मेडिकलचं महाभारत
डॉ सुरेश पाटील
लोकसंख्येचा विस्फोट होऊन गावांची शहरे बनली.अश्याच एका गजबजलेल्या शहरात नावाजलेली ‘आठल्ये’ हॉस्पिटल व ‘मोरे’ हॉस्पिटल ही दोन जुनी रुग्णालये. काळाच्या ओघात कात टाकून ही सुसज्ज बनलेली ही रुग्णालये म्हणजे ह्या शहराची लाईफलाईन जणू.
डॉ आठल्ये होते नावाजलेला ‘सर्जन’ तर डॉ मोरे हे ‘जनरल फिझिशियन’. लोकांच्या आरोग्याचे हे दोन्ही देवदूत.
एकाचवेळी वैद्यकीय सेवेला सुरवात केलेले हे दोन महारथी. आयुष्याभरात यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केलेले हे सिकंदर. प्रत्येक ज्युनियर डॉक्टरच्या तोंडी ह्या जोडीच नाव पण प्रत्यक्ष आयुष्यात यांची जोडी कधी जमली नाही.
‘निंदकाचे घर असावे शेजारी’ या म्हणीला न्याय देणारे एकमेकांबद्दल दोघांचे वागणे. एकमेकांच्या वैद्यकीय जीवनपटावरील ते समीक्षक व टीकाकार.
डॉ आठल्ये हे मितभाषी पण आपल्या हावभावातून बोलणारे. त्यात जर
डॉ मोरे यांचा रुग्ण त्यांच्याकडे आला तर त्यांची देहबोली सायलेंट वरून व्हायलेंट व्हायची. डॉ मोरे यांनी पाहिलेल्या रुग्णाचा केसपेपर हातात आल्यावर कपाळावर आठ्या आणणे,चेहऱ्यावर आश्चर्य वा गांभीर्याचे भाव आणणे, नकारार्थी मान हलवणे आणि वाचून झाल्यावर तो केसपेपर फेकून देणे हे त्यांचे काम.
“तुम्ही थोडं आधी इकडे यायला हवं होतं; लवकर बरे झाला असता.
पण आता मला योग्य औषधे वापरावी लागतील” अशी अप्रत्यक्ष टीका करायचीही संधी ते सोडायचे नाहीत. कधी आपल्या केसपेपरवर ही जुन्या उपचारातील उणीवा नमूद करायचे.
तिकडे डॉ मोरे स्वभावनेच आक्रमक बडबडे आणि फटकळ होते.
डॉ आठल्येचा रुग्ण पाहिल्यावर ते त्यांच्यावर उघडपणे टीका करायचे.
“कशाला गेला होता ह्या हॉस्पिटलमध्ये. अरे त्या डॉक्टरांला काय पण येत नाही. आमच्या हॉस्पिटलमधील सर्जनने असा ऑपरेशन केलं असत तर असा ऑपरेशन व्रण राहिला नसता. त्यांचा उपचार चुकीचा झाला आहे”
अशी वादग्रस्त टीका ते मुद्द्याम करायचे. कधी कधी सोशल मिडिया वरती सुद्धा संधी मिळाली त्यांच्या विरुद्ध लिहायचे.
दोघांना एका व्यासपीठावर बोलावणे म्हणजे आयोजकाला डोकेदुखी असायची. त्यांच्या समवयस्क काही डॉक्टर मित्रांनी समझोता करण्याचे अनेक अपयशी प्रयत्न केले होते. अपयशाचे कारण होते या दोन्ही डॉक्टरांचे ‘इगो’ आणि ‘ परस्पर द्वेष’.
या दोन्ही डॉक्टरांचे अनेक अनुयायी. त्यांच्या तालमीत तयार झालेले कट्टर ज्युनियर डॉक्टर. क्लिनिक आणि क्लिनिक बाहेर ते सुद्धा आता एकमेकांवर, एकमेकांच्या उपचारपद्धतीवर टीका करायला लागले होते.
कोरोनाची साथ आल्यावर प्रशासनाने सर्व डॉक्टरांची सेवा शासन अधिग्रहित केली. डॉ मोरे आणि डॉ आठल्ये यांना कोरोना अतिदक्षता विभागाचे प्रमुख बनवले गेले. आयुष्यात प्रथमच ते एकत्र रणांगणात उतरले होते. आपल्या बुद्धीच्या व अनुभवाच्या सहाय्याने त्यांनी कित्येक रुग्णांना नवजीवन दिले. पण या ठिकाणी सुद्धा दोघांचे काही फारसं जमत नव्हतं.टीका टिप्पणी; वाद विवाद; कोल्ड वॉर चालू असायचे. पण सद्यस्थितीत कोरोना हाच दोघांचा एकमेव शत्रू असल्याने उपचारात एकमत होत.
दोन महिन्यांच्या सेवेनंतर डॉ आठल्ये अचानक कोरोनानेच आजारी पडले. वाढते वय,मधुमेय,लठ्ठपणा यांच्यामुळे त्यांची परिस्थिती खूप गंभीर झाली. शहरातील त्याच एकमेव कोरोना अतिदक्षता विभागात त्यांना दाखल केल गेलं. उपचार देण्याची जबाबदारी डॉ मोरे यांच्यावर आली. काही दिवसात त्यांची तब्बेत अजून खालावली गेली. डॉ मोरेंनी त्यांना व्हेंटिलेटरवर शिफ्ट केले. पुढील दहा दिवस मृत्यु आणि डॉ आठल्ये यांच्यामध्ये रक्षक कवच घेऊन उभे होते ते म्हणजे डॉ मोरे. पुढील काही दिवसात डॉ आठल्ये बरे झाली.
