#अमरप्रेम – १९७२
दुपारच्या आलं घालून केलेल्या चहाच्या वेळी कचोरी खाणं हा एक प्रसिद्ध प्रघात बंगालमध्ये आहे, त्या डिशला पण हिंगेर कचोरी असे काहीसं नाव आहे. याच नावाने बिभूतीभुषण भट्टाचार्य यांनी एक शाॅर्ट स्टोरी लिहीलेली त्याचा बंगाली सिनेमा अरविंद मुखर्जी यांनी निशिपद्म या नावाने बनवला. उत्तम कुमार आणि सावित्री चॅटर्जी अभिनीत निशिपद्म जेव्हा शक्ती सामंता ने पाहिला तेव्हा त्याचं हिंदीत संस्करण करायचं ठरवलं आणि त्याचं हिंदी संस्करण म्हणजे शक्ती फिल्म्स चा अमर प्रेम ही अजरामर कलाकृती होय.
अरविंद मुखर्जी यांनाचा ही पटकथा लिहायला दिली आणि डायलॉग लिहिले रमेश पंत यांनी. संपूर्ण बंगाल आणि कलकत्ता या बंगाली मातीच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा चितारलाय. आत्तापर्यंत बहुतेक सर्वांनी हा सिनेमा पाहिलेला आहे, मी अगदीच थोडक्यात याची फक्त आऊटलाईन देतो.
मूल होत नसलेल्या पुष्पाचा (शर्मिला टागोर) नवरा दुसरं लग्न करतो आणि तिला नंतर मारहाण करायला लागतो, यावरून पुष्पा घर सोडून माहेरी येते पण माहेरी तिला थारा मिळत नाही, तरुण असल्याने गावातील काही वाईट पुरुषांची नजर तिच्यावर खिळते यावरून एक दिवस ती आत्महत्या करायचा प्रयत्न करताना तिला गावातील नेपाल बाबू (मदन पुरी) वाचवतो, पण हा नेपाल बाबू पण बदमाश असतो तो तडक पुष्पाला नोकरी द्यायच्या आमिषाने कलकत्ता मधील वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका मावशीला विकतो. भाबडी पुष्पा आपण फसले गेलो आहोत हे ओळखते पण आयुष्य जगण्यासाठी ती हे स्वीकारते. गाणं उत्तम येत असलेली पुष्पा एक दिवस संध्याकाळी गाणं गात असते आणि त्याचवेळी शहरातील विख्यात बिझनेसमन आनंदबाबू (राजेश खन्ना) जो चुकीने टांगेवाल्या कडून या वस्तीत आणला जातो, नशेत असलेल्या आनंदबाबूचे पुष्पाचं गाणं ऐकून पाय थबकले जातात आणि तो हळूवार गाण्याचा माग काढत पुष्पाच्या समोरच गाणं ऐकायला येऊन बसतो. आनंदबाबू मंत्रमुग्ध होतो.
पुढे आनंदबाबू पुष्पाचा रेग्युलर विजीटर होतो. पुष्पाच्याच मोहल्याच्या पलिकडे एक बिर्हाड रहायला येते. महेश (सुजित कुमार) पहिल्या बायकोच्या जाण्यानं लहान नंदू साठी दुसरं लग्न करतो परंतु ही सावत्र आई लहानग्या नंदूला छळायला लागते. एकदा खेळता खेळता नंदू पुष्पाच्या घरात हळूच डोकावतो, पुष्पा त्याचं कौतुक करते, लहानग्या नंदूत पुष्पा गुंतत जाते, तिचं मातृत्व जागं होतं, लग्नाचं अपयशी आयुष्य असलेला आनंदबाबू पण लहानग्या नंदूला पुत्रवत मानू लागतो आणि अशा तर्हेने तीन भिन्न लोकं ज्यांचा काही संबंध नसतो त्यांचे एखाद्या कुटूंबाप्रमाणे प्रेम वाढू लागते. एक दिवस नंदू आजारी पडल्यावर नंदूच्या वडलांकडे उपचार करायला पैसे नसतात तेव्हा पुष्पा आनंदबाबू ला नंदूचे उपचारासाठी डाॅक्टर पाठवण्याची विनंती करते. आनंदबाबू पण तत्परतेने पावले उचलतो. नंदू नंतर बरा होतो, या उपकाराचे पांग फेडण्यासाठी नंदूचे वडील पुष्पाला साडी भेट देतात पण पुष्पा ते नाकारते परंतु एका भावाने ही भेट दिली आहे असं समज असे नंदूचे वडील (महेश) सांगतात तेव्हा ती भेट ती स्विकारते.
