२००४ साल… भारतीय क्रिकेटला बऱ्यापैकी संतुलित संघ लाभला होता. राहुल द्रविड यष्टीरक्षण करीत असल्याने कर्णधार सौरभ गांगुलीला एक अतिरिक्त फलंदाज खेळविणे शक्य होत होते. द्रविडचे यष्टीरक्षण दर्जेदार होते यात वाद नाही. मात्र, कितीही झाले तरी तो एक “मेक शिफ्ट” विकेटकीपर होता हे नक्की. त्याने कर्णधाराने टाकलेली जबाबदारी सार्थपणे सांभाळली होती पण कुठेतरी भारतीय प्रेक्षकांच्या मनात ऍडम गिलक्रिस्टसारखा तडाखेबाज यष्टीरक्षक फलंदाज मिळावा असे वाटतच होते. आणि अशातच निवड समितीच्या समुद्रमंथनातून एक नवखे, उमदे रत्न बाहेर पडले: महेंद्रसिंह धोनी…
नावासारखेच भारदस्त देहयष्टी, चालण्याची एक अनोखी लकब, मानेवर रुळणारे केस, डोळ्यात एक विलक्षण चमक आणि भारतीय ऍडम गिलक्रिस्ट बनण्याची क्षमता असल्याची चुणूक या सगळ्या बाबी गोणीमध्ये भरभरून हा बिहारचा मुलगा भारतीय संघात स्थिरावू पहात होता. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये विशेष छाप न पाडू शकलेला हा छोकरा हळूहळू त्याचे हेलिकॉप्टर असे घुमवू लागला की, साऱ्या क्रिकेटविश्वाला आता त्याची दखल घेणे भाग पडले. द्रविडचा यष्टीरक्षणाचा भार कमी करणारा हा नव्या दमाचा खेळाडू चांगला स्ट्रीटस्मार्ट कर्णधार होऊ शकतो, हे खुद्द सचिन तेंडुलकरने निवड समितीला जेव्हा सुचविले तेव्हाच भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सोनेरी अध्यायाचा श्रीगणेशा झाला होता.
सचिनसारख्या रत्नपारख्याने जोखलेला हा हिरा कर्णधार झाल्यापासून भारतीय संघाने कधी मागे वळून पाहिलेच नाही. २००७ च्या पहिल्यावहिल्या टी२० विश्वचषकावर देशाचे नाव कोरण्यापासून जी यशोगाथा सुरू झाली ती वर्षामागून वर्षे जात असताना यशाची नवनवीन शिखरे सर करीत क्रिकेटप्रेमींना आनंद देत होती…
गोलंदाजीतील चाणाक्ष बदल, क्षेत्ररक्षणातील कल्पक योजना, विद्युल्लतेसम चपळ यष्टीरक्षण, जणू मनात कॅल्क्युलेटर घेऊन कुठल्या गोलंदाजाला खेळून काढायचे आणि कुणावर हल्ला चढवायचा, धावांचा पाठलाग करताना मॅच डीप नेऊन कशी जिंकायची, सोबत खेळणाऱ्या जोडीदाराला आधार देत नकळत मार्गदर्शन करीत भागीदारी कशी फुलवायची, अशा अनेक बारीकसारीक गोष्टींचे दर्शन धोनीमुळे होत होते. शेवटच्या २-३ चेंडूंवर सलग षटकार ठोकून प्रतिपक्षाच्या घशातून विजय खेचून आणावा तो धोनीनेच. तो खेळपट्टीवर उभा असेपर्यंत प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार कधीही निर्धास्त दिसायचा नाही… किती तो दरारा…!!!
यशाच्या हमरस्त्यावर मार्गस्थ झाल्यावर काही टीका, कटू प्रसंग यांचा सामना करण्याबाबत धोनीही अपवाद ठरला नाही. ज्या संघात सचिन, गांगुली, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग, कुंबळे असे कैक मातब्बर आणि प्रतिथयश खेळाडू असतील त्या संघाचे नेतृत्व करणे म्हणजे काटेरी राजमुकुट परिधान करण्यासारखेच नव्हे काय? आणि यामुळेच काही वेळा संघनिवड असेल किंवा व्यूहरचनात्मक बाबी असतील, धोनीवर निशाण साधले जात होते; काही जणांची कारकीर्द संपविण्यामागे धोनीच असल्याबद्दलही कधी खाजगीत तर कधी उघडपणे बोलले जात होते. एकंदर धोनी नावाचे प्रस्थ आणखी प्रशस्त खेळपट्टीवर खेळू लागले होते. एकीकडे टीकेचे शरसंधान आणि दुसरीकडे दुय्यम गोलंदाजांना घेऊन परदेशी दौऱ्यावर दारुण पराभव सहन करणे चालू होते… मात्र संयमाचा हा महामेरू निर्विकार भावमुद्रेला आपलेसे करून संघाची धुरा सांभाळीत होता.
