मुकेश काढतो
जुन्या जखमांच्या खपल्या…
रफी मारतो फुंकर…
किशोर नाचतो इथून तिथून…
तलत लावतो मलम…
तलम जखमांवर!
बेगम अख्तर चिरत जाते
आरपार धारदार पात्यासारखी…
नूरजहान आपलं काळीज काढून ठेवते
आपल्याच तळहातावर…
सुरैय्या मिसळत राहते रक्तात
मद्याच्या रंगीत पेल्यातल्या
बर्फाच्या शुभ्र तुकड्यासारखी…
लता हवेच्या झुळकेसाखी
फुलवत राहते
आतले लसलसते निखारे…
आशा नाचवते मनाला
ये रेडियोका विविध भारती स्टेशन है।
रात के साडे ग्यारह बज चुके है।
आप सुन रहे है हिट -सुपरहिट…
जो तो शोधतोय
ज्याच्या त्याच्या नरगिसला
गाण्यात आणि…..
वहिदा चालत जाते
थेट काळजावरून…
खडीसाखरेसाखी
विरघळत राहते
ज्याची त्याची मधुबाला…
जुन्या विझलेल्या गल्ल्यांमधे
घेऊन जातो साहिर…
बोट धरून आपल्याला
गुलजार नेतो
हरवलेल्या जगण्यात
‘दिल ढूंढता है फिर वही
फुरसत के रात दिन’ म्हणत…
रात्र नशेसारखी चढत जाते
आणि
आजकी मैफिलका
ये आखरी नगमा
असं खर्जातल्या आवाजात म्हणतो निवेदक…
…आ जाओ तडपते है अरमा
अब रात गुजरनेवाली है
अब रात गुजरनेवाली है….
कुठे निघून गेलात
मला असं तडफडत एकटं सोडून…
…माझ्या सोन्यासारख्या दिवसांनो!
कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन!!!