प्रत्यक्ष लग्नमंडपात नारायणावर अजून एक जबाबदारी पडते…
वऱ्हाडी मंडळींच्या हातावर सॅनिटायझर शिंपडणे…
डिजिटल थर्मामीटरने त्यांचे तापमान मोजणे आणि त्याची नोंद करून त्यांना सोशल डिस्टनसिंग पाळून लांब लांब बसवणे.
त्यातल्या त्यात बायकांना लांब बसवणे ही मोठीच करामत, कारण एकमेकींच्या अवतारांची लांबून कल्पना येऊन पुरेसे नसते…
“अगं बाई… ही छबीच्या लग्नात नेसली होतीस तीच ना गं साडी… ह्याच्यावरच आमरस सांडला होता ना”… किंवा
“आत्याबाईंचा का गं हा लक्ष्मीहार… उजळून घेतलास वाटतं”… दुसरीकडे
“अय्या!.. गंगावन लावलंयस वाटतं, फेसबुकच्या प्रोफाइल पिकमध्ये तर खुरटलेले दिसत होते केस तुझे!”… तिसरीकडे…
“अगं हा तोच खड्यांचा सेट आहे ना, अनंताच्या मुंजीत घातला होतास तो… बरोबर तोच आहे, हारातला उजव्या बाजूचा पाचवा खडा पडला होता, मुंजीच्या फोटोत झूम करून पाहिलं होतं मी!”…
हे असं सगळं चाललं होतं…
तेही साडीला, दागिन्यांना आणि खऱ्या खोट्या केसांना स्पर्श करून…
जीभेबरोबर प्रत्येकीच्या नाकातोंडावरचा मास्कही घसरत होता…
बहुतेक मास्क लावून बोलले की आपण मारलेले टोकदार टोमणे आतल्याआत घासले जाऊन, बोथट होतील अशी प्रत्येकीला भीती वाटत असावी …!
म्हणजे सोशल डिस्टनसिंग तर जाऊच दे… पण पर्सनल हायजिनचे पण तीनतेरा वाजले होते.
तिकडे नवरा मुलगा अडून बसला,
मला लेदरचे हातमोजे पाहिजेत…
शेवटी नारायणानेच टूम काढली, लेदरवर कोरोना अठ्ठेचाळीस तास थांबतो…
तेव्हा कुठे नवरा मुलगा कापडी हातमोजे घालायला तयार झाला.
इकडे नवऱ्या मुलीची वेगळीच तऱ्हा…
कापडी हातमोजांत तिची मेंदी दिसत नव्हती म्हणून तिला प्लास्टिकचे पारदर्शक हातमोजे हवे होते.
मुहूर्त जवळ आला तसा वधुपित्याचा धीर सुटत चालला….
“नारायण, भटजी आले नाहीत रे अजून”…
पन्नास जणांच्या यादीत भटजी धरलाच नाही… भटजीला वॉचमननी गेटवरच अडवलं…
ह्यावर नारायणानेच तोडगा काढला…
भटजींना बाहेरूनच ऑनलाइन जोडून अँपस्टोरवरून लग्नविधीची अँप मिळवली आणि त्याचा ऑडिओ लाऊन विधी सुरू केले.
जवळच्या नातेवाईकांना लिंक पाठवून मीटमध्ये जोडून घेतलं म्हणजे त्यांना लाईव्ह लग्न पाहता येईल आणि बाकीच्या नातेवाईकांसाठी फेसबुक लाईव्हचा ऑप्शन ठेवला..!
हे सगळं करतांना, लिंक धरून थोडी आधीच जॉईन झालेली थोरली आज्जी नारायणाला म्हणाली,
“नारायणा, राबतोयस बाबा सारखा… कोपभर आयुषकाढा तरी घे.”
त्याला श्वास घ्यायलाही उसंत नव्हती… लॅपटॉपच्या स्क्रीनचा अँगल सेट करेपर्यंत दोन मिनिटं तो एकाजागी बसला…
ती संधी साधून आज्जीने विचारले,
“मुलाकडची मंडळी स्मार्ट आहेत हो अगदी” (याचा अर्थ स्मार्ट नाहीत)…
“डोंबलाची स्मार्ट!”– नारायण
आज्जीला हेच ऐकायचे होते… सांगा…
नारायण पुढे म्हणाला, “मी मुलाच्या काकांना म्हणालो, आपण लग्नाचं लाईव्ह टेलीकास्ट अरेंज करू म्हणजे दोन्हीकडच्या पाहुण्यांना एकदम पाहता येईल… तर म्हणतो कसा आम्ही काय इव्हेंट मॅनेजर म्हणून नाही आलो इथे… आता हे काय बोलणं झालं…आम्हीही बोललो असतो” एव्हढ्यावरून आज्जी… “मुलाच्या घरच्यांना बोलण्याचा स्मार्टनेसपणा नाही!” हे बोलायला मोकळी.
