आम्ही खवय्ये! सदानंद भणगे
नगरच्या प्रेमांत बाहेर गावाची माणसे पडतात त्याचं आणखी एक कारण म्हणजे इथले खाद्य पदार्थ. फार पूर्वी पासून नगर खवय्येगिरी साठी प्रसिद्ध आहे.त्याचं कारण आसपासच्या खेड्यातून येणारे दुध आणि दुधाचे पदार्थ.त्या मुळे इथे मिळणारे पदार्थ ताजे रुचकर आणि अस्सल असतात शिवाय ते इतर गावापेक्षा स्वस्त ही असतात.काही पदार्थ तर आमच्या लहान पणा पासून प्रसिद्ध आहेत आणि आजूनही तीच चव राखून आहेत.
लहान पणी आम्हाला पोकेट मनी मिळत नसे. एकदा सोसायटी हायस्कूल ला असताना खूप पाउस आल्या मुळे शाळेत थांबव लागल. तेव्हा स्कूल बस वगैरे नसायची आणि पोरांची काळजी पण नसायची,पाउस संपलाकी येतील घरी माहित असायचं.पण मला जाम भूक लागली होती. प्रकाश पितळे नावाचा माझा मित्र म्हणाला,चल आपण वडा खाऊ. त्याच्या बरोबर आयुष्यातला पहीला बाहेर खाल्लेला तो सोसायटी हायस्कुल च्या कॅन्टीन चा वडा आणि त्याची ती अफलातून चव अजून जिभेवर रेंगाळते आहे. त्या नंतर योग आला हजारे बंधूंच्या भेळेचा. ही भेळ आत्ता आत्ता पर्यंत खूप प्रसिद्ध होती.माने पर्यंत वाढलेले केस हालवीत हजारे जेव्हा डावाने स्टील च्या भांड्यातली भेळ कालवत तेव्हा तोंडाला पाणी सुटत असे.त्यांना स्पेशल भेळ मागितली की ते अख्खा बटाटेवडा हाताने कुस्करुन भेळीत घालत असत ती भेळ केवळ अप्रतिम. कधी ते भेळीत कचोरीही कुस्करुन टाकीत.मागे एकदा त्याना म्हटलं होतं आता चव थोडी बदलली आहे तर ते म्हणाले सगळ्याच गोष्टीतला अस्सलपणा कमी व्हायला लागलाय. खूप मोठ तत्वज्ञान सांगून गेले ते. एका भेळीच्या गाडीवर पाटी लिहिली होती,”जिभेचे चोचले पुरविण्या आधी खिशाचा सल्ला घ्या” आता मात्र खिशा बरोबरच पोटाचाही सल्ला घ्यावा लागतो. तशीच सिद्धीबागेतली सुधाकर भेळ, ते तर छोट्या मुलांना मुठभर शेव तशीच खायला द्यायचे.हे फक्त नगरलाच घडते.आणि भेळ सुद्धा पोटभर! बागेच्या बाहेरच अमृता मिसळ. तिथे मिळणारी गरम पुरीभाजी म्हणजे सकाळच जेवणच जणू.आशा टोकीज च्या पुढच्या बोळातली पुरी भाजी म्हणजे पुरी सम्पल मटकीची तरी मारलेली खमंग उसळ आणि त्यात बोंडा भजी.कापड बाजारातल्या लोकसेवाची पुरी भाजी मध्ये भाजी बटाट्याची तिखट जाळ आणि एकदम गरम. प्रत्येकाची वेगळी खासियत. पाणी पुरी खायची तर गंज बाजारातली.कायम गर्दी.आता सावेडीला स्वीट होम मध्ये मिळते तिथे पुरीतले पाणी असते थंडगार बुंदी घातलेले.एक प्लेट खाणारा अरसिकच.
