📺 “दूरचित्रवाणी स्मरणरंजन”
लेखक : विवेक पुणतांबेकर
‘बँड एक चॅनेल चार आणि बँड तीन चॅनेल पाच.’
दोन ऑक्टोबर १९७२ सकाळीच पेपरमधे हेडलाईन वाचली आज मुंबईत टेलिव्हिजन सुरु होणार. सर्वत्र प्रचंढ उत्सुकता होती. जानेवारी महिन्यातच टेलिव्हिजनच्या वरळी टॉवरचे काम सुरु झाल्याची बातमी आली. एकदा मुद्दाम वरळीला चक्कर मारून आलो. आता टॉवर दिसायला सुरवात झाली.
एप्रिलमध्ये पहिल्यांदा जे.के.टीव्ही ची जाहिरात पेपरमध्ये आली. मग टेलिरँड आणि टेलिविस्टा यांच्या जाहिराती दिसू लागल्या. अनेक ठिकाणी टीव्ही डिलर्सच्या शो रुम्स उघडल्या. डिस्प्लेला ठेवलेले टीव्ही सेटस् पहायला लोक गर्दी करायला लागले. टीव्ही बुक करायला पाचशे रुपये भरा अशी हँडबिलं घरोघरी आणि रस्त्यावर वाटली गेली. या आधी १९६२ साली मुंबईत आझाद मैदानावर हिमालय प्रदर्शन भरले होते. त्याचे मुख्य आकर्षण होते क्लोजसर्कीट टीव्ही. माझे वडील ते प्रदर्शन पाहून आले. त्यांनी सांगितले, टीव्ही रेडिओ सारखाच दिसतो फक्त मधे काच असते त्यावर सिनेमा सारखे चित्र दिसते. हे ऐकून आम्ही मित्र चर्चा करायचो, दिल्लीवाले भाग्यवान मुंबईत टीव्ही कधी येणार? उत्साहात जवळ जवळ रोज टीव्ही शो रुमवर चकरा मारायचो.
ऑगस्ट ७२ ला टीव्ही टॉवरचे काम पूर्ण झाले आणि चाचणी प्रक्षेपण सुरु झाले. त्याची वेळ मात्र मुद्दाम जाहीर केली नाही कारण टीव्ही डिलर्सनी तशी विनंती केली होती. आधी फक्त जेके, टेलिरँड आणि टेलिविस्टा या तीनच कंपन्यांना मुंबईत परवानगी दिली होती. नंतर क्राऊनला परवानगी मिळाली. ईसी टीव्हीची घोषणा झाली होती पण प्रत्यक्ष बाजारात यायला ७३ एप्रिल पर्यंत वाट पहायला लागली. एक आठवडा आधी सगळ्या पेपरमधून टीव्ही स्टेशन कसे काम करेल याच्या सचित्र रंगीत पुरवण्या यायला सुरुवात झाली.
२ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या मुहूर्तावर दूरचित्रवाणी सुरू होणार अशी घोषणा झाली खरी पण स्टुडियो तयार झाला नव्हता. म्हणून नव्याने बांधलेल्या नँशनल सेंटर फाॅर परफॉर्मिंग आर्टस च्या (एन.सी.पी.ए) थिएटरमध्ये उद्घाटन सोहळा साजरा करायचा निर्णय घेतला. लता मंगेशकर यांचे पसायदान, मग बिस्मिल्लाखान यांचे शहनाई वादन आणि केंद्रीय नभोवाणी मंत्री यांच्या हस्ते उदघाटन अशी सुरुवात सहा वाजता होणार होती. आम्ही सगळे उत्सुकतेने साडेपाच वाजताच टीव्ही शो रुम समोर जमलो. एक टीव्ही बाहेर आणून लावला होता. त्यावर मध्ये एक गोल आणि चार छोटे गोल दिसत होते (त्याला रास्टर किंवा स्क्रीन सेवर म्हणतात हे माहीत नव्हते) आणि रेडियो स्टेशन सुरू व्हायच्या आधी वाजते तशीच शिट्टी वाजत होती. सहा वाजले तरी पडद्यावर तसेच दिसत होते.(ओ.बी.व्हँनचा सिग्नल वरळी टॉवर पर्यंत नीट येत नव्हता. या मुळेच उशीर झाला) अखेर साडेसहाला आकाशवाणीची सिग्नेचर ट्युन सुरु झाली. पडद्यावर आकाशवाणीचे बोधचिन्ह दिसायला लागले आणि लता दिदींचा चेहरा दिसला. पसायदान सुरु झाले आणि आनंदाने मन भरून आले. हजारो लोकांप्रमाणे एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला याचा खूप आनंद झाला. मग बिस्मिल्लाखान यांचे शहनाई वादनानंतर उद्घाटन सोहळा संपला आणि ‘तिसरी कसम’ या क्लासिक सिनेमाने मुंबई दूरचित्रवाणीवर सिनेमे दाखवायला सुरुवात झाली. मधेच बातम्या दाखवल्या.
