डॉ.प्रज्ञावंत देवळेकर यांची ही पोस्ट ‘सफर विज्ञानविश्वाची‘ ग्रुपवरून…
____________
पालिकेचे फोन ‘ब्लाॅक’ करत ‘होम क्वारंटिन’चा शिक्का पुसून ‘कोविड’ पेशंट सर्रास फिरतायेत अश्या आशयाची वृत्तपत्रातली बातमी वाचनात आली आणि डे टू डे मेडिकल प्रॅक्टिसमधल्या अनेक व्यक्ती-घटना-अनुभव आठवले..
अश्याच संदर्भाची एक ऐतिहासिक केसही आठवली..
एका उच्चभ्रू अमेरिकन बेटावर एका श्रीमंत कुटूंबातल्या मुलीला तापानं घेरलं..निदान झालं ‘टायफाॅईड’
त्याच आठवड्यात तिच्या घरात आणखी पाच जणांना तशीच लक्षणं दिसून आली..
साधारणपणे गरिबी व अस्वच्छता असलेल्या ठिकाणी होणारा आजार इथं आलाच कसा?कुटूंबप्रमुखानं तज्ज्ञांना पाचारण केलं..
या संसर्गजन्य आजाराची कारणं शोधण्याची मोहीम सुरू झाली..पिण्याचे पाणी-टाॅयलेट-मैला-मूत्र-टाक्या-आऊटहाऊस सगळीकडं कसून शोध घेण्यात आला पण संसर्गाचं उगमस्थान सापडलं नाही..
बाहेरून येणारे पदार्थ जसं दुध-मासे-किराणा हे ही तपासलं गेलं अनेकांवर संशय व्यक्त केला गेला पण त्यांच्या संपर्कातलं कुणीही आजारी पडलं नव्हतं..
स्थानिक आरोग्य खात्यानं तसा अहवालही दिला पण घरमालकाचं समाधान काही होईना..त्यानं न्यूयॉर्क शहरात आपल्या मित्रमंडळीकडे चौकशी करून कोणी तरी जाणकार पाठवण्याची मागणी केली आणि त्यातच एका रेफरन्सवरून दाखल झाले डॉ.जॉर्ज सोपर नावाचे आरोग्य खात्याचे एक सॅनिटरी इंजिनीअर…
डॉ.सोपर यांनी पेशंटच्या तपासण्या बाकीचे अहवाल नजरेखालून घातले,सगळ्यांची कसून चौकशी केली
सगळ्यांची यादी बनवली पुन्हा एकदा तपासण्या केल्या पण ‘कुणाचाही संबंध नसल्याचा निष्कर्ष’ आला..
बारीकसारीक दुवे तपासूनही उलगडा होईना म्हणून
डॉ.सोपर यांनी उलट्या मार्गाने जाण्याचे ठरवलं..
तापाची लागण होण्यापूर्वीच्या आजार जे दहा ते चौदा दिवस घेतो त्यापुर्वीच्या गोष्टींवर लक्ष्य केंद्रीत केलं..
त्यादरम्यान एक बदली स्वयंपाकी येऊन गेल्याचं कळलं स्वयंपाकीण बाईचं नाव होतं ’मेरी मेलॉन’
सोपरना या महिलेचं वर्णन देण्यात आलं त्यांनी चौकशी सुरू केली..
चांगला स्वयंपाक बनवते-थोडी अस्वच्छ आहे-अबोल आहे-चिडकी आहे संमिश्र माहिती मिळत गेली..
सोपरनी ज्या ज्या लोकांकडं तिनं काम केलं याचा शोध घेत जवळपास दहा वर्षांचा इतिहास-भुगोल गोळा केला आणि त्यांना सत्य गवसलं..युरेकाऽऽ
मेरीनं जिथं जिथं काम केलं होतं त्या त्या घरात टायफाॅईडचा उद्रेक झाला होता पण हिला शोधायचं कुठं?
तिचा मागोवा घेत असताना मेरीनं एका ठिकाणी काम केलं होतं तिथं चौघांना अचानक हा आजार झाला होता. त्या आधीच्या सुटीत एके ठिकाणी सात जणांना बाधा झाली होती..
या सगळ्याचं खापर शहरातल्या अस्वच्छतेवर फोडलं गेलं होतं..
तरी सोपर यांचं काम एखाद्या गुप्तहेराप्रमाणं चाललं होतं
न्युयाॅर्कमधल्या एका कुटूंबामध्ये टायफाॅईडच्या केसेस सापडल्या त्यातल्या एका तरुणीचं निधन झालं,तिची शुश्रुषा करणारी नर्स आजारी पडली हे वृत्त सोपर यांच्या कानावर पडलं आणि ते तडक तिथं पोहोचले त्यांनी स्वयंपाक्याला बोलवण्याचा आदेश दिला..स्वयंपाकीण हजर झाली..वर्णन मेरीशी मिळतंजुळतं होतं सोपरनी आवाज चढवत विचारणा केली ‘शी वाॅज मेरी मेलाॅन..’
‘टायफाॅईड’ हा संसर्गजन्य आजार साल्मोनेला टायफी या सूक्ष्मजंतूंमुळं होतो..ज्या अन्न व पाण्यात माणसाची विष्ठा व मूत्र मिसळले गेले आहे ते पोटात गेल्यावर हा ताप येतो थोडक्यात ‘दूषित पाणी’ हे अशा संसर्गाचे मूळ आहे..
या शिवाय ज्या लोकांच्या शरीरात या तापाचे जंतू ठाण मांडून बसलेले असतात तोपर्यंत ते तुम्हाला हा ताप देऊ शकतात..काही पेशंट आपल्या विष्ठेतून ताप आल्यावर पुढील तीन महिने तापाचे जंतू बाहेर टाकत टायफाॅईडचे कायम वाहक बनतात..
