नमस्कार,
पुणे आणि पुणेकर ह्यांना अनेक जण नावे ठेवताना आढळतात. ह्याचे कारणच मला अद्याप आढळले नाही..
पण तरी त्या नावे ठेवणार्यांना एक उत्तर द्यावे असे मात्र आज ठरवले आहे..
ही कविता समस्त पुणेकरांनी अगदी अभिमानाने पुढे पाठवावी अशी इच्छा आहे..
आणि पुणेतरांचे तर स्वागत पहिल्या कडव्यातच केले आहे!
पुण्यवान!
पुण्यवान किती आम्ही खरोखर
नागरिक हो पुण्याचे
विद्येच्या माहेरी करितो
स्वागत साऱ्या साऱ्यांचे ||१||
शुध भाषा आम्ही बोलतो
चोखंदळ हो भलतेच
इथून पावती घेऊन मिरवती
तरी पुणे ह्यांना सलतेच..||२||
जन्मापासून आम्हीच पेशवे
रुबाब का आम्ही करू नये ?
पाट्या वाचून हसणार्यांनी
पाऊलच पुण्यात ठेऊ नये ||३||
मिसळ पुणेरी, अन चितळ्यांची
करू नका कुणी बरोबरी
आमच्या इकडे अन्नपूर्णा हो
पाणी भरते घरोघरी.. ||४||
असे बिघडले , तसे बिघडले
कशास करता तक्रारी
जगभरातले लोक नांदती
ही पुण्यभूमीची जादूगरी ||५||
पुण्यवान हो आम्ही पुणेकर
गुण अजून मी काय गावे?
इथे जन्मण्यासाठी ऐका
शत जन्माचे पुण्य हवे ||६||
शेवटचे एकच सांगून ठेवते
ठेवलीत जर नावे पुण्याला
दुर्लक्ष करूनि हेच म्हणू आम्ही
द्राक्षे आंबट कोल्ह्याला!! ||७||
अश्विनी देशपांडे
२२/०९/२०२०
(पुणेकर)