बालपणीचे_नादठसे (Childhood_Soundprints)
आता आजकाल सोसायट्यांमध्ये ‘फेरीवाल्यांना मनाई’ ही पाटी अगदी ठळक लावलेली असते. मला सहज माझ्या लहानपणीचे दिवस आठवले. तेव्हा रोज दारावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची नेहमी किती वर्दळ असायची.
तेव्हा पुण्यात रोज सकाळी साडेदहाला भोंगा व्हायचा. त्याच्या सुरात सूर मिसळून शेजारचं कुत्रं गळा काढायचं. हे आवाज विरले की हमखास काठी टेकत हातातला डबा वाजवत ‘भाकर तुकडा वाढा माई’ असं म्हणत एक भिकारी यायचा. त्यानंतर दोन तासांनी एक भिकारीण यायची. या दोघांनी आमचा भाग वाटूनच घेतला होता जणू.
‘रॉकेल’ असं ओरडत सायकलवरून दोन मुलं यायची. त्यांचं फक्त ‘केल’ एवढंच ऐकू यायचं. तशीच एक बोहारीण यायची. तिचंही ‘भांडई ssss’ मधला भां घशात जायचा आणि शेवटचे दोन शब्द तेवढे ऐकू यायचे. मग आम्ही बहिणीही घरात त्यांची नक्कल करत जोरात ओरडायचो, खिदीखीदी हसायचो आणि खिडकीच्या व्हेंटिलेटरमधून हळूच चोरून पहायचो.
अशीच भाजीवाली, केळेवाली, ‘रद्दी पेपूआ ss र’ असं ओरडत सायकलवरून येणारा रद्दीवाला, ‘भईं ssss गा sss र्रर्र’ असं विचित्र ओरडणारा भंगारवाला, कापूस पिंजायच्या धनुकलीचा टणत्कार करत येणारा पिंजारी वगैरे मेंबर ठराविक वेळेला अगदी हमखास यायचे.
‘विळी, चाकू, सूरी, कात्रीला धा ss र लावा धा ss र्रर्र’ असं ओरडत धारवाला यायचा. पाठोपाठ कुठेतरी धार लावताना येणारा तो विशिष्ट आवाज आला की त्यातून उडणाऱ्या त्या ठिणग्या पहायला आम्ही बच्चेकंपनी उगीचच कोंडाळं करून बघत उभे राहायचो. तशीच ‘कल्हई लावायची का ताई’ म्हणून घरोघरी विचारत येणारी ती बाई. मग आम्हीही तिच्यासोबत घरोघरी जाऊन विचारायचो. एखाद्या बाईने आपली तांब्या-पितळेची भांडी कल्हई द्यायला काढली की आम्हीही ती सगळी प्रोसेस बघत टुकत उभे रहायचो. नंतर आतून एकदम चकचकीत झालेली ती भांडी पाहून खुश व्हायचो.
आठवड्यातून एकदा ती अल्युमिनियमची पेटी वाजवत, ‘खा sss री बिस्कीट’ असं खर्जात ओरडणारा भय्या, ‘घ्या, झाडाच्या कुंड्या sssss’ असं ओरडणारा कुंडीवाला, ‘गोधड्या शिवायच्या का गोधड्या’ असं टिपेच्या स्वरात ओरडणारी बाई, ‘सुई घे, पोत घे, बिबं घे’, असं तालात गाणं म्हटल्यासारखी हाळी देणारी बाई अशी अनेक मंडळी …. त्यांचे चेहरे विशेष लक्षात नाहीत. पण त्यांचे आवाज मात्र स्मरणात अगदी पक्के बसले आहेत.
अधूनमधून डोंबारी, पोतराज, मदारी, दरवेशी ही मंडळी त्यांचे खेळ घेऊन यायची. आम्ही उत्कंठेने त्यांचे खेळ बघत रस्त्यात उभे रहायचो. पण खेळ संपल्यावर पैशांची थाळी फिरू लागली की मात्र आत पळून जायचो. आज त्या वागण्याची खंत वाटते, पण तेव्हा सगळेच असे करायचे. त्यांना पैसे देणारी फार मोजकी घरं होती. कधी कुणी जुने कपडे द्यायचे तर कुणी शिधाही द्यायचे.
दसऱ्याच्या सुमारास विशिष्ट वाद्य वाजवत येणारे नंदीबैलवाले, होळीच्या आधी विशिष्ट गाणी म्हणत ठेक्यावर नाचत पैसे मागणाऱ्या लमाणी बायका, हिवाळ्यात भल्या पहाटे दाट धुक्यात एका हातात कंदील घेऊन दुसऱ्या हातात कुठलं तरी वाद्य वाजवत स्वतःच्या तंद्रीत भजनं गात जाणारा पिंगळा, मोरपिसांची टोपी घालून खड्या आवाजात गाणी म्हणत येणारे वासुदेव, ग्रहण सुटल्यावर ‘दे दान-सुटे गिराण’ ओरडत येणारे असे अनेक अनेक अनामिक फेरीवाले हे आमच्या बालपणाचा अतूट हिस्सा आहेत.
आता विचार करताना वाटतं की आज तर दारावर फेरीवाले येणेच बंद झालेत. तर मग आपल्या मुलांना त्यांचं बालपण आठवताना कोणकोणते आवाज आठवतील बरं?
© स्वाती जोशी