त्यावेळी सुरुवातीला काही महिने सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ पर्यंतच टीव्ही चे प्रक्षेपण असे. फक्त रविवारी साडेसहा ते साडेनऊ असे. हिंदी सिनेमे रविवारी दाखवत. महिनाभरात शनिवारचे प्रादेशिक सिनेमे सुरू केले. यात इतर भाषिक सिनेमा दाखवत. जवळजवळ तीन वर्षांनी पत्रकारांच्या आंदोलनानंतर मराठी सिनेमा महिन्यातून तीन शनिवारी दाखवायला लागले. पाचवा शनिवार आला की मराठी नाटक दाखवत. टीव्ही सेटस् चार हजार रुपये किमतीचे होते. त्यामुळे श्रीमंत वर्ग आणि उच्च मध्यम वर्गातल्या काही लोकांकडेच टीव्ही आला होता. एखाद्याच्या घरी टीव्ही येणार असल्याची बातमी कितीही लपवून ठेवली तरी अँटेना बसवायला माणूस आला की जवळजवळ सगळ्या गल्लीला समजायचे. मग चातकासारखी टँक्सीची प्रतिक्षा करत आणि टीव्ही आला की ओवाळून स्वागत करत. शेजारी हक्काने घरात ठाण मांडून बसत.
लोकप्रिय कार्यक्रमाचे वार ठरलेले होते. बुधवारी मराठी नाटक, रंगारंग कार्यक्रम, गजरा, गुरुवारी छायागीत, शुक्रवारी फुल खिले है गुलशन गुलशन, शनिवारी सिनेमा संपल्यानंतर एफ एस तल्यारखान खान यांचा लुकिंग बँक लुकिंग फॉरवर्ड, रविवारचा सिनेमा. या दिवशी प्रेक्षकांची अमाप गर्दी टीव्ही असलेल्या घरी होत असे. त्याच कालखंडात ब्रेबॉर्न स्टेडियमवरची मॅच लाईव्ह दाखवणार होते.(वानखडे स्टेडियम तयार झाले नव्हते) आम्हाला फार उत्सुकता होती. सिझन तिकीट काढून मॅच पहायला जाणे आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नसे. कॉलेजमध्ये नॉर्थ स्टँडची सिझन तिकिटे ७५ रुपयाला मिळत. पण ती सुध्दा लॉटरी सिस्टीमने. कारण कोटा मर्यादित होता. मग ज्याला तिकीट लागायचे तो आळीपाळीने मित्रांना द्यायचा. ही सगळी यातायात टीव्हीमुळे संपली.
मुळात हे दूरचित्रवाणी केंद्र आले कुठून???
