लता मंगेशकरांचा स्वरसुगंध व त्यांच्या नावाचा ” परफ्यूम “!
( आणि त्यांच्यावरील कट्यारीचा फसलेला प्रयोग )
जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना येत्या २८ सप्टेंबरला ९१ वर्षे पूर्ण होत आहेत. ब्रह्मदेव आणि सरस्वती यांनी खूप विचारपूर्वक निर्माण केलेले हे एक अद्भुत स्वरशिल्प ! त्यांच्या सुरुवातीच्या काळात अनेक तत्कालीन नामवंत पंडित आणि खॉंसाहेबांनी, लतादीदींबद्दल कांहीशा असे उद्वेगाने म्हटले होते की ‘ कंबख्त, ये कभी सुरोंमे गलती करतीही नही ! ‘
लतादीदींना किती संपन्न वारसा लाभला होता ! आजोबा गणेशभट नवाथे ( हर्डीकर ) हे स्वत:, गोवाधिपती श्री मंगेशाचे अभिषेकी, तर आजी येसूबाई या संगीतसंपन्न ! आईचे वडील शेठ हरिदास रामदास हे श्रीमंत गुजराती जमीनदार आणि व्यावसायिक होते. वडील दीनानाथ मंगेशकर हे तर खुद्द स्वतःच संगीतातील एक मोठे घराणे म्हणावे इतके संगीतसंपन्न ! महाराष्ट्राच्या नाटक आणि संगीत क्षेत्राला अनेक भरजरी अलंकार चढविणाऱ्या दीनानाथांचे वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी निधन झाले. त्यावेळी लतादीदी फक्त तेरा वर्षांच्या होत्या. पुढचा प्रवास कठीण होता. त्या सर्वात मोठ्या आणि अन्य ४ भावंडे व आई असे मोठे कुटुंब होते. त्या जेव्हा या गायन / चित्रपट क्षेत्रात आल्या तेव्हा या क्षेत्राची आणि त्यांच्या कुटुंबाची खूपच मोठी विचित्र परिस्थिती होती. कांहीशा जाड्या आवाजाच्या आणि मुस्लिम पद्धतीची,अनुनासिक गायकी जपणाऱ्या
गायिकांचे संगीतक्षेत्रात वर्चस्व होते. त्यांच्या आवाजापुढे लतादीदींचा आवाज हा अतिशय कोमल आणि बारीक ( पतला ) म्हणून त्यांना चक्क नाकारले गेले होते. पण सोने ते सोनेच असते हे नंतर सिद्ध झाले. सूर, स्वर, संगीत, चित्रपट, बॉलिवूड
म्हणजे फक्त लता मंगेशकर हे नंतर पक्के झाले !
एक आख्यायिका बनून राहिलेल्या लतादीदींच्या आयुष्यामध्ये अत्यंत वेगळ्या, अभूतपूर्व वाटाव्यात अशा कितीतरी गोष्टी घडल्या आहेत. त्यातील कांही गोष्टी आपण पाहूया. लतादीदींचे नाव म्हणजेच चित्रपट संगीत असे समीकरण जरी झाले असले तरी त्यांच्या आयुष्यातील पहिलेच चित्रपट गीत हे चित्रपटातूनच चक्क कापण्यात आले होते. तर त्यांचे जे पहिले मराठी गीत पडद्यावर आले त्याच चित्रपटात त्यांनी छोटेसे कामही केले होते. त्यांचे पहिले हिंदी चित्रपट गीत हे मराठी चित्रपटात गायलेले होते.
त्यांचे असेच कांही वेगळे विक्रम पाहू या.
