“बोलते व्हा ….”
( & Boost your Immunity )
२०२० हे साल कोविड १९ महामारी मुळे ह्या शतकातील सर्वात मोठे ‘ आपदा वर्ष ‘ म्हणून ओळखले जाईल ह्यात आज तरी शंका घेण्याचे कारण नाही.
कोरोना महामारीच्या ह्या काळात सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात राष्ट्रीय तर सोडाच अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील काय काय परिणाम होतील हे आज तरी मोठमोठ्या Think Tanks यांना ही Predict करणं अवघड आहे.
आपल्या सारख्या सामान्य जणांना मात्र ‘जान है तो जहान हैं’ हीच प्राथमिकता होऊन बसली आहे आणि हाचा धागा पकडून हाडाच्या व्यावसायिकांनी Immunity विकायला सुरुवात केली आहे…
थोडक्यात Immunity हा परवलीचा शब्द होऊन गेला आहे …
” बोलते व्हा & Boost your Immunity ” असं शिर्षक वाचून तुम्हाला थोडे चमत्कारिक वाटले असेल ना ?… सहाजिक आहे.. माझ्या मित्राचा फोन आला तेंव्हा मला सुद्धा वाटले होते…
माझ्या एका २५ वर्षे जुन्या सहकारी मित्राचा फोन आला.पूर्वी ही तो कधी तरी अधूनमधून एखाद दुसऱ्या वेळी फोन करायचा. एकाच शहरात रहात असूनही फार वेळा भेटलो असं ही नाही, पण ह्या कोरोना काळात त्याचा फोन आला … बरं वाटलं…
एकमेकांची ख्याली खुशाली विचारून झाली, जुन्या मित्रांबद्दल बोलणं झालं… बोलता बोलता मध्येच तो म्हणाला , – “अरे, माझी मिसेस म्हणाली की जुन्या मित्रांना फोन करून बोलत जा, त्यामुळे Immunity वाढते.”
मी विचारले, – ” ते कसं ? “
तो म्हणाला, – ” हे बघ ह्या कोरोना महामारीच्या काळात Immunity चा अर्थ फक्त रोग प्रतिकारक शक्ती एवढाच न घेता मनोबल वाढवणारी गोष्ट असा घेतला पाहिजे.. आपण एकमेकांना बोललो, जुन्या गोष्टीत रमलो, जुने सोनेरी दिवस, टिम – टिमवर्क, टिमचे यश वगैरेंची चर्चा केली, आठवणींना उजाळा दिला की मनाला एक प्रकारची उभारी येते.. दुःख, संकटं ह्याच्याशी दोन हात करण्याचे धैर्य येते… आणि कळत नकळत ह्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती ही वाढत असावी … म्हणून एकमेकांना बोलत राहिले पाहिजे …There should be dialogue….”
ह्या दृष्टीने मी ही कधी विचार केला नव्हता…
प्रसिद्ध नाटककार सर जाॅर्ज बर्नाड शाॅ म्हणतात -” जगात २ टक्के लोक विचार करतात..३ टक्के लोकांना वाटतं की आपण विचार करतो आणि ९५ टक्के लोक विचार करतच नाहीत …”
आपण ३ टक्क्यात आहोत की ९५ टक्क्यात हा माझा विचार सुरू आहे…असो..
मला माझ्या सहकारी मित्राचे म्हणणे पटले …..
मग मी शोधून शोधून जुन्या मित्रांना, सहकाऱ्यांना फोन केले.. आणि believe me … मला माझ्या त्या मित्राच्या म्हणण्याची प्रचिती आली…(तुम्ही देखील ही अनुभूती घेऊन पहा..)
साधारणतः २००८ हे साल असावे.. Recession ची हलकीशी चाहूल लागली होती..नोकरकपात , cost reduction वगैरे वर जोरात मोहीम सुरू होती.