मे महिन्यात पाहुणे आले की त्यांना गंज बाजारातली दुर्गासिंगची लस्सी पाजणे हा एक कार्यक्रमच असायचा.लस्सी म्हणजे घुसळलेले ताक अशी पुणे करांची कल्पना, नाहीतर केशर पिस्ता घातलेली साताऱ्याची लस्सी खास म्हणतात.पण जेव्हा दुर्गासिंग ची एक ग्लास घेतली तेव्हा आमचे पुणेरी मित्र रतीब लावल्या सारखे रोज मुक्काम असे पर्यंत लस्सी पीत राहिले.ग्लासभर लस्सीत डाव भरून आईस्क्रीम घालतात,ही कल्पनाच पाहुण्यांना आश्यर्य जनक वाटली.लस्सीच्या दरातच आईस्क्रीम ही मिळते ह्यावर पुणेकराचा विश्वासच बसेना. बाराही महिने इथे तशीच लस्सी मिळते.उन्हाळ्याच्या दिवसात तर उभं राहायला जागा नसते.दहा बारा प्रकारची लस्सी आईस्क्रीम कायम मिळत असते.आता त्यांची दुकाने गावा बाहेर सावेडी ला पण आलेली आहेत.ती पण गर्दीने भरलेली असतात. महाराष्ट्र भर बटाटे वडा प्रसिद्ध आहे,पण नगरची लज्जत वेगळीच.सोपानराव चा डांगे गल्लीतला वडा मुठ्भर आणि गरम असतो,प्रचंड गर्दीत ही गाडी उभी असते, मुख्य म्हणजे या गर्दीत सोपानराव उपास् सोडणाऱ्याना आगोदर वडा द्यायचे .चितळे रोड वर बेक्कार नावाचा अत्यंत चवदार वडा मिळतो.आपण नेहमी वडा पाव खातो पण तेली खुंटावर शोभा स्वीट मार्ट ला आणि पूर्वी नगर कॉलेज च्या पवार कॅन्टीन ला पावात वडा घालून तो तळून दिला जायचा त्याची चव इतकी लाजवाब असायची की आमचा एक मित्र दोन घास राहिले असताना पाणी प्यायचा, आणि मग दोन घास खायचा.चव तशीच राहावी म्हणून नंतर पाणी पीत नसे! बाकी दिल्ली दरवाजावरून सावेडी कडे यायला निघालो की ठीक ठिकाणी वाड्याच्या गाड्या भोवती गर्दी दिसते आणि खमंग वासाने गाडीला ब्रेक लावून थांबावेच लागते.
आमच्या कडे मिळणारा शुद्ध ताजा खवा हे ही एक नगरच्या प्रसिद्धीचे.आणि रुचकर पदार्थांचे कारण.नवी पेठच्या कोपऱ्यावर फक्त खव्याचे दुकान आहे. आसपासच्या खेड्यातून शेतकरी खवा आणतात. जितका खवा उपलब्ध होईल त्या प्रमाणात भाव ठरतो.रोज भाव बदलतो.बाहेर गावहून आलेली मंडळी किंवा नाटकासाठी आलेली कलाकार मंडळी आवर्जून हा खवा नेतात.ह्या ताज्या खव्या पासून केलेले गुलाबजाम वा लाडू संपे पर्यंत माणूस खातच राहतो. आमच्या बन्सी महाराजांच्या गुलाबजामला बाहेर गावाहून मागणी असते.हे दुकान आमच्या लहानपणापासून आहे.आता सावेडीला शाखा निघाली आहे तसेच बम्बईवाल्याची बासुंदी!,बाहेर गावच्या हलवायांचे, त्यांचे एक ते तीन दुकान बंदचे कितीही कौतुक होवो भले त्यांच्या दुकानासमोर मैलभर रांग लागो,ती मंडळी इथे आली की इथल्या पदार्थावर तुटून पडतात.आमचा दुकानदार खवा संपे पर्यंत दुकान उघडे ठेवतो,नंतर पाटी लावतो, खवा संपला.आता उद्या.
