन अंतर्भाव केलेल्या मिश्र डाळी, पंचरंगी आणि किंवा कडधान्य घालून केलेल्या विविध प्रकारच्या आमट्या.
हे म्हणजे विविध पोषाखातल्या बार्बी असतात पण आपली मात्र आवडती बालपणातली जुनी ठकीच, तसंच काहीसं.
आजोळी कोकणात सकाळची न्याहारी म्हणजे तूप, मीठ घालून केलेला मस्त गुरगुरीत मऊ भात.
आदल्या रात्री उरलेल्या आमटीला मस्त कांद्याची फोडणी द्यायची मामी.
त्या कांद्याच्या आमटी साठी नंतर नंतर तर आम्ही सगळे आवर्जून सांगायचो रात्री जास्त आमटी करायला.
ताज्या आमटीला ती चव येत नाही ना, कितीही कांद्याची फोडणी दिली तरी.
अजून एका अवतारात आमटी खूप लोकप्रिय आहे, आमच्यात ती म्हणजे आमटी आणि ताक यांचं मिश्रण. भल्याभल्या कॉकटेल ना मागे सारतं हे आमटेल !!
आणि या साऱ्या आमटी ने जन्म दिला माझ्या आवडत्या ब्रेकफास्ट डिश ला, ते म्हणजे ‘आमटी चे घावन!’
पुन्हा एकदा रात्री आमटी उरली की दुसरी दिवशी तिचा पुनर्जन्म होतो.
तांदळाचं किंवा डाळीचं पीठ मिसळून मस्त मऊसूत घावन घालायचे. काही नको अतिरिक्त. मी तर गरमगरम नुस्ते घावनच खातो, तोंडी लावायला लोणचं नको की चटणी.
अहो, पाच रसाने परिपूर्ण असलेली ती आमटी!
पंचेंद्रियां ना तृप्त करते ती आमटी!
स्वतःच्या पहिल्या जन्मात, पुनर्जन्मात ,विविध रुपात आहुती देऊन ,मनुष्य पामराला मोक्षाचा मार्ग दाखवते ती आमटी!
आत्ताही स्वयंपाक घरातून तो गंध दरवळू लागलाय.
या मर्त्य जीवाला, गरमगरम भात आणि आमटी चा भुरका, म्हणजे जिवंतपणी स्वर्गप्राप्ती !!
देवा, काय देऊ तुला
आमटी दिली तू मला…
लेखकः असाच एक आमटीभोक्ता!