१) त्यांनी गायलेले पहिले आणि चित्रपटातूनच कापून टाकलेले गीत– नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी. मराठी चित्रपट — किती हसाल – १९४२
२) त्यांचे पहिले चित्रपट गीत आणि भूमिका केलेला चित्रपट– नटली चैत्राची नवलाई.. चित्रपट- पहिली मंगळागौर – १९४२
३) पहिले हिंदी चित्रपट गीत, हे मराठी चित्रपटात गायलेले होते — चित्रपट- गजाभाऊ – १९४३
४) हिंदी चित्रपट सृष्टी म्हणजे बॉलिवूड आणि इंग्रजी चित्रपट सृष्टी हॉलिवूड या दोन जगातील सर्वात मोठ्या चित्रराजवटी ! बॉलिवूडच्या या स्वरसम्राज्ञीने हॉलीवूडच्या इंग्रजी भाषेत खूप गाजलेले पण फक्त एकच गीत गायले आहे. सुप्रसिद्ध गायिका ऍन मरे हिचे प्रसिद्ध गाणे ‘ यू निडेड मी ‘ हे गीत ( याला केवळ युट्युबवरच ९१ लाख प्रेक्षक लाभले आहेत ) तिच्याच विनंतीवरून लता मंगेशकर यांनी गायले आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला लतादीदींचा उल्लेख गंमतीने जेव्हा ऍन मंगेशकर असा केला गेला तेव्हा खुद्द लतादीदींनाच हसू आवरले नाही. त्यांनी गाण्याची सुरुवात केल्यावर आणि गीत संपल्यावर हॉलमध्ये झालेला टाळ्यांचा कडकडाट ऐकून आपल्यालाही आनंद होतो. लतादीदींचा आवाज इंग्रजी गीतात इतक्या वर चढतो की तो बहुधा मूळ इंग्रजी रसिकांनी प्रथमच अनुभवला असावा. या सर्व गोष्टी आपल्याला खालील लिंकवर अनुभवता येतील.
ऍन मरे हिच्या मूळ गीताची लिंक-
लताबाईंनी गायलेल्या गीताची लिंक-
५) सर्वोच्च अपमान आणि सर्वोच्च सन्मान — असे म्हणतात की लतादीदी लौकिक अर्थाने फक्त एकच दिवस शाळेत गेल्या. पण त्यांना जगातील न्यूयॉर्कसह ६ प्रतिष्ठित विद्यापीठांनी मानद पदव्या देऊन आपल्या विद्यापीठाचा सन्मान वाढविला आहे. संगीतकार गुलाम हैदर हे लतादीदींना त्या काळचे नामवंत दिग्दर्शक शशधर मुखर्जी यांच्याकडे घेऊन गेले. तेव्हा त्यांनी लतादीदींचा आवाज फारच पातळ आहे असे सांगून नाकारला. त्याचवेळी गुलाम हैदर यांनी संतापून त्यांना सांगितले की उद्या तुम्ही गाण्यासाठी लतादीदींचे पाय धरायला याल. लतादीदींकडून आज अगदी प्रेमाने राखी बांधून घेणाऱ्या दिलीपकुमार
यांनी सुरुवातीला त्यांच्याबद्दल, ” इसके हिंदी और उर्दू गानोंमे मराठी की बू आती है ” असे उदगार काढले होते. पण भारतीय शास्त्रीय संगीताचा अत्यंत उत्तम वापर करणारे नौशाद हे मात्र आपली सगळी सांगीतिक कारकीर्द, लतादीदींच्या ” है इसी में प्यार की आबरू ” या एकाच गझलवरून ओवाळून टाकायला तयार होते. अर्थात यात संगीतकार मदनमोहन यांचा मोठा वाटा आणि नौशाद यांचा मोठेपणा होता. या लतादीदींना शेकडो पारितोषिके, सन्मान, मानद पदव्या आणि उदंड कीर्ती लाभली. भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान ” भारतरत्न ” ही त्यांना लाभले.