‘थँक्स’ हा शब्द बोलून ओलावलेले डोळे घेऊन ते सक्तीच्या विश्रांतीसाठी घरी रवाना झाले. पुढील महिनाभर त्यांचा कोणाशी ही फारसा संपर्क आला नाही.
एक दिवस त्यांच्या एका ज्युनियरचा फोन आला.
“सर, खबर समजली का. डॉ मोरेनां पुण्याला हलवलं. दहा दिवस झाले कोविड झाला आहे. खूप बॅड आहेत. इथे सर्व उपचार करून झाले काही प्रतिसाद नाही”.
डॉ आठल्येनी लगेच पुण्यातील त्या हॉस्पिटलमध्ये फोन केला.थोडा वेळ काही संभाषण झालं. लगेच कार काढून ते पुण्याला रवाना झाले.
आठवड्याभरात डॉ मोरेच्या प्रकृतीही काही विशेष उपचारानंतर स्थिर झाली. त्यांना आय सी यु मधून जनरल वॉर्डमध्ये आणले गेले.
डॉ मोरे नी उपचार करण्याऱ्या डॉक्टरांना विचारले,
” प्लाझमा कुणी दिला. त्याचे मला आभार मानायचे आहेत.”
“सर, ती व्यक्ती तुम्ही ऍडमिट झालेल्या दिवसापासून तुमच्या सोबत आहे.त्यांचा नंबर देतो. तुम्ही कॉल करा” डॉक्टर बोलले.
डॉ मोरेंनी नंबर डायल केला.
स्क्रीन वर ‘खडूस आठल्या’ अस नाव आलं. डॉ मोरेंच्या डोळ्यात पाणी आलं.
“साल्या, इतक्या लवकर उपकाराची परतफेड करशील अस वाटलं नव्हतं” अस म्हणतं मनातून हसले.
आयुष्यात प्रथमच दोघांनी फोनवर मनसोक्त वाद न करता संवाद साधला. दोघांचे विचार कधी जुळले नव्हते पण परमेश्वराने रक्तगट मात्र जुळवले होते. शहरात परत आल्यावर दोघांनी भेट घेतली. एकमेकांचा द्वेष तिरस्कार कायमचा ‘लॉकडाउन’ करायचा ठरवला आणि पडद्यामागचं युद्ध कायमच संपवून कोरोना युध्द पुन्हा लढायचा चंग बांधला.
मित्रांनो आपल्या सर्वांमध्ये व आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक डॉक्टरमध्ये थोड्या फार प्रमाणात डॉ मोरे वा डॉ आठल्ये यांच्या सारखी मनोवृत्ती आहे.
कळत नकळत आपल्या सहकारी डॉक्टर वर किंवा त्याच्या उपचार पध्दतीवर रुग्णासमोर किंवा रुग्णाच्या नातेवाईकां समोर टीका करणे यालाच म्हणतात ‘मेडिकल जोस्टींग’.
कधी या टीका ह्या व्यावसायिक स्पर्धेतून वैयक्तिक स्वार्थासाठी असतात तर कधी तिरस्कारा मुळे उपहासात्मक असतात.
पण यामुळेच रुग्णांच्या मनात डॉक्टर बद्दल गैरसमज,शंका आणि अविश्वास तयार होतो. कधी कधी यामुळे गैरसमज होऊन डॉक्टरांवर तक्रारी दाखल केल्या जातात. सेकंड ओपिनियन या जमान्यात यासर्वामुळे अजून गोंधळ रुग्णाच्या मनात होतो. याचाच गंभीर परिणाम पुढे जाऊन डॉक्टरांच्या व हॉस्पिटलवरील हल्ल्यात होतो.
या ‘मेडिकल जोस्टींग’ ची सुरवात खरी तर मेडिकल कॉलेज मध्ये शिक्षण घेताना होते. जिथे सिनियर डॉक्टर आपल्या ज्युनियर डॉक्टरांना त्यांनी दिलेल्या उपचाराबद्दल वॉर्ड मध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकां समोर रागावतो वा झापतो. पुढे ह्या गोष्टी डॉक्टरांच्या स्वभावात येतात. मग अलोपॅथी, आयुर्वेदिक वा होमिओपॅथी यावरून ‘पॅथीयुद्ध’ सुरू होऊन टीकाकारण चालू होते. आपल्या विषय सोडून इतर विषयावर ज्या ठिकाणी आपले पूर्ण ज्ञान नाही त्यावरही टीका केल्या जातात. या सर्वांचा एकत्रित परिणाम डॉक्टरांच्या मानसिक व सामाजिक आरोग्यावर होतो.
याचा अर्थ असा होत नाही की एखादा चुकीचा उपचार करत असेल तर गुपचूप समर्थन करावे. चुकीचे बेकायदेशीर उपचाराशी संलग्न डॉक्टराशी चर्चा करावी त्याला मार्गदर्शन करावे. बदलाची सुरवात स्वतःपासून करावी. विविध वैद्यकीय संघटनांनी ‘मेडिकल जोस्टींग’ ला पायबंद घालण्यासाठी पुढाकार घ्यावा. डॉक्टरांमधील निरोगी निस्वार्थी नातेसंबंध हे समाजाच्या आरोग्यासाठी महत्वाची बाब आहे. चला मग आजपासून ‘मेडिकल जोस्टींग’ कमी करू आणि ‘मेडिकल दोस्टींग’ वाढवू.
मनी ‘डॉक्टरकी’चा अभिमान
नको सहकाऱ्याचा अवमान
चित्ती राहू दे समाधान
मग भेटेल सामाजिक सन्मान.
डॉ सुरेश पाटील
मानसोपचार व मनोविकास तज्ञ
वसई विरार नालासोपारा
9987230222