उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिती लीला..
इ-कोली हा जिवाणू दिवसातून ७२ वेळा पुनरुत्पादन करतो. आपण मानवी इतिहासात जेवढे जीव जन्माला घातले नाहीत तेवढे जीव हे सूक्ष्मजंतू तीन दिवसात जन्माला घालतात. एक जिवाणू-बॅक्टेरिया पृथ्वीच्या वजनाइतके जीव दोन दिवसात जन्माला घालू शकतो. तीन दिवसांमध्ये त्यांची जमात आख्ख्या (आपल्या नजरेला दिसणार््या्) विश्वाइतक्या वजनाची होऊ शकेल. हे असं होत नाही/होणार नाही. पण त्यांचं प्रमाण आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. पृथ्वीवरचे सगळे सूक्ष्मजंतू (microbes) एकावर एक रचले आणि दुसरीकडे इतर सगळे प्राणी एकमेकांवर रचले तर सूक्ष्मजंतूंचा डोंगर इतर प्राण्यांच्या ढिगार््याrच्या २५ पट मोठा होईल.
बिल ब्रायसन या अवलिया लेखकाच्या “द बॉडी” या पुस्तकातल्या सूक्ष्मजीव-microbes या प्रकरणात हे सगळं वाचताना आपण आपल्याच शरीराबाबत किती अज्ञानी आहोत याची विदारक जाणीव होत जाते.. कोरोना व्हायरसनं आख्खं जग ग्रस्त आणि त्रस्त असताना आपल्या शरीराच्या रचनेबद्दल अत्यंत सोप्या शब्दांत माहिती देणारं हे पुस्तक must read आहे. या पुस्तकातल्या त्वचा, मेंदू, आतडं, रक्त, मज्जातंतू, अन्न, झोप, मानवाचा जन्म या प्रकरणांबरोबरच आजार आणि शेवटचा कॅन्सर ही प्रकरणं वाचताना आपण त्यात गुंगून जातो हे लेखकाचं आणि लेखनाचं वैशिष्ट्य.
Microbes या प्रकरणात लेखक पुढे म्हणतो, आपल्याला आपल्याभोवतीच्या या सूक्ष्मजीवांबद्दल फार कमी माहिती आहे. आपण घरात शिरलो तर या सूक्ष्मजीवांच्या ४०,००० स्पीसिज तुमच्याभोवती असू शकतात. ९०० स्पिसिज तर तुमच्या नाकपुड्यांमध्ये आणि अजून ८०० गालांच्या आतल्या बाजूला असतील. १३०० तुमच्या हिरड्यांभोवती असतील आणि तुमच्या पचनमार्गात ३६००० स्पीसिज असतील. हे आकडे व्यक्तगणिक, वयानुसार, तुमच्या सोबतच्या लोकांनुसार, अॅंटिबायोटिक्स घेता का नाही यानुसार किंवा तुमच्या वजनानुसार वगैरे साहजिकच बदलतात.
यावरचं संशोधन वाढत चाललं आहे तसं हे आकडे अर्थातच बदलत चालले आहेत. उदाहरणार्थ, लंडनच्या “वेलकम सॅंगर इन्स्टिट्यूट”मधल्या २०१९सालच्या केवळ २० जणांनी केलेल्या एका संशोधनानुसार आधी ठाऊक नसलेले १०५ नवीन सूक्ष्मजीव तुमच्या आतड्यामध्ये असू शकतात…!
या सगळ्या सूक्ष्मजंतूंना बहुधा एक गोष्ट लागू होते, ती म्हणजे त्यांचा इतिहास आणि जेनेटिक्स तपासायला गेलं तर एकाही गोष्टीत साधर्म्य आढळत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही म्हणजे एक माणूस वगैरे नसता.. तर वारंवार शिंकून, खोकून, पाळीव प्राणी पाळून आणि जितक्या वेळा हात धुवायला पाहिजेत तितक्या वेळा हात न धुऊन त्यांना मदत करणारी एक लोभसवाणी दुनिया असता. तुमची ही इकोसिस्टीम म्हणजे त्यांच्यासाठी अमाप खजिना असतो.
कसा ? तर साधं सर्दीचं उदाहरण घेऊ. व्हायरसचा सर्वात जास्त पसरणारा संसर्ग म्हणजे सर्दी. साधारणपणे मोठ्यांना वर्षातून दोन/तीन वेळा आणि लहान मुलांना वर्षातून सहा ते दहा वेळा सर्दी होते. थंडी वाजल्यानंतर सर्दी होऊ शकते असं म्हणलं जातं. पण आजही नक्की कशानं सर्दी होते हे विज्ञानाला ठाऊक नाही. उन्हाळ्यापेक्षा थंडीच्या ऋतूत सर्दी जास्त प्रमाणात होते, त्यामुळे ती थंडी वाजल्यानं होते असं अनुमान आहे. पण आपण थंडीच्या दिवसांमध्ये घरात / बंदिस्त जागेत जास्त वेळ काढतो. इतरांच्या शिंकांना वगैरे जास्त प्रमाणात सामोरं जातो हे त्याचं महत्वाचं कारण आहे.
