📖📖 लघुकथा 📖📖
लेडीज, डू यू हॅव इट इन यु?
✍🏻लेखिका-©® प्रिया जोशी (#आनंदाचे डोही)
काही महिन्यांपूर्वी एका टीव्ही सिरीयल मधे एक वाक्य ऐकलं होतं…’फौजी लाखात एक असतो पण फौजीची बायको दहा लाखात एक असते.’ मला विचाराल तर हे वाक्यच लाख मोलाचं आहे. मी स्वतः एका फौजीची बायको आहे म्हणून नाही तर मी माझ्यासारख्याच इतर अनेक लेडीज ना अगदी जवळून बघितलंय म्हणून.. हो… there are no women in the armed forces… We are all ‘ladies’…..
माझ्या लग्नाच्या वेळी माझी फक्त एकच अट होती…माझा नवरा armed forces मधलाच पाहिजे. माझ्या या निर्णयावर माझ्या घरच्यांच्या मिश्र प्रतिक्रिया होत्या. पण बहुतेक सगळ्यांचा विरोधच होता. आणि त्याचं मुख्य कारण होतं- आपल्या armed forces बद्दल civilians च्या मनात असलेले गैरसमज आणि अज्ञान…
सगळ्यात जास्त विरोध होता माझ्या बाबांचा. त्यांनी खूप प्रयत्न केला माझा निर्णय बदलायचा…कधी प्रेमानी समजावून सांगितलं, तर कधी वैतागून ओरडले सुद्धा. अर्थात, त्यामागे त्यांना माझ्याविषयी वाटणारं प्रेम आणि काळजी मला समजत होती; पण मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम होते. त्यांच्या विरोधाचं मुख्य कारण होतं त्यांची मिलिटरी बद्दलची misconceptions. ..जी almost सगळ्यांचीच असतात.. पण त्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर माझ्याकडे तितकाच स्ट्रॉंग प्रतिमुद्दा होता..त्यातले एक दोन मुद्दे म्हणजे…..
सैन्यातले लोक दारू पितात, सिगारेट ओढतात…..जसं काही सिविलीयन्स हे सगळं करतच नाहीत . मी आजपर्यंत आर्मी च्या इतक्या parties, इतके इव्हेंट्स अटेंड केलेत पण गंमत म्हणजे आजपर्यंत मी एकाही ऑफिसरला दारू पिऊन धिंगाणा घालताना किंवा कोणाबरोबर misbehave करताना बघितलं नाहीये.
दुसरा मुद्दा होता…सैन्यातल्या लोकांच्या जीवाची शाश्वती नसते…..ती तर जगात कोणाच्याच जीवाची नसते.पण एक सैनिक शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी , त्याच्या देशबांधवांसाठी जीवाची बाजी लावतो आणि म्हणूनच तो अमर ठरतो.
माझे बाबा एक एक मुद्दा माझ्यापुढे मांडत गेले आणि मी त्या प्रत्येक मुद्द्याचं खंडन करत गेले. शेवटी नाईलाजाने का होईना पण ते तयार झाले.
आणि जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा अगदी अभिमानानी सगळ्यांना सांगत होते..” अगदी सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाहीये बरं का माझ्या जावयाला.”
मला जरी आर्मी लाईफची मनापासून आवड होती तरीही लग्ना नंतर सुरुवातीचे काही दिवस माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. लवकरच मला जाणवलं की civil आणि armed forces ही दोन वेगळी विश्वं आहेत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट जाणवली – ती म्हणजे ‘This is not a normal, typical marriage.” आणि म्हणूनच सैनिकाच्या पत्नीला सुद्धा इतर बायकांसारखं टिपिकल राहून चालत नाही. या नात्याला , आपल्या नवऱ्याला चाकोरीबद्ध अपेक्षांमध्ये बांधायचा प्रयत्न कोणतीही फौजी बायको कधीही करत नाही. आणि जर कोणी तसा काही प्रयत्न केलाच तर सुरुवातीला एक दोन झटके लागल्यावर आपोआप त्यांना आपली चूक लक्षात येते.
त्यामुळे कोणतीही मुरलेली फौजी बायको आपल्या नवऱ्याला “आज ऑफिस मधे काय केलं?” हा टिपिकल प्रश्न कधीही विचारत नाही. कारण नवऱ्याकडून आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही याची तिला खात्री असते; आणि जर कधी मिळालंच तर ते कितपत खरं आहे याची शाश्वती नसते. ऑफिसमधून आल्या आल्या आपल्या मुलांशी दंगामस्ती करणारा तिचा नवरा कदाचित सीमेपार जाऊन एखादा surgical strike करून आलेला असण्याचीही शक्यता असते. आणि हे सत्य संपूर्ण इंडियन आर्मीला जरी माहित असलं तरी त्याचा परिवार या सत्याला पूर्णपणे अनभिज्ञ असू शकतो.
कुठल्याही फौजीसाठी proper turnout हा खूप महत्त्वाचा असतो आणि तोही अगदी नखशिखांत! मग ते चमकणारे shoes असो, कडक इस्त्रीचे कपडे असो किंवा immaculate haircut असो. हजारोंच्या गर्दीतूनही तुम्ही एखाद्या फौजीला अगदी सहज ओळखू शकता ते त्याच्या या proper turnout मुळेच. आणि त्यांच्या बायका मुलांकडूनही त्यांची हीच अपेक्षा असते. या संदर्भात एक मजेशीर किस्सा आठवला. म्हणजे आता मजेशीर वाटतोय पण त्यावेळी माझ्यासाठी खूपच धक्कादायक होता तो प्रसंग….अगदी cultural shock च म्हणा ना !!
