नमस्कार
एक बातमी तुम्ही सर्वांनी ऐकली असेल की भारत सरकारने चीनचे ११८ अॅप बॅन केले, ज्यामध्ये पबजी अॅप देखील शामील आहे. पबजीचे सर्वात जास्त अॅक्टिव्ह युजर्स भारतात होते आणि आतापर्यंत २२००० करोडपेक्षा जास्त पैसे ह्या अॅपच्या मालकाने पबजीमधून कमावलेले आहेत. याआधीही भारत सरकारने चीनचे ५९ अॅप बॅन केले होते, ज्यामध्ये टिकटॉक सारखा फेमस अॅप देखील शामील होता.
या बातमीवरून एक वैतागलेला पुणेकर म्हणतो, ‘अख्खा भारत चीनचे अॅप वापरतोय..! मग भारतातील पंधरा वीस कोटी आणि पुण्यातले पन्नास लाख जे सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत ते काय करताय? का यांचा जन्म फक्त नुसता हिंजेवाडीला जाऊन वाकड ब्रिजला ट्रॅफिक जाम करायला झालाय?’ या माणसाचं बोलणं सर्वजण हसण्यावारी घेताहेत; परंतु खरंच हा विषय हसण्यावारी नेण्यासारखा आहे का? आपल्या देशात जगातील सर्वात जास्त इंजिनीअरर्स आहेत. जगातील सर्वात तरुण युवक आपल्या देशात आहेत त्यामुळे साहजिकच सर्वात जास्त क्रिएटिव्हीटी आपल्या देशात हवी होती; परंतु तसे अजिबात दिसत नाही. आपल्या देशाने मागच्या पन्नास वर्षात असा एकही शोध लावलेला नाही ज्याचा जगावर प्रभाव पडलेला आहे. आपण आजही आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामावरच अभिमान बाळगण्यात धन्यता मानतो. जगात कुठेही काही घडले की म्हणायचे हे सर्व आधीच आमच्या पूर्वजांनी वेदांमध्ये लिहून ठेवलेलं आहे.
स्वामी विविकानंद, एपीजे अब्दुल कलाम, दलाई लामा, जॉन एफ केनेडी अशा कितीतरी महान हस्तीनी म्हटलेलं आहे की तरुण युवक हेच देशाचे भविष्य असतात, शक्ती असतात आणि सर्वात मोठी संपत्ती असतात. चीनमधील युवाशक्तीने हे म्हणणे सार्थ ठरविले आहे. कोरोनाच्या काळात देखील जगातील सर्वाधिक बाजारपेठ काबीज करण्यात ते यशस्वी ठरलेत, मागच्या सहा महिन्यात चीनमधील युवाशक्ती त्यांचा वेळ यामध्ये खर्च करत होती की कोरोनासारख्या पेंडेमिक सिच्युएशनचा आपण फायदा कसा घेवू शकतो? या सिच्युएशनमध्ये कोणत्या इंडस्ट्री बूम घेतील? कोणते प्रॉडक्ट विकले जातील? यावर त्यांचा फोकस होता आणि त्याचवेळी आपल्या देशातील युवाशक्ती चीनच्या युवकांनी बनविलेल्या टिकटॉक या अॅपवरती व्हिडीओ बनविण्यात आणि बघण्यात व्यस्त होती, पबजी खेळण्यात व्यस्त होती.
लॉकडॉउनचा पिरीयड हा काहीतरी शिकण्यासाठी, काहीतरी निर्माण करण्यासाठी आपल्या देशातील युवकांसाठी सुवर्णसंधी होता कारण या काळात त्यांना कुणीही डिस्टर्ब करणार नव्हते, त्यांना शाळा, कॉलेज, ड्युटीवर जायचे नव्हते की परीक्षाही नव्हती, या वेळेचा ते सर्वोत्तम उपयोग करू शकत होते परंतु आपल्या देशातील जवळपास ९०% पेक्षा जास्त युवकांनी लॉकडॉउनचा पिरीयड फक्त टाइमपास करण्यात घालविला. फक्त मुलांचा दोष नाही आपला पालकवर्ग देखील काही कमी नाही लॉकडॉउनच्या काळात महाराष्ट्रात ५ कोटीपेक्षा जास्त लोकांनी केक बनविण्याची रेसिपी बघितली व केक बनविले (ईतर किती रेसिपी बघितल्या असतील देव जाणो?) परंतु फक्त ५ लाख पालकांनी सुद्धा त्यांच्या मुलांमधील क्रिएटिव्हीटी वाढावी, स्किल्स डेव्हलप व्हावेत, मुलांनी या काळात काहीतरी नवीन शिकावे यासाठी प्रयत्न केला नाही. आपण फक्त शासनव्यवस्था आणि शिक्षणव्यवस्थेला दोष देण्यात धन्यता मानतो.
चीन आज म्हणतोय की भारत २०२१-२२ पर्यंत जगातील सर्वात कर्जबाजारी देश असेल, चीन असं बोलण्याची हिंमत करतोय कारण त्यांना दिसतंय की आपल्या देशातील युथ काय करतोय? चीनमधील युवाशक्ती चीनला महासत्ता बनविण्यासाठी प्रयत्न करतेय आणि आपल्या भारतातील युवाशक्ती टिकटॉक, पबजी, युट्युब, सोशिअल मिडिया आणि बॉलीवूड मध्ये व्यस्त आहे.
खरं तर आपल्या मुलांसाठी कधीच एवढ्या सुवर्णसंधी नव्हत्या जेवढ्या आता आहेत, संपूर्ण जगाची कवाडे आपल्या मुलांसाठी सताड उघडी आहेत, फक्त आपल्या मुलांमध्ये त्या संधीचे सोन्यात रुपांतर करण्याची कुवत बनविणे गरजेचे आहे परंतु तेदेखील करण्यात आपण अपयशी ठरतोय. पालकांचा १००% फोकस मार्कांवर आणि ०% फोकस स्किल्स, क्रिएटिव्हीटी, माइंडसेट यासारख्या गोष्टींवर असतो. टिकटॉक, पबजीसारखे गेम्स क्रिएटिव्हीटीमधूनच तयार होतात परंतु आपली मुले फक्त मार्क्स कशी मिळवायची एवढंच शिकतात त्यामुळे आपल्या देशात लाखो, करोडो इंजिनीअर, सॉफ्टवेअर डेव्हलपर असले तरी ते जगावर प्रभाव पाडू शकतील असं काही निर्माण करू शकत नाही.
त्यामुळे आपण फक्त मुलांच्या मार्कांवर फोकस न करता त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला पाहिजे. माइंडसेट, क्रिएटिव्हीटी आणि स्किल्स हे मार्कांपेक्षा काही पटींनी अधिक पॉवरफुल आणि आवश्यक असतात; त्यामुळे सर्वच गोष्टींचा समतोल असला पाहिजे. आपण जर वर्षभर फक्त सहा पुस्तके शिकण्यासाठी १.५ लाख शाळेची फीज आणि १.५ लाख ट्युशन फी भरत असू तर १.५ लाख माइंडसेट, क्रिएटिव्हीटी आणि स्किल्ससाठी देखील खर्च केले पाहिजे.
वरील लेख कटू असला तरी वस्तुस्थिती हीच आहे हे आपण मान्य करून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक खोलवर विचार करून अॅक्शन घेणे गरजेचे आहे.