☑ आज दूरदर्शनला ६१ वर्षे पूर्ण झाली..
📌 दूरदर्शवरुन पहिले प्रसारण १५ सप्टेंबर १९५९ रोजी आकाशवाणी भवन नवी दिल्ली, या तात्पूरत्या उभारलेल्या स्टुडिओतून करण्यात आले होते….
➖➖➖➖➖➖➖
🌀 संकलन – सचिन मणियार..✒
📍दिल्लीत प्रायोगिक तत्त्वावर आकाशवाणीच्या वास्तूत १९५५ साली उभारल्या गेलेल्या दूरदर्शन केंदाने निर्मिलेल्या पहिल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण १५ सप्टेंबर १९५९ रोजी. झाले…
📍पु. ल. देशपांडे हे दूरदर्शनचे पहिले संचालक होते. त्यांनीच टेलिव्हिजनसाठी “दूरदर्शन” असे नाव सुचवले होते. पु.ल. आणि शिवेंद्र सिन्हा यांनी जो एक तासाचा पहिला कार्यक्रम तयार केला होता, त्यात पपेट शो, वैजयंती माला यांचे नृत्य, भेसळ प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती अशा लोकप्रबोधन आणि मनोरंजन यांचा मिलाफ साधणा-या घटकांचा अंतर्भाव होता.
📍प्रायोगिक तत्त्वावरचं हे प्रक्षेपण आठवड्यात तीन दिवस दिल्ली परिसरातच पाहता येत होतं- पण ते पाहायला खुद्द दिल्लीकरांकडेही टीव्ही सेट होते कुठे ! त्यामुळे टीव्ही तसा खऱ्या अर्थी दैनंदिन वापरात आला १९६५ मध्येच, त्यामुळे काहींच्या मते तीच सुरवात मानली जाते.
📍दिल्लीतल्या एकमेव केंद्रापासून सुरूवात झालेल्या दूरदर्शनचा व्याप आता देशभर पसरलाय.दूरदर्शन, भारतीय राष्ट्रीय दूरदर्शन हे जगातील सर्वात मोठे प्रादेशिक (नेटर्वक) जाळे आहे. डीडी -१ ही वाहिनी १०४२ प्रादेशिक ट्रान्समिटर्स पर्यंत याचे जाळे पसरले आहे.
📍देशात ८५ टक्के लोकसंख्येपर्यंत डीडी-१ चे कार्यक्रम पोहेचतात. या व्यतिरिक्त ६५ अतिरिक्त ट्रान्समिटर्स जोडलेले आहेत. भारतीय राष्ट्रीय उपग्रह (इन्सॅट) वर अनेक ट्रान्सपाँडर्स जोडून प्रसारण क्षेत्र वाढविण्यात आले आहे. प्रत्येक राज्यासाठी दूरदर्शनने स्वतंत्र प्रादेशिक वाहिनी दिली. मुंबईत १९७२ मध्ये दूरदर्शन केंद्र सुरू झालं. देशात ४९ शहरांमध्ये दूरदर्शनचे कार्यक्रम निर्मिती केंद्र कार्यरत आहेत.
📍रंगत खरी वाढली ती १९८२ नंतर, जेव्हा टीव्ही खरोखर ‘रंगीत’ दिसू लागला. तोपर्यंत ‘कश्मीर की कली’ आणि ‘नवरंग’सुद्धा ‘ब्लॅक अँड व्हाइट’मध्येच पाहावे लागले होते. १९८२ च्या एशियाड सामन्याच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे असे सरकारला वाटले. त्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधींनी ही कामगिरी भटकर यांच्यावर सोपविली.
📍भारतात १९८२ मध्ये झालेल्या ‘एशियाड’ या आशियायी क्रीडा स्पर्धेमुळे भारतातले क्रीडाप्रेम किती वाढीला लागलं हे माहीत नाही; मात्र त्यानिमित्तानं रंगीत झालेल्या टीव्हीचं प्रेम मात्र झपाट्यानं वाढत गेलं हे नक्की !
🌀 संकलन – सचिन मणियार..✒
📍”हमलोग” ही भारतातील दूरचित्रवाणी वरून प्रक्षेपित होणारी पहिली मालिका आहे. भारतीय दूरचित्रवाणीच्या वाटचालीतला हा महत्त्वाचा टप्पा. अशोक कुमारद्वारा सूत्रसंचालित आणि मनोहर श्याम जोशीद्वारा लिखित हमलोग मालिकेने तत्कालीन लोकप्रियतेचे उचांक मांडले होते. ७ जुलै १९८४ रोजी पह्लियांदा हिचा पहिला भाग प्रसारीत झाला होता. नटवर्य अशोककुमार बोलत होते, ”…लेकीन बसेसर था कहाँ और किस उलझन में?… मंझलीने माँ को क्या बताया था? कल की सुबह अपने साथ क्या लाने वाली है?… बेखबर तो मैंभी हूँ – पर बेआस नहीं… होता है क्या. कल देखेंगे, ‘हम लोग’ !”
📍त्यानंतर हिंदीतल्या बुनियाद, ये जो है जिंदगी, रजनी, तमस, रामायण, महाभारत, द वर्ल्ड धिस वीक, दर्पण या मालिकांनी तर मनोरंजनाच्या विश्वात अफाट प्रेक्षक वर्ग मिळवला.