आमच्या लहानपणी माणिक चौकातल्या आदर्श शाळे समोर एक सरबताची गाडी उभी रहायची.रणरणत्या उन्हात त्या गाडी शेजारी उभं राहिलं तरी गार वाटायचं.भल्या मोठ्या पितली पातेल्यात केशरी रंगाच सरबत असायचं,तुडुंब भरलेला बर्फही असायचा.आठ आणे दिले की एका ग्लासात अर्धे संत्र पिळून पातेल्यातले सरबत मोठ्या डोंग्याने बर्फाचा एक खडाही न टाकता कौशल्याने मालक देत असे.दाताला ठणका बसेल इतक्या गार असणाऱ्या त्या सरबताची चव अमेरिकेतल्या कॉकटेल ला पण नाही आली. छाया टोकीज जवळच टरबूजाचे सरबत वा सर्जेपुरा जवळच दुध आणि सब्जा घातलेले सरबत ही असेच. अनेक वेळा पिऊनही आम्ही कधी आजारी पडलो नाहीत. त्याच्या शेजारी बर्फाच्या गोळ्याची गाडी,काडीवर गोळा थापून त्यावर बाटलीने रंगाचे सरबत टाकायला लागला की कधी गोळा मिळतोय,असं व्ह्यायच. आता आम्हाला इन्फेक्शन ची भीती वाटते,मुलांनाही उघड्यावरचे पदार्थ,सरबत देत नाही.तरी पण दहा रुपये खर्चून दिलेल्या इन्सटट फ्रुटी पेक्षा आमच पन्नास पैशाच संत्रा सरबत शतपटीन चांगलं होत.पाहुणे आले की कधी ओळीने सगळी सरबते आम्ही घेत असू.
त्या काळी दाक्षिणात्य पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा कॉलेज चे कामत कॅन्टीन. मसाला डोसा,मेदू वडा तेथेच मिळे.आणि मुख्य म्हणजे त्यांचा साबुदाणा वडा खास असे,रबरा सारखा चिवट पण चव काही औरच. सरोष कॅन्टीन चे मटन पैटीस केवळ अडीच रुपायाला मिळायचं तिथलं व्हेज पैटीस ही प्रसिद्ध होते सरोष कॅन्टीन चा ताजे बनपाव घेऊन एक माणूस रोज सकाळी सायकलच्या मागे मोठी पत्र्याची पेटीत घालून ते विकायला गावभर हिंडायचा,दर शनिवारी साकाळची शाळा असल्याने आई ते घेत असे आणि आम्ही चहा बरोबर तो खात असू. .मला आठवत,जुन्या कापड बाजारात मयूर कॅन्टीन उघडलं होत तिथे थंडगार दहिवडा मिळायचा.रॉयल मध्ये मिळणारे ग्रील सैन्द्वीच आणि त्या बरोबरची हिरवी चटणी रॉयल च्या प्रेमातच पाडते. आता प्रोफेसर कॉलनी चौकात सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा दावणगिरी दोस्यासाठी झुंबड उडालेली असते.तिथे सकाळी पापड भाजी देखील मिळते.वर बासुंदी चहा.
कापड बाजारात तर रात्री चौपाटीच असते,व्यापाऱ्यांची दुकाने बंद झाली की गाड्या यायला सुरुवात होते. पाव भाजी,डोसे, दावणगिरी डोसे,आईस्क्रीम,कुल्फी सर्व असते आणि मुख्य म्हणजे खरपूस तापलेले दुध.जसजशी रात्र होते तसं तसं दुध लालसर होत जात.शिवाय लस्सी,सरबते,आणि गोटीबंद बाटलीतला ताजा सोडा असतोच.रात्री चांगली गर्दी असते तिथे.