गमतीदार गोष्ट आहे. १९७१ च्या भारत पाक युध्दानंतर दूरचित्रवाणी केंद्रे तातडीने उभारायचा निर्णय उच्च स्तरावर घेतला होता. पण परकीय चलनाचा तुटवडा होता. पश्चिम जर्मनीने मदतीचा करार केला होता. त्यानुसारच दूरचित्रवाणी केंद्रासाठी लागणारी सामुग्री पुरवायचे त्यांनी कबूल केले. म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळी काही तात्पुरती केंद्रे उभारली होती. त्यातलेच एक मुंबईचे. एक कोटीचा टीव्ही टॉवर (सिमेन्सने बनविलेला) आणि एक कोटीची सामग्री ज्यात फिलिप्सचा ट्रांसमीटर, चार टीव्ही कॅमेरे, चार मॉनिटर्स, एक रेकॉर्डिंग मशीन, एक ओबी व्हँन आणि दोन टेलीसिने मशीन (सिनेमा दाखवायला) यांचा समावेश होता. पश्चिम जर्मनीने ती सगळी स्वतःच्या खर्चाने मुंबईत आणून बसवली आणि दूरचित्रवाणी केंद्र सुरु केले. याची क्षमता होती रोज फक्त एक तास प्रक्षेपणाची. आपल्या हुशार तंत्रज्ञांनी क्षमता वाढवून आठ तासांची केली.
अनेक वर्षानी एक जर्मन तंत्रज्ञ मुंबईत आला. हे केंद्र कसे चालले आहे पहायला. रोज आठ तास प्रक्षेपण होते हे समजल्यावर त्याला आश्चर्य वाटले. त्यावेळचे दूरचित्रवाणी संच वीएचएफ (वेरी हाय फ्रिक्वेन्सी) तत्वावर चालणारे होते. सत्तर ऐंशी मैलापलीकडे कार्यक्रम दिसत नसत. यासाठी सहक्षेपण मनोरे उभारून सिग्नलची तीव्रता वाढवत. पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी सिंहगडावर १९७२ च्या अखेरीस सहक्षेपण केंद्र उभारले आणि १९७३ च्या पाडव्याला बँड तीन चॅनेल पाचवरुन सहक्षेपण सुरु झाले तेव्हा राजा केळकर म्युझियमवर तयार केलेला लघुपट दाखवला.
पुणे आणि परिसरात मुंबई दूरचित्रवाणीचे कार्यक्रम दिसायला लागले. उन्हाळ्यात एक वेगळीच समस्या उभी राहिली. कराची टीव्हीचे प्रक्षेपण दिसायचे आणि मुंबई टीव्हीचे बंद व्हायचे. असे का होते याचा शोध घेतल्यानंतर समजले की उन्हाळ्यातल्या सफेद ढगांमुळे आरश्यासारखा थर जमतो म्हणून असे घडते. हाच प्रकार मद्रासला पण व्हायचा. कलकत्ता टीव्ही दिसायचा. मग कालांतराने सूक्ष्मलहरी यंत्रणेचा वापर दूरचित्रवाणी प्रक्षेपणासाठी सुरु झाला आणि ही समस्या मिटली. एका जमान्यात रेडियोमध्ये काम करणारे रेडियो स्टार म्हणून ओळखले जात तसेच टीव्ही स्टार तयार झाले. आधी आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी एकच विभाग होता. यामुळेच केशव केळकर, विश्वास मेहंदळे, याकूब सईद, वा.रा. सराफ ही मंडळी दूरचित्रवाणीला आली. पुढे प्रसारभारतीची स्थापना झाली आणि हे दोन्ही विभाग स्वतंत्र झाले. दूरचित्रवाणीला दूरदर्शन नाव दिले गेले. लोगो आणि सिग्नेचर ट्यून बदलली. एशियाडच्या निमित्ताने उपग्रहाचा वापर करुन सबंध भारतात दूरदर्शनचे जाळे विणले गेले. दूरदर्शन रंगीत झाले. नॅशनल नेटवर्क जोडल्यानंतर प्रादेशिक कार्यक्रम कमी झाले. प्रायोजित कार्यक्रम वाढत गेले. तरीपण एकमेव असलेले दूरदर्शन सर्वांचे लाडके होते. ८० च्या दशकात उपग्रह वाहिन्या सुरु झाल्या आणि दूरदर्शनचे दिवस संपले. तरीही तो वैभवशाली काळ विसरताच येत नाही.
©️विवेक पुणतांबेकर.