६) लतादीदींवर ” कट्यार “चा प्रयोग — ” कट्यार काळजात घुसली ” या मराठी नाटकात, राजगायक असलेल्या पंडितजींचा गायकीमध्ये पराभव करण्याऐवजी, विरोधक त्यांच्यावर रासायनिक प्रयोग करून त्यांचा आवाज घालवितात, अशी घटना आहे. १९६२ मध्ये लतादीदींवर असा प्रयोग झाल्याचे, त्यांच्या विकिपीडियातील परिचयामध्ये म्हटले आहे.त्यांना स्लो पॉयझनिंग व्हावे असे विष घातले गेले होते. त्यामुळे त्या खूप गंभीर आजारी झाल्या. वेदना आणि विषप्रयोग यामुळे त्या सुमारे ३ महिने अंथरुणाला खिळून होत्या. पण वैद्यकीय उपचार, मंगेशाची कृपा आणि आपले सुदैव यामुळे त्या त्यांचा आवाज सुरक्षित राहून बऱ्या झाल्या. पुन्हा अधिक जोमाने गायल्या. या घटनेनंतर त्यांचा स्वयंपाकी गूढपणे गायबच झाला. हे वाचल्यावर असा विचार येतो की १९६७ मध्ये रंगमंचावर आलेल्या ” कट्यार काळजात घुसली ” या अजरामर मराठी संगीत नाटकाची कल्पना, लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांना या प्रसंगावरून तर सुचली नसेल ?
७) चित्रपट सृष्टीतील तीन पिढ्यांमधील आणि बहुतेक सर्व नायिकांसाठी लतादीदी गायलेल्या आहेत. सुमारे २० भाषांमध्ये जवळजवळ ३०००० हुन अधिक गीते त्यांनी म्हटली आहेत. पण त्याचा अचूक तपशील त्यांनी ठेवलेला नाही. त्यांनी कुठलीही मागणी केलेली नसूनही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने १९७४ मध्ये त्यांच्या नावे हा विक्रम आपणहून नोंदविला. नंतर १९९१ मध्ये गिनीज बुकनेच हा विक्रम काढून टाकला. ही एक अजबच गोष्ट म्हणायला हवी.
८) त्यांच्या आवाजाची परिणामकारकता खूपच अचंबित करणारी होती. ” ऐ मेरे वतन के लोगो ” हे त्यांचे गीत ऐकतांना खुद्द पंडित नेहेरुंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते.
९) आणखी एक अचंबित करणारी गोष्ट म्हणजे लतादीदींनी, ऍडोरा या हिरे निर्यात कंपनीसाठी २००५ मध्ये, स्वरांजली या नावाचा हिऱ्यांच्या दागिन्यांचा सेट डिझाईन करून दिला होता. या सेटचा ख्रिस्ती या जगप्रसिद्ध लिलाव कंपनीने १,०५,००० पौंड इतक्या प्रचंड किंमतीला विकला आणि ती रक्कम काश्मीरच्या भूकंप ग्रस्तांच्या मदत निधीला देण्यात आली.
१०) हिंदी गीतांसाठी सर्वोत्कृष्ट गायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार अनेकदा जिंकल्यावर, लतादीदींनी १९६९ मध्ये पुरस्कार समितीला, नव्या गायिकांसाठी या पुढे आपला पुरस्कारासाठी विचार करू नये असे सांगितले.
११) विदेशी टपाल तिकीट — भारतीय टपाल खात्याच्या आजवरच्या प्रथेप्रमाणे जिवंत व्यक्तींवर टपाल तिकीट काढले जात नाही. याला अपवाद फक्त — डॉ. विश्वेश्वरय्या, महर्षी कर्वे, राजीव गांधी, मदर तेरेसा आणि सचिन तेंडुलकर ! पण विदेशात असे नियम नसल्याने साओ टोम अँड प्रिंसीप या आफ्रिकेतील देशाने २००९ मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांवर टपाल तिकिटे प्रसिद्ध केली होती. अर्थातच त्यात लता मंगेशकर ( आणि अशा भोसले ) यांचा समावेश होता.