थोडक्यात, सर्दी हा सर्वात जास्त प्रमाणात आणि वारंवार सतावणारा आजार असूनही त्यावर लस नाही.. त्याचं कारण म्हणजे, सर्दी ही एकाच विशिष्ट व्हायरसची देणगी नाही. नाकामधून सर्दीचा संसर्ग पसरवणारे शेकडो प्रकारचे व्हायरस आहेत. थोडक्यात, सर्दी होण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यामुळेच या सगळ्या व्हायरसेसवर मात करणं शक्य नसल्यानं सर्दीला तोंड देणारी प्रतिकारशक्ती पूर्णपणे तुमच्यात तयार होऊ शकत नाही…! पण हा संसर्ग किती झपाट्यानं होऊ शकतो?
यासाठी ब्रिटनमध्ये “कॉमन कोल्ड युनिट” नावाचं संशोधनकेंद्र अनेक वर्षं चालवलं जात होतं. १९८९ साली सर्दीवर उपाय न सापडल्यामुळे ते बंद करावं लागलं. त्याआधी या केंद्रानं चिक्कार प्रयोग केले होते. त्यापैकी, एका प्रयोगात एक स्वयंसेवक सर्दीनं नाक गळावं तसं नाक गळेल असं एक उपकरण नाकाच्या आत लावून एका पार्टीला गेला. त्याच्या नाकाला लावलेल्या उपकरणातल्या द्रवाला फक्त अतिनील किरणांमधूनच (Ultraviolet Rays) दिसेल असा एक डाय लावलेला होता. जेव्हा तो डाय दिसेल अशी व्यवस्था केली तेव्हा पार्टीतल्या प्रत्येकाच्या हातावर, डोक्यावर, शरीराच्या वरच्या भागांवर, चष्म्यांवर, दाराच्या कड़्यांवर, सोफ्याच्या उश्यांवर, काजूच्या वाट्यांवर.. सगळीकडे तो दिसत होता. इतक्या प्रमाणात आपण संसर्ग फैलावत असतो.
मोठी माणसं सर्वसाधारणपणे एका तासात सोळा वेळा आपल्या चेहर््या ला स्पर्श करतात. दरवेळेला आपण खात असतो त्या भांड्यांमधून, दरवाजाच्या कड्यांमधून आपण रोगकारक गोष्टी आपल्या आणि इतरांच्या शरीरात प्रसार करत असतात.
अॅरिझोना विद्यापीठातल्या एका अशाच प्रकारच्या संशोधनात संशोधकांनी एका दाराच्या धातूच्या कडीवर सर्दीच्या व्हायरसचा संसर्ग असेल अशी व्यवस्था केली. संपूर्ण इमारतीत, निम्या कर्मचार््यां ना चार तासात त्या व्हायरसचा संसर्ग झाला. कॉफी मशीन, झेरॉक्सचं मशीन सगळीकडे तो पसरला होता.
चुंबनातून व्हायरस पसरण्याचं प्रमाण मात्र अत्यल्प आहे हे अजून एक आश्चर्य. विसकॉन्सिन विद्यापीठाच्या स्वयंसेवकांनी सर्दीचा व्हायरस पसरवण्यासाठी या मार्गाचा अवलंब केला त्याचा फारसा उपयोग झाला नाही.. (या मार्गानं त्यातल्या कितीजणांची पुढे लग्नं वगैरे झाली हा डेटा उपलब्ध नाही.. जिज्ञासूंसाठी ही खास टीप..) शिंका, खोकला आणि स्पर्शांमधून सर्दीचा व्हायरस खात्रीनं पसरत होता.
बॉस्टनच्या सबवे ट्रेनमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार धातूचे खांब सर्वात जास्त प्रमाणात विषाणू पसरवतात. स्वित्झर्लंडमधल्या २००८ सालच्या एका सर्वेक्षणानुसार फ्लूचा व्हायरस शिंकेतून बाहेर पडलेल्या droplets असलेल्या कागदी नोटांवर अडीच आठवडे रहातो.
पीटर मेडावॉर या प्रसिध्द नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञाच्या शब्दात सांगायचं झालं तर “व्हायरस (विषाणू) म्हणजे, प्रोटीनमध्ये लपेटलेली बॅड न्यूज” असते. पण तरीही अनेक व्हायरसेस माणसांसाठी तरी बॅड न्यूज ठरत नाहीत. व्हायरसेस काही खात नाहीत, श्वास घेत नाहीत. त्यामुळे ते खर््यालखुर््याा अर्थानं जगत नाहीत, पण ते मृतही नसतात. ते स्वत: इकडेतिकडे फिरत नाहीत. आपण जाऊन त्यांना पकडून आणतो – दाराच्या कड्यांना हात लावून, हस्तांदोलन करुन किंवा काहीवेळा आपण श्वासोच्छ्वास करतो त्या हवेतून.. ! ते स्वत: चालून कुठे जायचे कष्टही घेत नाहीत. ते तुमच्याबरोबर सहप्रवास (hitchhiking) करतात. धूलिकणासारख्या निकम्म्या अवस्थेत असणारे हे व्हायरस एखाद्या जिवंत पेशीत गेल्याबरोबर ते आपलं अस्तित्व दाखवायला लागतात. भयावह प्रमाणात त्यांचं पुनरुत्पादन होतं.