तो दिवस मला आजही स्मरणात आहे…त्या दिवशी माझा ५० वा वाढदिवस होता.. सकाळी ९ ला मॅनेजमेंटच्या मिटींग मध्ये माझी विनाकारण इतकी धुलाई झाली की मी मिटींग सोडून माझ्या टेबलावर आलो… काय करावे हे काही सुचत नव्हते…एक ग्लास पाणी प्यालो आणि माझा अहमदनगर येथे रहात असलेला मित्र उमेश कोठाडीयाला फोन लावला, प्रसंग सांगितला आणि म्हणालो, – ” आता मी राजीनामा देणार आहे “
माझा हा आतातायीपणा होता.. राग आला की व्यक्ती टोकाचे निर्णय घेत असतो..
माझ्या मित्राने माझे म्हणणे ऐकून घेतले व म्हणाला, – ” तुझी चुक नसताना असं काही व्हायला नाही पाहिजे …असो एक काम कर , आता तू हा प्रसंग मनातून काढून टाक…आजचा दिवस जाऊ दे..मी काय करता येईल हा विचार करतो, आपण उद्या ठरवून निर्णय घेऊ या ..”
तो दिवस गेला.. दुसरा ही दिवस गेला … पुढे दोन वर्षे मी त्याच ठिकाणी नोकरी केली…
बोललं…व्यक्त झालं की मार्ग निघतात…
मी अनेकांना सल्ले देत असतो की किती ही त्रास झाला तरी ही जो पर्यंत हातात दुसरा जाॅब नाही तोपर्यंत पहिला जाॅब सोडू नका..
दुसरा प्रसंग …
एकदा अचानक माझे ब्लड प्रेशर वाढले आणि २-३ दिवस ICU मध्ये रहावे लागले.
१०-१२ दिवसांच्या विश्रांतीनंतर कामावर रुजू झालो पण अधूनमधून मला रात्री अनामिक भीती वाटत असे..
मी उमेश कोठाडीयाला फोन करून ही गोष्ट सांगितली..तो म्हणाला, – ” ह्या पुढे असं काही वाटलं की मला काॅल करत जा.. वेळ कोणतीही असो… आपण जरा बोलू, गप्पा मारु …तुला त्या गोष्टीचा विसर पडल्यासारखे होईल …चांगली झोप ही लागेल “
आम्ही काही दिवस तसं केलं, बोलत राहिलो आणि believe me हळूहळू ती अनामिक भीती मनातून निघून गेली… विसरून गेलो… आजपर्यंत तो त्रास उद्भवला नाही…
हा मानसिक immunity वाढविण्याचाच प्रकार म्हणावा लागेल …
आजकाल बाजारात शारीरिक immunity वाढीसाठी उपलब्ध असणाऱ्या गोष्टीचे पेवच फुटलेले आहे… अगदी ‘बेबो पासून बाबां’ पर्यंत अनेक जण त्यांची जाहिरात करताना दिसतील पण मानसिक immunity साठी काय ? तर बोला …व्यक्त व्हा … सुखदुःख सांगा… एकमेकांशी शेअर करा हा सोपा उपाय आहे…
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेते व मानसोपचार तज्ज्ञ श्री मोहन आगाशे यांना एका मुलाखतीत ” डिप्रेशन ” संदर्भात प्रश्र्न विचारण्यात आला तेंव्हा ते म्हणाले की , – “आपल्या कडे भावना व्यक्त करणं हे सेक्स विषयी बोलण्यापेक्षा ही जास्त निषिध्द मानले जाते… दुसरं आपण टोकाच्या गोष्टी करतो म्हणजे एक तर खूपच बोलतो किंवा अजीबात बोलत नाही.. बोलणं महत्त्वाचे आहे… पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब होती, त्यावेळी खडूस कुटुंब प्रमुख असला आणि तो छोट्या छोट्या गोष्टींसाठी जमदग्नींच्या अवतार घेत असत त्या काळी मन हलकं करायला आजी, आत्या, मामी, काकू इतर व्यक्ती असत..एक प्रकारे balance सांभाळला जात असे…आज चौकोनी कुटुंबात हे घडत नाही…मग मुलं, माणसं मनात कुढत बसतात…
पूर्वीच्या काळी बायका उन्हाळकामं, वाळवण करताना, पाणी भरताना एकमेकांना बोलत असत … सुखदुःख सांगत असत…आज ते जवळजवळ संपलं आहे “
आणि त्यांनी व्यक्त केलेली गोष्ट खरी आहे…
आमच्या लहानपणी (आजचं माहीत नाही) गावाकडे लोक सायंकाळी पारावर गप्पा मारत बसायचे… हास्य विनोद चालत , कामाच्या गोष्टी होत असत, एकमेकांच्या अडीअडचणी सोडविल्या जात …
हे सगळं लोकांनी एकमेकांशी मोकळेपणाने बोलल्या मुळे शक्य होत असे..