१२) आता त्यांना ९१ वर्षे पूर्ण होत आहेत म्हणजे लगेच त्यांचे शेवटचे गीत कोणते याची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या वर्षी ३० मार्च रोजी त्यांनी ” सौगंध मुझे इस मिट्टीकी ” हे आपल्या सैनिकांना आणि देशाला अर्पण केलेले सुंदर गीत हेच तूर्त तरी शेवटचे असावे. ते आजवर युट्युबवर ११ लाखाहून अधिक लोकांनी ऐकले आहे. ( त्यांनी गायलेल्या ” आता विसाव्याचे क्षण ” या मराठी गाण्याची चर्चा होती पण ते खरे नाही ) त्याची लिंक–
१३) दंतकथा आणि चमत्कार वाटावा अशा या लतादीदींच्या नावाने एक सुंदर परफ्यूम बाजारात आला होता. विदेशात अशा सुप्रसिद्ध कलावंतांच्या नावाने बाजारात विविध वस्तू आणण्याचा प्रघात आहे. आपल्याकडील अमिताभ बच्चन यांच्या नावे एक परफ्यूम आला होता. अमिताभ यांच्या नावे आला म्हणजे लगेचच, स्वत:ला सुपरस्टार समजणाऱ्या शाहरुख खानच्या नावाचाही आला. पण लतादीदींच्या नावाचा LATA EAU DE PARFUM हा परफ्युम मराठी उद्योजक श्री. दीपक काणेगावकर यांच्या गंधसुगंध या कंपनीने तयार केला होता. परफ्यूमच्या दुनियेत Eau De Cologne, Eau De Toilette आणि Eau De Parfum असे प्रकार येतात. त्यात Eau De Parfum हा प्रकार अत्यंत उच्च दर्जाचा असतो. तसेच हा परफ्युम देखील लतादीदींच्या संगीतातील सर्वोच्च स्थानाला साजेलसा आहे. या साठी लागलेला सर्व कच्चा माल, त्याचे कंटेनर्स, पॅकिंग हे सर्व सर्वोच्च दर्जाचे आणि फ्रान्समधून आयात केलेले होते. सुगंधामध्ये ताजेपणा, त्याचा दरवळ, रेंगाळणारा धुंद गंध या गोष्टींसाठी या परफ्युममध्ये सर्वोत्तम आणि शुद्ध असे ७८ प्रकारचे विविध घटक वापरलेले होते. लतादीदी विविध छटांची गीते जशी अत्यंत अप्रतिमपणे गातात. तसे या एकाच पर्फ्युममध्ये जाई, गुलाब, चंदन, कस्तुरी,अंबर, व्हॅनिला अशा अनेक सुगंधांचे मिश्रण होते. या परफ्यूमचे ज्या कार्यक्रमामध्ये लतादीदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले त्या कार्यक्रमाला हजर राहण्याचे सदभाग्य मला लाभले होते. तेव्हा आम्हाला या परफ्यूमची छोटी कुपी स्नेहभेट म्हणून देण्यात आली होती.
१४ ) आता आणखी एका चमत्काराची अपेक्षा आहे. लतादीदींना शतायुष्य लाभावे आणि त्यांनी १०० व्या वर्षी एक गीत गाऊन आपला सांगितिक प्रवास थांबवावा. हा सुद्धा एक जागतिक चमत्कार ठरेल !
असा चमत्कार घडू देच, अशी परमेश्वराला आग्रहाची विनंती आणि लतादीदींना हार्दिक शुभेच्छा !!
( या लेखासोबत असलेली चित्रे आणि त्याबद्दलची माहिती ही माझ्या संग्रहातील आहे. अन्य अनेक संदर्भ व चित्रफितीच्या
लिंक्स — गुगल, युट्युब व विकिपीडियाच्या सौजन्याने )
( हा लेख व छायाचित्रे शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावीत ).
*** मकरंद करंदीकर. makarandsk@gmail.com