…. ना कलंक लग जाए।
लॉकडाऊन अशी चर्चा चालू झाली आणि आज कुठे तरी वाचलेली एक कथा आठवली
कोणातरी देशाचा एक राजा होता. बरेच वर्ष राज्य त्याने भोगले. केस पांढरे झाले, वय झाले तरीही त्याने राज्याचा त्याग केला नव्हता. त्याच्या राज्यरोहण समारंभाच्या दिनानिमित्त त्याने एक उत्सव करायचे ठरवले. देशोदेशीच्या सर्व राजांना व आपल्या गुरूंना आमंत्रणे पाठवली. उत्सवाची सांगता आणि मुख्य आकर्षण होते एक जगप्रसिद्ध नर्तकीचा नृत्याविष्कार.
राजाने या उत्सवा निमित्ताने आपल्या गुरूंना जरा जास्तच दक्षिणा दिली जेणे करून जर गुरुजींना नर्तकीला काही बक्षीस द्यावेसे वाटले तर त्यांच्याकडे पुरेसे पैसे असावेत.
संपुर्ण रात्रभर नर्तकी नृत्य करीत होती. प्रत्येक प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन नृत्य पहात होता. इतक्यात त्या नर्तकीचे लक्ष आपल्या तबलजी कडे गेले आणि तिच्या लक्षात आले की तो पेंगत आहे आणि त्याला सावधान करणे गरजेचे आहे नाहीतर आत्तापर्यंत केलेल्या सर्व अविष्कारावर पाणी पडेल, प्रेक्षकांचा रसभंग होईल आणि राजा शिक्षा करेल ते वेगळे. त्याला जागे करण्यासाठी ती एक दोहा म्हणते
बहू बीती, थोड़ी रही, पल पल गयी बिताई।
एक पल के कारने, ना कलंक लग जाए॥
या दोह्याचा उपस्थितांनी आपल्या आपल्या पद्धतीने अर्थ काढला…
▪️तबलजी सावधान झाला व त्याने आपल्या कलेवर लक्ष केंद्रित केले.
▪️ गुरुजींनी राजाने त्यांना दिलेली सर्व संपत्ती त्या नर्तकीच्या चरणी अर्पण केली.
▪️ राजकुमारी ने आपल्या गळ्यातील अतिशय मूल्यवान हार त्या नर्तकीला दिला.
▪️ राजपुत्राने आपल्या शिरावरील मुकुट त्या नर्तकीला दिला.
राजा आश्चर्यचकित झाला. गेली संपूर्ण रात्र ही नर्तकी नाचत आहे पण या एका दोह्यात असे काय आहे? की या सर्वांनी आपल्या कडील अतिशय मूल्यवान वस्तू त्या नर्तकीला समर्पित केल्या.
राजा त्या नर्तकीला म्हटला की “एक सामान्य नर्तकी असूनही एका दोह्याने तू या सर्वांना जिंकलेस. असे या दोह्यात आहे तरी काय”?
मित्रांनो पुढील प्रसंग आता लक्षपूर्वक वाचा
▪️राजाचे गुरुदेव उभे राहिले आणि अश्रू भरल्या डोळ्याने म्हणाले “हे राजा हीला सामान्य नर्तकी म्हणून हीन लेखू नकोस. ती आता माझी गुरू आहे कारण या एका दोह्याने तिने माझे डोळे उघडले आहेत. तिने मला सांगितले की इतकी वर्षे सर्व उपभोग सोडून तू तपश्चर्या केलीस आणि आता शेवट जवळ आला असताना या ऐहिक गोष्टींत का अडकलास? एका नर्तकीचे नृत्य पाहून आपली साधना का नष्ट करीत आहेस? हे राजा मी निघालो.” असे म्हणून गुरुजी मार्गस्थ झाले.
▪️राजकुमारी म्हणाली “इतके वर्ष झाली पण राज्याच्या धुंदीत आपण विसरलात की माझे लग्नाचे वय निघून चालले आहे त्यामुळे मी आजच आपल्या सेवका बरोबर पळून जाणार होते परंतु हिच्या या दोह्याने मला सद्बुद्धी दिली की उतावळी होऊ नकोस. तुझे लग्न कधी तरी होणारच आहे. मग आजच आपल्या वडिलांना का कलंकित करते आहेस?”
▪️राजपुत्र म्हणाला “आपण वृद्ध झाला आहात तरीही राज्याचा त्याग न केल्यामुळे मी राजा होऊ शकत नाही, म्हणून आजच मी माझ्या सैनिकांद्वारे आपली हत्या करणार होतो. हिच्या दोह्याने मला समजावले अरे मूर्खां राजा काही अमर नाही त्यामुळे कधीतरी हे राज्य तुझेच आहे मग कशाला पितृहत्येचा कलंक लावून घेतो आहेस. थोडा धीर धर”.
आता जेंव्हा हे सर्व राजाने ऐकले तेंव्हा त्यालाही आत्मज्ञान झाले. त्याच्या मनात वैराग्य दाटून आले. त्याने लगेचच आपल्या राजपुत्राला राज्याभिषेक करविला. मुलीला उपस्थित राज्यांमधील योग्य राजाची निवड करायला सांगून तिचे लग्न लावून दिले. स्वतः आपल्या राणी सह वनात आपल्या गुरुजींकडे निघून गेला.
आता हे सर्व बघून त्या नर्तकीने विचार केला की “माझ्या एका दोह्याने इतक्या लोकांच्या आयुष्यात परिवर्तन झाले, परंतु माझे काय?” आणि मग तिनेही ठरविले आणि तिने आपल्या या निषिद्ध वृत्तीचा त्याग केला व देवाची प्रार्थना केली “हे प्रभो! माझ्या पापांची मला क्षमा करा. यापुढे मी फक्त तुझ्या नावाचे गुणगान कारेन व उर्वरित आयुष्य तुझ्या सेवेत घालवेन”.
वाचकहो, उपरोक्त कथा या परिस्थितीत आपणासही लागू नाही का होत?
बहू बीती, थोड़ी रही, पल पल गयी बिताई।
एक पल के कारने, ना कलंक लग जाए॥
ह्या दोह्याच्या कसोटीवर हा लॉकडाऊन चा काळ घासून बघा. २२ मार्च पासून आपण संयम ठेवला आहे. अनेक अडचणींना तोंड दिले आहे. देव करो आणि असं ना होवो पण आता या शेवटच्या काही दिवसांसाठी आपला संयम संपेल आणि आपली एक चूक आपल्या घरादाराला, मित्रपरिवरला व अनुषंगाने संपूर्ण समाजाला महागात पडेल. आतापर्यंत केलेल्या सर्व मेहनतीला मातीमोल करेल.
चला आपण सर्व मिळून कोरोनाशी लढूयात घरातच रहा, सुरक्षित राहा व सर्व नियमांचे पालन करा.