आजच्या काळात ही काही शहरात लोकांनी एकत्र येऊन केलेल्या चांगल्या गोष्टी मनात घर करून जातात….
२०१७ मध्ये वर्तमानपत्रात वाचलेली एक बातमी मी माझ्या फेसबुकवर त्यावेळी शेअर केलेली मला आठवते…
बहुतेक जळगांव इथली गोष्ट आहे ..
शहरातील एक रहिवासी काॅलनी , ज्यात काही फ्लॅट असलेल्या इमारती, रो हाऊसेस व इतर घरे आहेत.
ह्या काॅलनी मध्ये रोज रात्री ८ ते ९ ह्या वेळात सगळी मंडळी आपापल्या घरातील लाईट्स बंद करून काॅलनीच्या मध्यभागी असलेल्या lawn मध्ये एकत्र जमतात… गप्पा मारतात… चर्चा करतात …खेळतात…
ह्या उपक्रमा बद्दल लोकांनी सांगितले की , – ” आजकाल प्रत्येक जण मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडिया ह्यात इतका गुरफटून गेला आहे की संवाद जवळजवळ हरवला आहे..मग आई-वडील मुलं असोत की शेजारी..थोडा वेळ ही हे मोबाईल यंत्र बाजूला ठेवून एकमेकांशी बोलणं होतच नाही.. म्हणून आम्ही सामुहिकरीत्या हे ठरवले आहे की बऱ्याच कंपन्या मध्ये जसा १ तासाचा Think Hour असतो, तसा हा आमचा Dialogue Hour आहे म्हणा ना …ह्या वेळात अतिशय निकडीचे असल्या खेरीज कोणी मोबाईल घेत नाही…”
आई-वडील मुलं , शेजारी, मित्र मंडळी एकत्र बसतात… गप्पा मारतात… सुखदुःख शेअर करतात… मोकळे होतात …
ह्यातून नक्कीच मानसिक आरोग्य सुधारते … माझ्या मित्राच्या भाषेत immunity वाढते म्हणायला हरकत नाही…
आजच्या अतिभोगवादाच्या काळात प्रत्येकजण अगदी वेड्यासारखा धावत सुटला आहे हे दिसते आहे… आणखी हवं… आणखी हवं म्हणत बरंचस गोळा करताना खूप काही हातातून निसटून जाते आहे..
कुटुंब, नातेसंबंध हे ” मी – मीच – माझं आणि माझंच ” मुळे तुटून गेल्याची हजारो उदाहरणे आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत …
संवादच नाही…बोलचाल नाही…
छोटेसे गैरसमज अगदी जिवलग मित्रांच्या मध्ये किती मोठी दरी निर्माण करते हे पहायचे असेल तर मोहन आगाशे आणि दिलिप प्रभावळकर यांचा ” गोष्ट दोन गणपतरावांची ” हा सिनेमा आवर्जून पहा …
बोलणं, संवाद असणं किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येईल..
सुप्रसिद्ध कवियत्री स्व. बहिणाबाई चौधरी यांच्या ” पेरते व्हा …” ह्या कवितेतील दोन ओळी ….
पेरनी पेरनी
आले पावसाचे वारे,
बोले पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे …
पक्षी देखील म्हणतो आहे की गड्यांनो बोलते व्हा रे , पेर्ते व्हा रे – शब्दाची पेरणी करा …हीच वेळ आहे..
असा अर्थ तर बहिणाबाईना ह्या ओळींतून अपेक्षित नसेल ना ?