#लक्ष्मी
आज मोघे काकूंची सकाळपासून कामाची गडबड चालू होती. अधिक मासाचे वाण घेण्यासाठी त्यांनी लेक जावयाला घरी बोलवले होते. सोबतच मुलाला आणि सूनबाईला देखील. त्या निमित्ताने सर्वांची भेट होईल असं त्यांचं म्हणणं.
दुपारची जेवणं झाली. सूनबाईंनी सगळं आवरून घेतलं आणि लेक-जावयाला द्यायच्या वाणाची तयारी करून ठेवली. मुलीच्या लग्नानंतर हा पहिलाच अधिकमास त्यामुळे तिच्यासाठी साडी, जावईबापूंना चांदीचे ताट, अनारसे सगळी साग्रसंगीत तयारी मोघे काकूंनी करुन ठेवली होती.
लेक-जावई अगदी खूष झाले.
“सगळा कार्यक्रम झाला आहे तर आता मस्त चहा ठेवते कडक”, असं म्हणत सूनबाई उठल्या तसं काकूंनी तिला थांबवलं.
“आता तुम्ही दोघे बसा पाटावर.” त्यांनी लेकाला आणि सूनेला उद्देशून सांगितल्यावर सगळेच जरा गोंधळले.
“अगं आई आज तर आमचा मान असतो ना?”
लेकीने असं विचारता क्षणी मोघे काकू उत्तरल्या, “खरंय तू म्हणतेस ते. लेक-जावयाला लक्ष्मीनारायण समजून त्यांना वाण द्यायचे असते पण माझा मुलगा आणि सून सुद्धा माझ्या दृष्टीने लक्ष्मीनारायणचे रूप आहेत. तू महिन्या, दोन महिन्यांत एखादेवेळी येतेस, रोज फोनवरून आमची चौकशी करतेस तसंच माझी सूनही सतत लक्ष देत असते. कधीही आली तरी घरात काय आहे, काय नाही बघून नसेल ते आणून ठेवते, बारीकसारीक कामं न सांगता करते, सगळे सण, कुळधर्म कुलाचार आनंदाने साजरे करते. एकवेळ तुझा दादा कर्तव्यात कसूर करेल पण वहिनी नाही इतका विश्वास आहे मला तिच्यावर. आज जितका तुमचा तितकाच तिचाही मान आहे. लक्ष्मी आहे ती या घरची.” असं म्हणत मोघे काकूंनी सूनेला वाण दिले.
आपण निरपेक्ष भावनेने केलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींचे सासूबाईंनी केलेले कौतुक ऐकून आणि हातातले वाण बघून सूनबाईंचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. काही न बोलता ती फक्त सासूबाईंचा आशीर्वाद घ्यायला वाकली तशी काकूंनी तिला “माझी लक्ष्मी ती” म्हणत प्रेमाने जवळ घेतले…
– उत्तरा कुलकर्णी
(ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे. केवळ पात्रांची नावे बदललेली आहेत. आमच्या ओळखीतल्या एक काकू अधिकमासात जावयासोबत सूनेलाही वाण देतात. सूनेचे आपल्या घरातील स्थानही महत्त्वाचे आहे, तिचाही सन्मान करावा हा यामागचा निर्मळ उद्देश. अर्थात याबाबतीत प्रत्येकाची आपली स्वतंत्र मतं असतीलच मात्र केवळ कथा म्हणून आनंद घ्यावा ही विनंती.)