मीडियाने कितीही चुचकारून पाहिले किंवा कॅमेरामनने कितीही मोठ्या झूम लेन्सचा कॅमेरा रोखला तरी धोनीच्या मनात काय चालले आहे, हे कुणाला कधीच कळले नाही. अटीतटीच्या सामन्यात जिथे आपले हृदय फुटून बाहेर येते की काय अशी अवस्था प्रेक्षकांची होत असताना या साहेबाच्या चेहऱ्यावर काहीही भाव दिसायचा नाही. आतून खवळलेला सागर किनाऱ्यावर लाटा येऊ द्यायचा नाही. मनातून उधळलेला अबलख घोडा त्याची चाल बदलायचा नाही… किती किलो आत्मसंयम साध्य झाल्यावर असे वागता येत असावे हे त्याला आणि त्यालाच ठाऊक… एकदा त्याची पत्नी साक्षी एका मुलाखतीत म्हणाली होती की तुम्हांलाच काय पण मलाही खूपच त्याच्या मनात काय चाललंय याचा थांग लागत नाही. किती अजबगजब रसायन आहे बघा हा एमएसडी…!!!
यशाची, धोनीच्या कप्तानीची सवय झालेल्या क्रिकेटविश्वाला २०१५ नंतर मात्र एका वेगळ्याच परिस्थितीला सामोरे जायची पाळी आली… एकीकडे विराट कोहलीचा विराट उदय होत होता तर निसर्गचक्राच्या तडजोडहीन पटलावर धोनीच्या कारकिर्दीचा उत्तरार्थ सुरू झाला होता. व्यूहरचना किंवा यष्टीरक्षण याबाबत तूसभरही कमी न पडणाऱ्या धोनीची धुवांधार फलंदाजी आता थोडीशी अवघडल्यासारखी भासत होती. दुर्दैवाने कमालीचे पदलालित्य (फुटवर्क) न लाभल्याने वाढत्या वयानुसार धोनीला सुदृढ धावगती राखणे अवघड जात होते, जोडीदारावर धावगतीतील तूट भरून काढणे अधिक सातत्याने दिसून येऊ लागले होते. इथूनच धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली होती. आजवर ज्या टीकाकारांची तोंडे चिडीचूप होती ते शड्डू ठोकून धोनीला आव्हान देत होते आणि माहीचे डायहार्ड फॅन्स मात्र त्यांच्या हिरोची ही अवहेलना मूकपणे, चरफडत सहन करीत होते.
आजूबाजूला इतके सगळे होत असताना कलिंगडासारख्या शांत आणि थंड मनाच्या या कर्णधाराच्या उमेदीची धार मात्र बिल्कुल कमी झाली नव्हती. एकदा अशाच एका पत्रकार परिषदेत एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने धोनीला निवृत्तीबद्दल छेडले असताना धोनीने तो प्रसंग अतिशय गंमतीशीरपणे हाताळला होता. त्या पत्रकाराला मंचावर बोलावून स्वतःशेजारी बसवून गोड बोलून काही प्रश्न विचारून धोनीने पत्रकाराचे हात व प्रश्न त्याच्याच गळ्यात लीलया बांधले होते. यूट्यूबवर त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. यातील विलक्षण बाब अशी आहे की, असे प्रसंग पूर्वनियोजित नसतात. खेळाडू जसजसा मोठा होतो तसतसा त्याचा दबदबा आणि अहंकारही मोठा होत गेलेला असतो. असे असताना नाजूक प्रसंगी स्वतःला योग्यपणे “कॅरी” करता येण्यासाठी अंगी एक वेगळेच मानसिक व बौद्धिक कौशल्य असावे लागते. धोनीकडे या कौशल्याची कमतरता कदापि नव्हती.