📍’रामायण’ व ‘महाभारत’ या दोन महाकाव्यांचा भारतीय मनावरचा चिरंतन ठसा या दोन महामालिकांनी पुन्हा एकदा उजळला. १९८७ ते १९९० या चार वर्षांत या मालिकांचं जनमानसावरचं जे गारुड दिसलं, त्यानं ‘टीव्ही’ या माध्यमाची अक्षरशः विस्मयित करणारी ताकदच दाखवून दिली. रविवारी सकाळी या मालिकांवेळी देशभर जणू ‘कर्फ्यू’ लागणारी परिस्थिती होती.
📍१९८५ नंतर घरोघरी दूरचित्रवाणी संच दिसू लागले आणि उंच अँटेना ॲडजेस्ट करीत ‘मुंग्या-मुंग्या’ हा नवा शब्द मराठीला देत टीव्ही- मोजक्या का होईना- मराठी घरांमधून दिसू लागला. मालिकांविषयीच्या चर्चा रंगू लागल्या. चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चाळ नावाची वाचाळ वस्ती, गोट्या, बंदिनी, एक शुन्य शुन्य, सर्जा राजा, प्रतिभा आणि प्रतिमा, ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं या मालिका ज्ञान, माहिती आणि निखळ मनोरंजन देण्याचं काम करीत होत्या.
📍व्यत्यय नावाची पाटीही चांगलाच भाव खावून जायची. ज्यांच्या घरात स्वतःची किमान स्कूटर किंवा घरात फोन होते त्यांच्या घरी ‘ईसी’ टीव्ही पोहचला. ‘ईसी’ ही टीव्ही संच निर्मिती करणारी पहिली ‘स्वदेशी’ कंपनी. पुढे यथावकाश क्राऊन, फिलिप्स, डायनोरा वगैरे ‘ब्रॅंड्स’ हे दिसू लागले. सोसायट्या, चाळी व वस्त्यांमधून अशी ‘टी.व्ही.’धारक घरे सार्वजनिक बनू लागली.
📍आठवड्यातून एकदा रविवारी दिसणारा सिनेमा आणि गुरुवारी दिसणारे अर्ध्या तासाचे ‘छायागीत’ खरोखरीच ‘हाऊस’फुल्ल करू लागले. धरधन्याच्या फुटकळ विनोदांना भरभरून हसून दाद देणं किंवा घरातल्या शेंबड्या मुला-मुलीचं अमाप कौतुक करणं, हे त्या घरात टीव्ही पाहायला किमान टेकण्यासाठी सोयीस्कर भिंतीलगतची जागा मिळवण्यासाठी आवश्यक ठरू लागलं ! यातूनच दिवाळी पाडवा, गुढीपाडवा, न्यू इयर आदी तत्सम सुमुहूर्तावर ‘हप्त्यानं’ का होईना; पण ‘आपला’ टीव्ही आणण्याचे मनसुबे आणि हट्ट स्त्रीशक्ती घरोघर करू लागली.
📍१९९१ मध्ये त्याच्या ‘स्टार इंडिया’चं पदार्पण झालं, ९२ मध्ये ‘झी’ची हिंदी वाहिनी दिसू लागली आणि या पावलांनी ‘खासगी चॅनेल्स’नी आपल्या घरातही प्रवेश केला… सोनी, शार्प, सॅनसुई, पॅनासोनिक, सॅमसंग, एलजी, तोशिबा वगैरे दडपून टाकणारी नावं ‘डाऊन पेमेंट’ व ‘ईएमआय’ अशा मध्यमवर्गीयांना हव्याहव्याशा वाटू लागलेल्या संकल्पना घेऊन दाराशी उभी होती. त्यापाठोपाठ घरमालक, किराणेवाला, दूधवाला, पेपरवाला या मासिक जमा-खर्चातल्या उजवीकडच्या बाजूत ‘केबलवाला’ हा नवा देणेकरी दाखल झाला होता. आज त्याच्याही पुढे जाऊन ‘केबल कनेक्शन’ मागं पडून त्यांनी ‘डायरेक्ट टू होम’ प्रवेश मिळवला आहे.
📍आज घडीला MTV, V चॅनेल, म्युझिक चॅनेल्स हे सर्व असले तरी आजही ‘सॉर्ड ऑफ टिपू सुलतान’ची भव्य सुरवात करणारी संगीतकार नौशाद यांनी बनवलेली ‘सिग्नेचर ट्यून’ आजही तेवढंच रोमांच उभी करते. नाग बंधूंची ‘मालगुडी डेज’,चंद्रकांता,ब्योमकेश बक्षी,तेनालीरामा, जंगल बुक, विक्रम और वेताल,सर्कस, फौजी अशा सर्व थरांना आवडून गेलेल्या ‘कथात्मां’ची मालिका ‘स्वाभिमान’ या पहिल्या डेली सोपपर्यंत पोहचलेल्या मालिकांची सर आजच्या हायफ़ाय कपडे घालून, श्रीमंतीचा थाट दाखवणार्या मालिकांना नाही.
🌀 संकलन – सचिन मणियार..✒