चांगल्या सुखद आठवणीत जीवन जगावे म्हणतात. या आठवणी म्हणजे मनाचे औषधच. आजचा दिवस हा असाच मनाला उभारी देणारा. आजच्या दिवशी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००७ साली T20 क्रिकेट मधील विश्वचषक जिंकला होता.
समस्त जगातील लोकांच्या आनंदी जीवनात क्रिकेटचे मोठे योगदान आहे. भारतीयांचा तर हा सर्वाधिक आवडता खेळ. भारतीयांचे जीवन तर क्रिकेटने नेहेमीच आनंदी केलेय. जणू दुःखाला दूर सारण्याची क्षमता क्रिकेटमध्ये आहे. क्रिकेटने या देशाला एकसुत्रात जोडण्यातही मोलाची मदत केलीय. विविध भाषांमध्ये.. प्रांतामध्ये प्रेम निर्माण केलेय. गरीब असो वा श्रीमंत.. सुशिक्षित असो वा अशिक्षित.. लहान असो वा वृद्ध, देशातील समस्त लोक या क्रिकेटचा आनंद लुटतात.
क्रिकेटमध्ये धर्म.. भाषा.. प्रांत भेदभाव ठाऊकच नाही. देशातील खेळाडूंना क्रिकेटने आणि क्रिकेटने लोकांना प्रेमाने सामावून घेतलेय. खेळाडू तर देशवासीयांच्या गळ्यातील ताईत झालेत. जेव्हा केव्हा भारतीय खेळाडू खेळतात तेव्हा १३० कोटीं जनतेचे आपण प्रतिनिधित्व करतोय याची त्यांना जाण असते.
भारताचे विश्वचषकाचे स्वप्न जेव्हा जेव्हा पूर्ण झाले तेव्हाच्या जल्लोषाच्या आठवणीनेही मन मोहरुन जाते. त्या अभिमानास्पद ऐतिहासिक क्षणाच्या आठवणीत रमणे हे आजही तेवढेच सुखावह. आजही आय.पी.एल. सामने सुरू झाले अन् लोक कोरोनाच्या नैराश्यातून थोडे बाहेर येत आहेत. बाहेर न फिरता आनंदाने घरात टिव्ही समोर ठाण मांडून बसू लागले आहेत.
जीवन असो वा क्रिकेट.. या दोन्हीत संघर्ष अटळ आहे. काळ आणि अनेक लोक बाद करायला तत्पर असणारच. पण तरीही न थांबता, दक्ष राहून जीवनात लढावेच लागेल.. यश मिळवावेच लागेल तरच जगाला तुमची आठवण राहील.
या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला ?
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला !
अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी
डाव तुझा येतांच तू जमविशी आपुली खेळी
काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी
भवताली तव झेल घ्यावया जोतो फासे टाकी
मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव
ह्या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुजला धाव
चतुर आणि सावध जो जो,तोच इथे रंगला
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला !
तू ऐकत असता जयघोषाचे नारे
या कालगतीचे नकोस विसरू वारे
फटकार अचूक तू चेंडू हया काळाचा
आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा
निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला !