बाभळीचा काटा आणि गुळाचा चटका..
लहानपणाीच्या काही आठवणी मनाच्या पडद्यावरून हटता हटत नाहीत. त्यातलीच ही गूळाच्या चटक्याची.. आम्ही लहान असताना दर दोनचार दिवसाआड हा कार्यक्रम ठरलेलाच असायचा….. चिंचेखाली, बोरीखाली.. काट्याकुट्यात खेळण्यातच पोरांचा दिवस सरायचा.
बोरी तिथे बाभळी पण असायच्याच…बाभळीचं झाड, दिवस दिवस खेळण्याचं मटेरिअल पुरवायचं. त्याची पिवळी धम्मक फुलं, कर्णफुले बनून मुलींच्या कानांवर सजायची. बाभळीच्या पिकलेल्या शेंगा खूपच चविष्ट लागत असाव्यात, मला आता त्याची चव आठवत नाही पण त्या तोडण्यासाठी केलेला आटापिटा आठवतो अजूनही. बाभळीचा, शेवग्याचा, कडूनिबाचा डिंक पण तेव्हा ‘खाऊ’ असायचा.
पण बाभळीचा काटा पायात मोडला की अंगावर काटा यायचा…बाकी चुबुक काटे वगैरे किरकोळ असायचे.. नुसते नखांनी टोकरले तरी निघून जायचे पण बाभळीचं काम महा बेक्कार… आठआठ दिवस ते दुखणं पुरवायचं…
चप्पल ही वस्तू अगदी विशेष प्रसंगी, म्हणजे मोठ्यांबरोबर ‘गुणी बाळं’ बनून कुठे जायचा योग आला तरच पायाला लागायची. बाकी इतर वेळी पायाला भिंगरी लागल्यासारखी आमची वावटळ गावभर अनवाणीच भिरभिरत असायची.. त्यामुळे खूप क्षार चढलेलं एखादं मडकं फुटल्यावर त्याचं खापर जसं दिसेल तशी पायांना रया आलेली असायची… काटे भरणे, कुरूप होणे… हा प्रकार तर तेव्हा फारच कॉमन होता…नंतर नंतर त्या कॉर्न कॅप निघाल्या…सात आठ दिवस ती पट्टी लावून ठेवली की कुरूप नरम पडून आतला काटा निघून यायचा..
हिवाळ्यात तर पाय इतके उललेले असायचे की धप्पकन उडी मारावी तर पावलांवर रक्ताचे बारीक थेंब यायचे.. तळपायाची कातडी तर एकदम कडक ..सुई पण शिरू नये अशी. अशा त्या पायात काटा मोडल्यावर आधी पाय घमेल्यातल्या पाण्यात ठेऊन स्वच्छ करावा लागायचा. पाय जेवढा जास्त पाण्यात राहील तेवढी कातडी जरा मऊ पडायची.. मग भिंतीला टेकून बसायचं.. आणि पाय डोळ्यांशी आणून तो काटा सुईने टोकरून टोकरून काढायचं काम सुरू व्हायचं.. असं त्रिकोणासनात बसून तासंतास हे काम चालायचं… तो पर्यंत नरम पडलेली कातडी पुन्हा वाळून कडक… महत्प्रयासाने कसाबसा तो काटा निघायचा. पण तरी त्याची सल जाता जायची नाही.. मग त्यावर उपाय म्हणजे गुळाचा चटका…
चटक्याची पूर्वतयारी म्हणजे..
छोटासा गुळाचा खडा, मेणबत्ती आणि काडेपेटी… कार्यस्थळ….पुढच्या किंवा मागच्या ओसरीचा एखादा कोपरा…
वेळ..बहुधा संध्याकाळची…
उपचारानंतर रडाडरड झाली तरी तोपर्यंत झोपायची वेळ व्हायची. आणि झोपेतून उठेपर्यंत चटक्याची भीषण आठवण पुसट होऊन जायची.