त्यांच्या शरीरातील पित्ताशय-पचन नलिकांमध्ये हे जंतू एखाद्या भाडेकरू किंवा पेंशनरांसारखे ठाण मांडून राहतात…
‘मेरी मेलॉन’ ही अशा आयुष्यभराच्या वाहकांपैकी एक होती..
ज्या महिलेचा आपण गेले काही महिने शोध घेत आहोत तिच्यासमोर आज आपण खरोखर उभे आहोत यावर क्षणभर डॉ.सोपर यांचा विश्वास बसत नव्हता पण त्यांचा उत्साह-चिकाटी-कळकळ उपयोगात आली नाही..
मेरीनं विनामूल्य वैद्यकीय चाचणीला साफ धुडकावून लावलं..ती आपलं काम करत राहिली.
‘मेरीला तत्काळ ताब्यात घेण्यात यावं’ अशी शिफारस करत सोपरनी हे प्रकरण शहराच्या आरोग्य अधिकाऱ्याकडं सोपवलं..
आरोग्य खात्यानं मेरी काम करत असलेल्या घराजवळ एक रुग्णवाहिका पाठवली-पोलिसांनी घराला गराडा घालत सुटकेचे मार्ग बंद केले आणि महिला डॉक्टर व महिला पोलिसांनी नाईलाजानं मेरीला जेरबंद केलं..
मेरीला आता न्यूयॉर्क आरोग्य खात्यातील प्रयोगशाळेच्या ताब्यात देण्यात आले.त्यांना जे नमुने हवे होते ते मेरीला द्यावे लागले..
तिच्या विष्ठेच्या पहिल्याच नमुन्यात टायफाॅईडचे जंतू असल्याचे आढळले..तिच्या पित्ताशयात जंतूंचे आगर असल्याचं लक्ष्यात आलं..
मेरीनं पित्ताशय काढून टाकण्याच्या सल्ल्याला टोलवून लावलं..
शेवटी गुन्हेगार नसली तरी एखाद्या कैद्याप्रमाणं तिला एका बेटावर विभक्त करण्यात आलं..अनेक उपचार झाले पण मेरी मेलॉन शेवटपर्यंत टायफाॅईडच्या जंतूंची आगार बनून राहिली..
वकिल-मानवी हक्कवाले-पत्रकार-चर्चा यामुळं मेरी त्याकाळची ‘रिया चक्रवर्ती’ बनली होती..एका बाजूला सहानुभूती दुसऱ्या बाजूला तिरस्कार अश्या टोकाच्या प्रतिक्रिया उमटत होत्या..
एकानं तर ‘तिच्याशीच विवाह करेन’ असं जाहिर केलं होतं..तिनंही ख्रिश्चन समाजाचा दाखला देत मला अशी गुन्हेगारासारखी वागणूक नको अशी न्यायालयात दाद मागितली कधी ती फेटाळली गेली तर कधी सहानुभूतीनं विचार केला गेला शेवटी ‘स्वयंपाक्याचं काम करणार नाही’ आणि नियमित आरोग्य तपासणीसाठी हजर राहीन या अटीवर मेरीला मुक्त केलं गेलं..
मेरीनं हळूहळू आरोग्य खात्यात हजेरी लावणं बंद केलं आणि गायब होत खोटं नाव धारण करून मिळेल त्या पगारावर काम पत्करत आपलं कुकींगचं काम सुरु केलं..अनेक दिवस तिनं गुपचूप हा कारभार केला
पण तेवढ्यात मॅनहटनच्या स्लोन हॉस्पिटलमध्ये टायफाॅईडचं संकट ओढवलं..डॉक्टर्स-नर्सेस सगळे मिळून पंचिवेसक लोकं तापाने आजारी पडले त्यातल्या दोघांचा बळी गेला.
सोपर पुन्हा कार्यान्वित झाले त्यांनी स्लोनच्या स्टाफचं मस्टर मागवलं त्यातली एक स्वाक्षरी मेरीच्या हस्ताक्षराशी जुळत होतं..
पुनःश्च पोलिसांना पाचारण करण्यात आलं..पण यावेळी मेरी थकली होती..तिचं वय झालं होतं..
तिला सततच्या लपंडावाचाही वीट आला होता..
त्या मानानं तिला आता आयसोलेशन म्हणून ठेवलेलं नॉर्थ ब्रदर बेटावरचं वातावरण बरं वाटलं..
पुढची तेवीस वर्षे मेरी मेलॉन तेथेच राहिली तिथं तिला प्रयोग शाळेत तांत्रिक सहाय्यकाची नोकरी देण्यात आली पण अखेरपर्यंत तिने ‘आपण टायफाॅईडच्या साथीचे कारण होतो’ हे कबूल करण्यास नकार दिला.
मेरीला हृदयविकाराचा झटका आला ती हळूहळू अंथरुणाला खिळली आणि त्यातच गेली तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मोजून नऊ व्यक्ती हजर होत्या..
‘टायफाॅईड मेरी’ नावानं जिवंतपणी आख्यायिका झालेली मेरी दोषी होती-गुन्हेगार होती असं बिल्कुल नाही पण साथीच्या आजारात इतरांच्या अंगाशी येईल असं तिचं वागणं समर्थनीय नक्कीच नव्हतं..
तेव्हा आपण सगळे या पॅंडेमिकला सामोरे जातांना ‘आपल्यामुळं दुसरा कुणी अडचणीत येऊ नये आणि बेदरकार वागण्यामुळं तरी आपल्या नावापुढं ‘कोविड’ लागू नये’ याची काळजी घ्यायला हवी!
#ByPradnyawant
-©डॉ.प्रज्ञावंत देवळेकर