सगळ्याच व्हायरसेसमुळे आपल्याला आजार होतात असं मानलं जायचं. पण आता सगळ्याच व्हायरसेसमुळे आजार होत नाहीत हे सिध्द झालं आहे. लाखो व्हायरसेसपैकी ५८६ प्रकारच्या व्हायरसेसमुळे सस्तन प्राण्यांना संसर्ग होऊ शकतो. त्यापैकी २६३ प्रकारच्या व्हायरसेसमुळे माणसांना संसर्ग होऊ शकतो. ज्यांच्यामुळे संसर्ग झाला आहे किंवा होतो त्या व्हायरसेसवरच जास्त संशोधन झाल्यामुळे आपल्याला या इतर व्हायरसेसबद्दल खूप कमी माहिती आहे.
१९८६ साली न्यूयॉर्कच्या विद्यापीठात लिटा प्रॉक्टॉर या विद्यार्थिनीनं समुद्रातल्या पाण्यातले व्हायरसेस शोधायचे असं ठरवलं. समुद्रात सांडपाण्यातून वगैरे आलेले सोडले तर व्हायरसेस नसतात असं जगभरात मानलं जात होतं. त्यामुळे हा जरा हा जरा अजबच प्रकार होता. त्यामुळे साधारण समुद्राच्या १ लिटर पाण्यात सुमारे १०००० कोटी व्हायरसेस असतात असं तिनं शोधल्यावर खळबळ माजली. डोरोथी क्रॉफर्ड या व्हायरॉलॉजिस्टसच्या मते फक्त समुद्रातले व्हायरस एकापुढे एक मांडले तर १ कोटी प्रकाश वर्षाइतकी त्यांची लांबी होईल. हे अंतर आपल्या कल्पनेपलीकडचं आहे.
व्हायरस हे नाव याला १९०० साली डच शास्त्रज्ञ मार्टिनस बिजेर्निक यानं दिलं. त्याला तंबाखूच्या रोपावर संशोधन करताना बॅक्टेरिया (जिवाणूंपेक्षा) सूक्ष्म गूढ असं काहीतरी दिसलं. त्यानं आधी त्या गूढ जिवाला contagium vivum fluidum हे नाव दिलं. पण नंतर लॅटिनमधल्या टॉक्सिन या शब्दावरुन व्हायरस हे नाव दिलं. बिजेर्निक हा व्हायरॉलॉजीचा जनक मानला जातो. त्याला या शोधाबद्दल खरं तर नोबेल पारितोषिक मिळायला हवं होतं.. पण ते त्याला मिळालं नाही.
व्हायरसच्या बाबत अजून एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ते संधीची नीट वाट पहातात.. २०१४ साली एका फ्रेंच चमूला सायबेरियामध्ये नवीन व्हायरस सापडला.. त्याला त्यांनी नाव दिलं Pithovirus sibericum. ३०,००० वर्षं तो व्हायरस बर्फात गोठलेला होता, पण अमीबामध्ये तो टोचल्याबरोबर तरुणाला लाजवेल इतक्या उत्साहात थैमान घालायला लागला. सुदैवान हा व्हायरस माणसांना संसर्ग करत नाही. पण तो इतकी वर्षं वाट पहात राहिला हे लक्षणीय आहे.
असाच शांतपणे धीरानं वाट पहाणारा अजून एक व्हायरस म्हणजे varicella-zoster virus. आपल्याला लहानपणी चिकन पॉक्स – कांजिण्या देणारा हा व्हायरस. तो शरीरात पुढची पन्नास वर्षं चुपचाप बसून रहातो. आणि म्हातारपणी शिंगल्स या रोगाच्या रुपानं परत वेदना देऊ शकतो.
अखेरीस, पृथ्वी ही आपलं घर आहे वगैरे सगळं झूठ आहे.. पृथ्वी प्रत्यक्षात सूक्ष्मजीवांची आहे. आपण त्यांना (जगण्याची) आनंदप्राप्ती व्हावी यासाठी(!) आहोत हे लक्षात घ्या. पण याचबरोबर ते नसले तर आपण एका दिवसात मरुन गेलो असतो.. हेही खरं.. ! “उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिती लीला..” असं गदिमा माणसांबद्दल म्हणून गेले आहेत हे इथे खूप पटतं.
नीलांबरी जोशी – २९ आॉगस्ट २०२०
संदर्भ :
- The Body – Bill Bryson