नासिक वाले भले कितीही कोंडाजी माकाजीच्या चिवड्याचे कौतुक करो,नगरला आले की काजू मनुका घातलेला रामप्रसाद चिवडा घेऊन जाणारच. वर्षानुवर्षे तिचं चव.त्या पुडक्यात मिळणारी शंभर रुपयांची नोट, अर्थात खोटी,प्रत्येक लहान मुलाला साठवायला आवडायची.नगरच फरसाण ताज म्हणून सगळ्यांना आवडत.त्यात विविध प्रकार.बम्बईवाल्याच वेगळ,थापर चे वेगळे तर छाया टोकीज जवळचा महाराज आपल्या समोर मिसळून देणार.
पूर्वी नगर मध्ये खानावळी फार नव्हत्या.पण डांगे गल्लीतल्या जोशींच्या खानावळीत गर्दी असायचीगरम गरम फुलके तिथे मिळायचे.माणिक चौकातून बँक रोड कडे जाताना कोपऱ्यावरच्या अपना घर च्या खानावळीतून गरम पोळ्याचा वास अस्वस्थ करायचा.आता बाहेर गावच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने अनेक पोळी भाजी केंद्रे निर्माण झाली आहेत.शिवाय हॉटेल मधून पंजाबी थाळ्या, खिस्त गल्लीत गुजराथी थाळी तर औरंगाबाद रोडवरच्या पंचरत्न मध्ये राजस्थानी थाळी उपलब्ध असते,दर रविवारी तेथे डाळबाटी सुद्धा मिळते.
फळांच्या बाबतीत सुद्धा नगरी वैशिठ्य आहे.नगर सारखे गावरान आंबे आणि बोर सबंध महाराष्ट्रात नाहीत.ही बोर खारकी नसतात.आंबट गोड असतात.बोरांच्या हंगामात पुणे मुंबईचे नातेवाईक ही बोर घेऊन या म्हणून आग्रही असतात.ह्या बोरांची आठवण दुर्गाबाई भागवतांनी लिहिली आहे,त्या नगरला डॉ.रामजी जाधवांच्या वाड्यात राहत,तेथे एक बोरीच झाड होते.त्या स्वतः मैत्रिणी बरोबर झाडावरची बोर पाडत.अहमदनगर सोडल्या नंतर मी आज पर्यंत अशी बोर खाल्ली नाहीत,असं त्यांनी लिहून ठेवले आहे.तसच आंब्याचं.रसाळ पातळ रस असणारे आंबे हापूस पायरीच्या वरच्या पायरीवर असतात.आणि भाव ही असतो चौदाच्या पटीत.खायला बसले की बादली भर रस चौघा,पाच जणात संपतो.पूर्वी चौका चौकात आढ्या लागायच्या.इतर फळही असतात पण टी सगळी कडे सारखीच.विशेष म्हणजे आमचे विक्रेते ती प्रेमाने विकतात.गिर्हाईक जायला लागलं की भाव कमी करतात.”हात लाऊ नका,निवडून घेऊ नका” असं वसकन अंगावर येत नाहीत.उलट संत्री आणायला गेल्या नंतर नमुना म्हणून अख्खे संत्र देणारे महाभाग नगर मधेच सापडतात.
तसं म्हटलं तर आमचा जिल्हा दुष्काळी म्हणून प्रसिद्ध.प्यायला पाणी नाही,पण दुधात भरपूर पाणी.असं असूनही खाद्यपदार्थ मात्र ए वन.याचं कारण म्हणजे घरची गृहिणी जशी प्रत्येक पदार्थ मन लावून करते,मायेने करते तसा आमचा दुकानदार तयार करतो.आग्रहाने खायला घालतो.नवरात्रात केडगाव देवीच्या जत्रेत परातीत ठेवलेली पिवळी जर्द शेव खाविशीच वाटते.तर लाल रंगाची गुडीशेव लहानपणाची आठवण करून देते.आमच्या लहानपणी काही माणसे उंच काठी घेऊन हिंडायचे,काठीच्या टोकाशी गोडसर चिवट पदार्थ घोटून लावलेला असे.दहा पैसे दिले की ती माणस त्या पासून अंगठी,घड्याळ असं काही करून द्याचे,ते चवीलाही छान लागायचं.रॉयल ची हिरवी कुल्फी खाताना आम्हाला आठवते ती शाळेत जाताना कधी घेतलेली रवाळ लिव्ह मोअर किंवा जॉय मोअरची कांडी.आणि त्यांच्या त्या तीन चाकी बॉक्स च्या ढकलगाड्या. शाळेत जातानाची आणखीन एक आठवण म्हणजे,मोठ्या ताटात हरभऱ्याची उसळ लिंबू पिळून किंवा उकडलेल्या अर्ध्या बटाट्यावर तिखट मीठ टाकून विकणारा माणूस.ते खाण्याचा खूप मोह व्हायचा पण खिशात पैसेच नसत.