पुढे नंदूच्या वडिलांची बदली होते तेव्हा त्यांना कलकत्ता मधील घर सोडायला लागते, काही वर्षांनी नंदू मोठा होतो आणि त्याच शहरात नोकरीत बदली होते म्हणून परत येतो. त्याला पुष्पा आणि आनंदबाबू आठवत राहतात. एकदा आनंदबाबू आपल्या डाॅक्टर मित्राकडे बसलेला असतो गप्पा मारत तेव्हा नंदू आपल्या मुलाच्या औषधासाठी डाॅक्टर ( सत्येन कपू) येतो आणि अचानक तिथे त्याला आनंदबाबू भेटतो. पुष्पाच्या भेटीसाठी अगतिक झालेला नंदू पुष्पाला शोधत असतो आणि एका असहाय्य वळणावर पुष्पा नंदू आणि आनंदबाबू यांना भेटते, वृद्ध झालेली पुष्पा एका धर्मशाळेत भांडी घासायची नोकरी करत असते तिथेच तिला तिचा पहिला नवरा (मनमोहन) असल्याची खबर मिळते, पुढे तो नवरा मरतो. शेवटी आनंदबाबू या असहाय्य पुष्पाला जी नशीबाचे धक्केच खात असते तिला घेऊन जायची विनंती नंदूला करतो आणि नंदू पुष्पाला आपल्या सख्ख्या आई प्रमाणे आपण संभाळ करु असे वचन आनंदबाबू ला देतो – अमर प्रेम इथेच संपतो.
१९६९ च्या आराधनाने सुपरस्टार झालेला राजेश खन्ना जरी या सिनेमात हीरो असला तरीही राजेश खन्ना ही पहिली चाॅईस शक्ती सामंता ची नव्हती कारण स्त्री प्रधान सिनेमात त्याला कितपत वाव मिळेल ही शंका शक्ती सामंतांना होती त्यामुळे आधी यात राजकुमार ला रोल द्यावा असा विचार त्यांचा चालला होता परंतु राजेशला या रोलची कुणकुण लागताच त्यांने हा रोल बिनधास्तपणे स्विकारला. यासाठी त्यांने निशिपद्म किमान २० वेळा पाहिला, मूळ कॅरेक्टर चे नाव अनंताबाबू असे होते पण राजेशचा आनंद हीट झालेला होता त्यानं हेच नाव कॅरेक्टर चं करावं अशी विनंती शक्तीदांना केली. शर्मिला टागोर चा हा सैफ अली खान याच्या जन्मानंतर स्विकारलेला पहिलाच सिनेमा, कटी पतंग तिला त्यामुळे करता आला नव्हता, तिने ही कथा ऐकल्यानंतर पहिल्या झटक्यात तिचा होकार आला. पण माझ्यामते या सिनेमाचा खरा नायक होता संगीतकार राहुल देव बर्मन उर्फ पंचम.