ही तयारी चालू असताना चटक्याचा मानकरी हवालदील होऊन जायचा. बाकीची वानरसेना मात्र फूल उत्साहात असायची. एखादं मंगल कार्य निघाल्यासारखा सगळ्यांचा उत्साह फसफसायचा..त्याच उत्साहात मानक-याला पाचारण केले जायचं…धांदल धांदल करत ती मेणबत्ती पेटवली जायची.. मानकरी किती छोटा..मोठा आहे त्याप्रमाणे तो गोंधळ घालायचा… कधी कधी दोन-तीन पण मानकरी असायचे… मानकरी लहान असेल तर पळापळ, रडारड बरीच व्हायची.. त्याला पकडून आणून, दाबून ठेवायला मोठी मुले आघाडीवर असत. तो हातपाय झाडतच राही. मोठ्या माणसांपैकी कोणीतरी मग गुळाचा खडा पेटत्या मेणबत्तीवर धरी. इकडे पाय झाडणं ..सुटण्यासाठी पकडलेल्यांना चावे घेणं चालूच असायचं.. गूळ वितळून खड्यावर पाक तयार झाला की त्या हलणा-या पायावर, काट्याची जागा शोधावी लागे… त्यात कधी गुळ गार होऊन जाई, कधी भलतीकडेच चटका दिल्या जाई. तर कधी चटका देणा-याला किंवा धरून बसणा-यालाच चटक्याचा प्रसाद मिळे… मग तर खूपच जोर लावून मानक-याचं मुटकं वळलं जाई…
मोठी मुलं मात्र स्वत:हून चटक्याला बसत. स्वत:च गूळ गरम बिरम करत. काट्याची जागा स्वत:च हेरत.. कोरलेलंच असल्यामुळे त्याबाबतीत काही शंका नसे, पण पायावर टेकवताना, त्यांचाही धीर होत नसे. ‘टेकवू की नको..टेकवू की नको’ करत, मग बाकी मुलं पट्कन त्याचा हात त्याच्या पायावर टेकवत.. अशा त-हेने चटका विधी संपन्न होत असे. त्यानंतर मग पाय धरून लंगडी घालत मिनिटभर कोंबडीनृत्याचा प्रायोजित कार्यक्रम ..बाकीचे टाळ्या पिटून आनंद घेणार..
हा गुळाचा चटका म्हणजे तेव्हा उपचार तर होताच पण मनोरंजनाचाही एक भाग होता.. तासंतास हा कार्यक्रम चालायचा. मोठी मंडळी पण ह्यात हिरीरीने सहभागी व्हायची.
आता हा विधी जवळ जवळ नामशेषच झाला आहे. कारण मुलांना चप्पल बूट घातल्या शिवाय उंबराच ओलांडू दिला जात नाही. त्यामुळे काट्याचा आणि त्यांच्या पावलांचा दुरान्वयानेही संबंध येत नाही. बोरी बाभळीखाली हिंडून माकडमेवा गोळा करण्याची गरजही राहिली नाही. आता मुलं असल्य्या गोष्टींना तोंडही लावत नाही. त्यामुळे काटे भरणं, ते टोकरून काढणं, आणि गुळाचा चटका देणं जवळपास बंदच झालंय. आता मुलांना सांगूनही त्यातली गंमत कळणार नाही.
हं, आता मनात मात्र काटे भरतात. कधी चुकून, कधी कोणी विघ्नसंतोषी लोक मुद्दामही भरवूनही देतात. पण कधी वाटतं मनात सलणारे काटे तसेच वागवत राहून मन कुरूप करून घेण्यापेक्षा पायातल्या काट्यांसारखे असेच वेळच्यावेळी बोलून काढावेत. आणि जमलंच तर चांगला कडकडीत भांडणाचा चटका देऊन तो सल कायमचा मिटवून टाकावा.
©️®️नीलिमा क्षत्रिय
17 ऑगस्ट 2020
आज की औरतें
आज की औरतेंचाय की तरह कड़क हैंपक पक कर स्वादिष्ट हो गयींज़िन्दगी जीने में माहिर हो गयीं दूध बन कर ससुराल आयी...
Read more