पांजरपोळ संस्थेत मिळणारा गुळभेंडीचा हुरडा हे आणखी एक आकर्षण.बऱ्याच मंडळीना हुरडा काय हेच माहित नसत.पूर्वी शेतकरी ज्वारीची कणस तयार व्ह्यायच्या आगोदर कोवळी कणसे सोलून शेतातच आगटी,म्हणजे छोट्या खड्यात गोवऱ्याच्या भट्टीत कणस भाजत आणि ती हातावर चोळून दाणे काढून देत,त्याच्या पार्ट्या चालायच्या,सोबत गुळ,दही,दाणे चटणी असली की विचारायलाच नको,तो देत राहायचा आपण खात राहायचं.आता पंजापोळ प्रमाणे बऱ्याच ठिकाणी किलोवर हुरडा मिळतो.खेड्यातून आजूनही शेतकरी हुरडा खायला बोलावतात.मित्राच्या शेतात गेल की असा हुरडा खाल्यानंतर तो गुऱ्हाळा कडे न्यायचा, तेथे भल्या मोठ्या काहिलीत जाळावर उसाचा रस खदखदत असायचा, गुळ बनवण्या साठी.मनसोक्त रस पिऊन झाला की मित्र आम्हाला गुळ तयार व्ह्यायच्या अगोदरचा द्रव पदार्थ बाटलीत भरून द्यायचा, तिला काकवी म्हणत. ती वर्षभर टिकायची.,पोळी बरोबरही आम्ही खायचो आणि आरोग्यालाही चांगली असायची.आहे ना हे वैषिष्ठपूर्ण? आता काकवी च्या नावाखाली गूळाच पाणी विकतात असं ऐकलय.
स्वीट होम,महेंद्र पेडावाला,श्रद्धा अशी अनेक हॉटेल्स शाकाहारीना चवदार जेवण देतात.आनंदऋषी मार्गावर असलेले आयरिस मध्ये तर इटालियन फूड खूप चांगल्या पध्दतीचे मिळते.इथला पास्ता केवळ लाजवाब.सावेडी ला प्रभात बेकरी जवळ एक हॉटेल आहे तेथे तुम्हाला भाजी विचारली जाते,त्या नंतर ती भाजी तुमच्या समोर केली जाते आणि दिली जाते.
मांसाहरी पदार्थात ही नगर खूप नावाजलेले आहे.इथे मिळणारे मटन दुसरी कडे कुठेही मिळत नाही.शेर ए पंजाब नावाच पूर्वी सर्जेपुराला प्रसिद्ध हॉटेल होत.आता ही पंचशील,थापर्स इन,लेमन स्पाईस आणि वेगवेगळ्या धाब्यावर उत्कृष्ठ जेवण मिळते.
किती पदार्थांची नावं घ्यायची?.... आता जीवनसत्व हरवलेली अन्न धान्ये खाताना पूर्वीच्या चवींचा आंनद मिळत नाही, तरीही नगर ने काही पदार्थांचे जतन केलंय,आम्ही ती चव शोधात हिंडत असतो.
सदानंद भणगे
९८९०६२५८८०