२०१९ च्या विश्वचषकातून आपण उपांत्य फेरीतून बाहेर पडत होतो. एका बाजूने धोनीने किल्ला लढवायची पूर्ण शर्थ केली होती पण जणू नियतीने त्या दिवशी लाल निशाण दाखवायचेच योजिले होते. धावबाद होऊन पॅव्हेलियनकडे परत जाणारा, आपण संघाला जिंकून देण्यास कमी पडलो या भावनेने जड पावलांनी माघारी फिरलेला, डोळ्यात अश्रुंचे आभाळ दाटून आलेला धोनी विसरणे कुणालाच शक्य नाही. दोन विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार आता बहुदा पुन्हा संघात दिसणार नव्हता… ७ नंबरचा सप्तरंगी सितारा आता पॅव्हेलियनच्या पलीकडे असलेल्या क्षितीजाच्या आड अस्ताला जात होता.
इतके होऊनही सर्वांना गेले वर्षभर वाटत होते की माहीने निवृत्त होऊच नये. माहेरी आलेली लेक जसे सासरी कधी जाऊच नये असे कुठल्याही आईबापाला वाटते; तसेच पोटच्या पोरासारखे ज्याच्यावर प्रेम केले, ज्याच्या कर्तृत्वाचा दिमाखाने माज केला त्याची निवृत्ती सहजपणे स्वीकारणे कमालीचे क्लेशदायी आणि अव्यवहार्य वाटणे स्वाभाविक आहे. आज दिवसभर स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात संपूर्ण देश व्यग्र असताना धोनीने त्याची निवृत्ती जाहीर केली. त्याच्या या निर्णयात धक्का बसण्यासारखे काही नसले तरी मनाला हुरहूर मात्र लागून राहिली. स्टंप माईकमधून ऐकू येणारा त्याचा अनोखा आवाज आता केवळ समालोचकाच्या माईकमधूनच ऐकायला मिळणार यावर आज शिक्कामोर्तब झाले. रेल्वेच्या टीसीने आज स्वतःच साखळी ओढून रेल्वे थांबविली. हेलिकॉप्टर हेलिपॅडवरच कायमचे स्थिरावले. मंडळी, आता अजून काही दिवस तो आपल्याला आयपीएलमध्ये खेळताना दिसेल आणि तोवर “माही मार रहा है।” असे म्हणण्याची संधी आपल्याला मिळत राहील, हेही नसे थोडके पण ब्ल्यू जर्सीमध्ये आता नेहमीचा ७ नंबरचा खेळाडू कधीच दिसणार नाही.
भावनेच्या भरात खूपजण नकळत वेगवेगळ्या खेळाडूंची एकमेकांशी तुलना करतात पण असे करणे त्या सर्वांवर अन्यायकारक ठरू शकते कारण प्रत्येकाची पार्श्वभूमी आणि तत्कालीन संघ, परिस्थिती सर्वच भिन्न असते. त्यामुळे मला तरी धोनीचा तुलनात्मक गोषवारा मांडणे प्रशस्त वाटत नाही. मात्र एक नक्की की असा चाणाक्ष, स्ट्रीट स्मार्ट कर्णधार भारतालाच काय तर अवघ्या क्रिकेटविश्वाला नजीकच्या काळात लाभणे अशक्य नसले तरी अवघड नक्कीच आहे.
जशी सचिन तेंडुलकरने १० नंबरची जर्सी क्रिकेटप्रेमींच्या मनात स्वतःच्या नावे नकळत राखून ठेवली तशीच धोनीने ७ नंबरची जर्सी अजरामर करून टाकली. सप्तसुरांच्या या मैफिलीला आता मुकावे लागणार असले तरी त्याची आजवरची नजाकत मनात कायमस्वरूपी घर करून गेली आहे, याबाबत तीळमात्र शंका नाही.
धोनी, एमएसडी, माही… तुला पुन्हा एकदा मानाचा त्रीवार मुजरा आणि आयुष्याच्या सेकंड इंनिंगसाठी खूपखूप शुभेच्छा…!!!
तुझ्या अफलातून हेलिकॉप्टरचा एक फॅन,
~ अरविंद तंगडी