पंचमच्या संगीताबद्दल जर अमर प्रेम वर लिहीताना सांगितले नाही तर मलाच अस्वस्थ होत राहील. शक्ति सामंता ने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की अमर प्रेम च्या वेळी पंचम जे स्वतःला सकाळी ९ वाजता खोलीत कोंडून घ्यायचा ते रात्री ९ वाजताच बाहेर यायचा. पंचम फक्त पाश्चात्य प्रकारचेच संगीत देतो असे जे टीकाकार म्हणायचे त्यांना अमर प्रेमचे संगीत एक सणसणीत चपराक आहे. सिनेमात टोटल सहा उपशास्त्रीय संगीतावर आधारीत गाणी आहेत. सिनेमा ओपन होतानाच सचिन देव बर्मन यांचा स्वर ऐकू येतो – डोली मे बिठाए के कहार हे एकमेव गाणं सचिनदांनी पंचमच्या संगीत दिग्दर्शनात गायलय, नंतर चे लता मंगेशकर यांनी गायलेलं रैना बिती जाय ही बंदिश वास्तविक राग तोडी आणि खमाज यांचे मिश्रण आहे, मुखडा तोडीत असून अंतरा खमाज रागात केलाय. हे गाणं जेव्हा मदनमोहन ने ऐकलं तेव्हा सचिनदांना त्यांनी अभिनंदनाचा फोन केला तेव्हा सचिनदांनी मदनमोहन ला सांगितले की ते गाणं पंचमचं आहे. बडा नटखट है रे आणि कुछ तो लोग कहेंगे ही दोन्ही गाणी राग खमाज मधीलच आहेत, यातही कुछ तो लोग कहेंगे मध्ये कलावती रागाचे मिश्रण आहे. चिंगारी कोई भडके या गाण्याची एक मजा आहे, पंचमचे गिटारिस्ट भानु गुप्ता एका संध्याकाळी सगळे पॅक अप झाल्यानंतर त्यांच्या कडुन चुकून गिटारवर एक काॅर्ड चुकीची वाजली गेली तेव्हा सगळे त्यांना हसले पण संगीताचा जबरदस्त कान असलेल्या पंचमनं भानु गुप्तांना हे वाजवत बस म्हणून सांगितले आणि याच ओपनिंग काॅर्ड किंवा फ्रेजवर संपूर्ण गाणं पंचमनं कंपोज केलं – चिंगारी कोई भडके
आपल्याच बंगाली राजकुमारी या सिनेमाचा ए की होलो हे गाणं पूर्वी कंपोज केलेलं होतं पंचमनं त्याचाच हिंदी अवतार म्हणजे ये क्या हुआ हे गाणं आहे. किशोरकुमार या अचाट नैसर्गिक अशास्त्रीय गायका कडून पंचमनं तब्बल तीन रागदारीवरली गाणी कमालीची सुंदर गाऊन घेतली आहेत. असे असूनही किशोरकुमार चे फक्त नाॅमिनेशन फिल्मफेअर मध्ये आहे पण पंचमचे तर नाॅमिनेशन पण नाही याचं माझ्यासारख्या रसिकाला राहून राहून वाईट वाटते, राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर ला पण नाॅमिनेशन आहे पण पंचमचे नाही. १९७२ हे वर्ष राजेश खन्ना बरोबरच पंचमचं होतं कारण या वर्षात पंचमने हरे राम हरे कृष्णा, अमर प्रेम, अपना देश, जवानी दिवानी, रामपूर का लक्ष्मण, मेरे जीवन साथी, परिचय, सीता और गीता, शेहजादा, दो चोर इतक्या विविधतेचं संगीत दिले आहे की त्याचं साधं नाॅमिनेशन पण नाही याची खंत वाटते – असो, पंचमला ब्रेक भलेही तिसरी मंझील मुळे मिळाला असला तरीही त्याला ग्रिप घ्यायला कटी पतंग मुळे सुरवात झाली पण अमरप्रेम ने त्याच्यातल्या सर्जनशील संगीतकारावर कायमचे शिक्कामोर्तब करुन ठेवले. शास्त्रीय संगीताचा उत्तम जाणकार असल्याची पोचपावती म्हणजे अमरप्रेम चे त्याचं संगीत आहे…. आत्तापर्यंत सचिनदांच्या बरेच सिनेमात पंचम अॅसिस्ट केल्याच्या खुणा दिसून येतात पण अमरप्रेम असा सिनेमा आहे की ज्यात पंचमच्या संगीतावर सचिनदांच्या पाऊलखुणा उमटलेल्या आहेत…
अमर प्रेम १९७१ च्या उत्तरार्धात सुरु होऊन पोस्ट प्राॅडक्शन सकट जेमतेम ५-६ महिन्यात प्रदर्शनासाठी सज्ज होता परंतु डिसेंबर १९७१ ला अचानकपणे भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरू झाल्याने सिनेमा पहिल्यांदा २८ जानेवारी १९७२ रोजी प्रदर्शित केला गेला, मुंबईत तो साधारणपणे १९७२ च्या मार्चमध्ये आला आणि तेव्हाच आपल्या शांताराम बापूंचा पिंजरा पण प्रदर्शित झाला. अमर प्रेम सिल्व्हर ज्युबिली हीट झाला सर्वत्र – एक आठवण जाता जाता अजून शेअर करतो, चिंगारी कोई भडके हे गाणं प्रत्यक्षात शक्तीदांना हावडा ब्रिज खाली शूट करायचे होते परंतु तिथे राजेश खन्ना येणार म्हणून समजले लोकांना तेव्हा एकच गर्दी उडाली तेव्हा शक्तिदांनी शूट कँसल करुन त्याचा सेट नटराज स्टुडिओ मधे केला आणि गाणं शूट केलं, संपूर्ण सिनेमा बहुतांशी नटराज स्टुडिओ मध्येच शूट करण्यात आला आहे परंतु सेट इतका बेमालूमपणे बनवलाय की कलकत्ता आणि बंगालच डोळ्यासमोर उभे केलय.
