#संवाद
एक गोष्ट माझ्या लक्षात आलीयं की एकतर हल्ली संवाद सहज होत नाहीच. पण मित्र मैत्रिणी मध्ये संवाद झालाच तर माणसं नकारात्मक गोष्टींची चर्चा जास्त करतात.
म्हणजे आपल्याला आनंद असतो या व्यक्तीशी बोलण्यात.. पण ती व्यक्ती फक्त त्याच्या आयुष्यात घडणार्या नकारात्मक बाबीवरच बोलत असते. मन मोकळे करायला हवंच जर मैत्री तेवढी घट्ट आहे.. पण सतत तेच ऐकायला नाही ना आवडत. बरं जी काही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परिस्थिती असते ती काही आपल्यामुळे नसते. मग आपण एखाद्या चांगल्या आनंददायी संवादाची अपेक्षा केली तर काय चूक आहे?????
पण आपल्याला आनंदाचा सकारात्मक एकही शब्द मिळत नाही. आपला संवादाचा बेरंग होतो..
अशा वेळी याला संवाद म्हणायचं का?? असा प्रश्न पडतो. एकूणच माणसांना रडगाणं ऐकवण्यात फार रस असतो.. प्रत्येकाला काहीतरी विवंचना असतातच. पण कधीतरी आपण कोणाशी तरी बोलतो तर आनंद ही मिळावा त्या संवादातून.
मी कधीही माझ्या विवंचना कोणालाही विचारल्याशिवाय सांगत नाही. कारण एक तर त्या आपल्यालाच सोडवायच्या असतात आणि समोरच्याला का उगाच सांगत सुटायचं? त्याचं मळभ आपला सुह्रूद म्हणून त्यालाही येतंच ना.
शक्यतो आपल्या बोलण्याने समोरची व्यक्ती आनंदी होईल हा माझा प्रयत्न असतो. ताण ,समस्या प्रत्येकालाच असतात. पण घटकाभर कोणा शी बोलताना त्या बाजूला ठेवाव्यात. असं मला वाटतं. काही जणांना तुम्हीही फार दुःखी आहात हेही ऐकण्यात फार रस असतो.. इथे संवाद काही काळानंतर कमी होत जातो. संपतो..
असं होऊ नये … संवाद छान नीटस निकोप चालू रहायला हवा. अर्थात मला जे जाणवलं ते लिहीलं. कोणाचंही वेगळं मत असूच शकते.. बास.. इतकंच..
✍मधुश्री देशपांडे गानू