प्रत्यक्ष मुहूर्ताच्या वेळी तर नारायण अखंड वाजणाऱ्या डी.जे. सारखा…
त्या डी.जे.त लग्न सोडून दुनियाभरची गाणी लावतात, तसाच नारायण लग्न अटेंड करणं सोडून दुनियाभरची कामं एकहाती पार पाडत होता.
एका कोपऱ्यात त्याने लॅपटॉप सेट केलेला होता, एका हातात स्मार्टफोनवर फेसबुक लाईव्ह… दुसऱ्या फोनच्या हँडस फ्री वरून कोणाशी तरी खर्डेघाशी सुरू होती… तिसऱ्याच फोनवर ऑनलाईन मंगलाष्टक सुरू होती…
त्यात मध्येच…
“नारायणा, मला धोतर नेसवून दे तेव्हढं.”…. “नारबा, फूड डिलिव्हरी होईल ना वेळेवर..”…. “ब्रो, आमचा एक पीक घेऊन दे ना छानसा.”…. “नारूभाऊजी, माझा पैठणीचा मास्क राहू द्या हो तुमच्याजवळ, सेल्फी काढून झाल्यावर घेते.”… “नारायणा नेटपॅक संपला.”…
“नानअंकल, गेम डाउनलोड करून दे ना…!” अश्या चारही बाजूनी त्याच्यावर कामांच्या फैरी झडत होत्या.
एवढं करून प्रत्यक्ष लग्न या घटनेत नारायणाला कणभरही इंटरेस्ट नसतो…
मुलामुलींना आशीर्वादासाठी ऑनलाईन मीटमध्ये बसवून हा फूड डिलिव्हरीवाल्याची हजामत करायला सरसावतो…
जेवतानाही सॅनिटायझर नेमका कुठे ठेवला आहे हे फक्त नारायणालाच माहीत…
जेवताना बुफे…
जो तो आपापल्या हातात ताट घेऊन कोपरा पकडून उभा…
मग नारायणच प्रत्येकाजवळ जाऊन सेल्फी काढतो. काय हवं नको ते बघतो.
या सर्वांत मध्ये मध्ये येऊन उगाच लुडबूड करणारी एक आठ-नऊ वर्षांची चुणचुणीत मुलगी असते…
ती सारखी कॅमेरासमोर येऊन निरनिराळ्या पोझेस देत असते,
कारटीला पाहून ‘काय माकडतोंडी आहे!’ असं म्हणावसं वाटतं…
पण तिचे लाखभर फॉलोअर्स…
मग काय ‘अरे वा, टॅलेंटेड आहे हं मुलगी…!’ असं म्हणावं लागतं… काय करणार!
जेवणं आटोपल्यावर सर्वांचा जोर आईसक्रीमवर…
मग त्यात बटरस्कॉच तळाला गेलेले पाहून नारायण मोठयाने ओरडतो…
“तो मगाशी जोरात शिंकला तो पोरगा बटरस्कॉचच्या काउंटरवर होता ना…!” झालं… सगळी गर्दी त्या काउंटरवरून पांगते आणि आयुष काढ्याच्या काउंटरपाशी जमते.
जेवणं उरकतात… मुलाकडची मंडळी निघतात, सुमीही विदाईचा घागरा घालते…
निरोप घेताना नारायण तिच्या नवऱ्याला म्हणतो… “यू नो… जस्ट बीकॉज धीस कोरोना.. वुई आर सेंडिंग हर… लाईक धिस… सायलेंट… नाहीतर वुई हॅड अदर प्लॅन्स… यू टेक गुड केअर ऑफ हर… डोन्ट टच हर विदआऊट सॅनिटायझर… शी इज व्हेरी नाजूक यू नो…!” नारायणाचे डोळे पाणावतात…
सुमी सासरी जाते. पाहुणेही जातात. यजमान घरात येऊन स्मार्टफोनमध्ये डोकं घालून बसतात…
नारायणही सगळे फोटो सोशल मीडियावर अपलोड करतो… लाईक, कंमेंट्स बघतो… सगळ्या फोटोजना शे-हजार लाईक्स येतात,
पण नारायणाच्या सेल्फीला मात्र दोनच लाईक असतात, एक त्याच्या बायकोचा आणि दुसरा पोराचा!
नारायण घरी येतो… बायको हातावर सॅनिटायझर देते, पोरगा आंघोळीसाठी गिझर सुरू करतो… नारायण आंघोळ करून शांतपणे बेडरूममध्ये जातो आणि चौदा दिवसांसाठी होम क्वारंटाईन होतो.