अजून एक – एकदा गुलजार पुण्यात पंचममॅजीकच्या शोला आला होता या घटनेला मी स्वतः हजर होतो तेव्हा गुलजार ला एक प्रश्न मुलाखतकाराने विचारला की तुम्हाला करिअर मध्ये अनेक पुरस्कार मिळाले नाव मिळाले पण अशी कोणती खंत काही आयुष्यात राहिली आहे का? त्यावर गुलजार तत्परतेने म्हणाला की मी अमर प्रेम नाही करु शकलो, नेमके त्याचवेळी परिचयचे काम चालू होते त्यामुळे गाणी बक्षी साहेबांनी लिहीली आणि ती अजरामर झाली, खरंतर पंचम – आनंद बक्षी आणि पंचम – गुलजार हे लेखनाचे स्वतंत्र विषय आहेत.
अमरप्रेम हा एक उत्कटपणे दर्शवलेला सिनेमा होता, उत्कटपणा म्हणजे काय तर अमरप्रेम चे कथानकं होय, तीन अशी व्यक्तीमत्व ज्यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही तरीही केवळ माणुसकी आणि प्रेमाच्या धाग्याने नात्यांची वीण एकमेंकात घट्ट करतात, कम्माल कथानकं आहे अमरप्रेम चे, अमरप्रेम ने शक्ति सामंता ने हॅट्ट्रिक साधली यशाची, राजेश खन्ना ने कॅरेक्टर चे बेअरिंग घेण्यासाठी तब्बल आठ दिवस घेतले कारण संवादाचे चढ उतार करत विशिष्ट लकबीत हे कॅरेक्टर सजवायचे होते. ते त्यानं चोखपणे बजावले. हा सिनेमा स्त्री प्रधान होता आणि शर्मिला टागोर च्या सशक्त अभिनयाने पुष्पाला योग्य न्याय दिला.
आजही अमरप्रेम कुठेही लागला तरी एक सुंदर कलाकृती पाहिल्याचा आनंद मिळतो, नवोदित विनोद मेहराच्या कारकीर्दिला अमरप्रेम एक बुस्टर म्हणून होता, शेवटचा सीन हा राजेश खन्ना ने त्याच्या फक्त डोळे आणि मुद्राभिनय यातून खाल्लेला आहे अक्षरशः, छोटेखानी भूमिकेत ओमप्रकाश, सुजितकुमार, बिंदू, लीला मिश्रा, मदन पुरी, फरिदा जलाल, अभी भट्टाचार्य, गुरनाम आहेत, छोट्या नंदूचा रोल मास्टर बाॅबी ( कदाचित ही मुलगी होती) ने सर्वात सुंदर केला आहे.
भारतीय सिनेमाचा इतिहास अमरप्रेम शिवाय पूर्ण होऊ शकत नाही, अजून दोन वर्षांनी अमरप्रेम येऊन तब्बल ५० वर्षे होतील, शेवटी मी अमरप्रेम बद्दल एक अखिल भारतीय टॅगलाईन जर सांगितली नाही तर लेख अपूर्ण होईल.
आजही अमरप्रेम म्हटलं की सुपरस्टार राजेश खन्नाचा एक अजरामर संवाद कोणालाही आठवणारच आणि तो म्हणजे
#Pushpa …. #I_hate_tears
© अतुल श्रीनिवास तळाशीकर
१६ जुलै २०२०