त्याचं असं झालं… आमच्या लग्नानंतर काही महिन्यांत आमची पोस्टिंग आगरतला मधे झाली. तिथे नितीन (माझा नवरा) स्टाफ ऑफिसर असल्यामुळे त्याला कमांडर बरोबर सतत वेगवेगळ्या पोस्ट्स वर inspections वगैरे साठी जावं लागायचं. कधी कधी कमांडर ची पत्नी पण फॅमिली वेल्फेअर च्या कामानिमित्त त्यांच्याबरोबर जायची. अशा वेळी त्या मलाही बरोबर चलण्याचा आग्रह करायच्या.. म्हणायच्या,” आत्ता मुलं बाळं नाहीयेत तोपर्यंत फिरून घे, दोघं शक्य तेवढे एकत्र राहा. नंतर आहेच वेगळं राहणं !”
तर अशाच एका ऑफिशियल visit साठी आम्ही एका पोस्ट वर गेलो होतो. साहजिकच कमांडर येणार म्हटल्यावर त्या पोस्ट वरच्या ऑफिसर्स नी रात्री एक स्नेहभोजनाचा बेत ठरवला होता. त्या रात्री जेव्हा आम्ही मेस मधे जाण्यासाठी तयार होत होतो तेव्हा अचानक माझ्या लक्षात आलं की माझ्या एका चप्पल चं लेदर एके ठिकाणी थोडं घासलं गेलंय; पण त्यामुळे तिथला रंग उडल्यासारखा दिसत होता.मी जेव्हा हे नितीन ला सांगितलं तेव्हा एका क्षणाचाही विलंब न करता तो म्हणाला,” मग तू येऊ नको मेसमधे !!” त्याचं ते matter of fact वक्तव्य ऐकून मला धक्काच बसला. माझ्या चेहेऱ्यावरचं भलंमोठं प्रश्नचिन्ह बघून तो पुढे म्हणाला,” मेस मधे जाताना Turnout परफेक्ट असायला पाहिजे. ” पण जर मी गेले नसते तर दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्या प्रश्नार्थक नजरांना सामोरं जावं लागलं असतं. त्यामुळे मी माझ्या डोक्यातला -‘आणीबाणीच्या परिस्थितीत तत्काळ निर्णय घेणे’- हा स्विच ऑन केला…आजूबाजूला असलेल्या वस्तूंवरून एक नजर फिरवली आणि मला उपाय सापडला. मी नितीनच्या सामानातलं shoe polish घेतलं आणि कामाला लागले. काही मिनिटांतच माझी दोन्ही पादत्राणे एकसारखी आणि अगदी नवीन दिसायला लागली. थोडंसं घाबरतच मी माझी ती कलाकारी नितीनला दाखवली ; त्यानी अगदी नीट inspection करून शेवटी एकदाचं ‘ओके’ म्हटलं आणि मी त्याच्याबरोबर मेस मधे गेले.
एक खूप महत्त्वाची आणि प्रत्येकानी अंगीकारावी अशी अजून एक सवय म्हणजे armed forces मधली punctuality. दिलेली वेळ पाळणं हे त्यांच्यासाठी अध्याहृत असतं….मग ती युद्धभूमी असो किंवा एखाद्या समारंभाचं आमंत्रण…. दिलेली वेळ ही अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत पाळली जाते. आणि हा वक्तशीरपणा हळूहळू त्यांच्या परिवाराचा एक अविभाज्य घटक बनून जातो. आमचा परिवार देखील याला अपवाद नाही. ही सवय इतकी अंगात भिनली आहे की आम्ही अगदी साधं बाहेर जेवायला किंवा शॉपिंग करायला जरी जाणार असलो तरी अगदी ठरवलेल्या वेळेलाच घरातून बाहेर पडतो. आमच्या दोघी मुलींना पण लहान असल्यापासूनच हे माहिती आहे…त्यामुळे जर अकरा वाजता निघायचं ठरलं असेल तर त्या पाच मिनिटं आधीच तयार होऊन बसलेल्या असतात; कारण अकरा वाजता घराच्या दाराला बाहेरून कुलूप लागलेलं असतं. पण आमच्या या ‘वेळ पाळण्याच्या’ सवयीमुळे माझ्या civilian मित्रपरिवार आणि नातेवाईकांना मात्र बऱ्याच वेळा अडचणीत टाकलं आहे. कारण त्यांच्या मते ‘जर पाच वाजता भेटायचं ठरलं असेल तर – पाच म्हटलं की साडेपाच सहा होणारच!’ पण माझ्यासाठी पाच म्हणजे ‘पाच’ च ना….. मी कितीही प्रयत्न केला तरी मला उशीर करायला जमतच नाही. त्यामुळे आता यावर मी आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनी एक तोडगा काढलाय. जेव्हा एखादा कार्यक्रम ठरतो तेव्हा भेटण्याच्या दोन वेळा ठरतात…इतरांसाठी एक वेळ आणि माझ्यासाठी त्याहून उशिराची वेळ!! पण इतका सगळा द्राविडी प्राणायाम करूनही माझ्यानंतर पोचणारे एक दोन लेट लतीफ असतातच ….असो, याबाबतीत जास्त काही न बोललेलंच बरं !!
माझ्या लग्नानंतर काही दिवसांतच अजून एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली …या नात्यामधे जे तुमच्या नवऱ्याचं ते सगळं तुमचं .…त्याची रेजिमेंट ही तुमची रेजिमेंट, त्याची फौजी फॅमिली ही तुमची फॅमिली, त्याच्या जवानांच्या परिवारांची जबाबदारी तुमच्यावर, त्याचे कोर्समेट्स हे तुमच्या नात्यातला अविभाज्य घटक ! या सगळ्यांबरोबर राहता राहता त्यानी घेतलेला देशसेवेचा वसा तुम्ही कधी घेता हे तुमचं तुम्हालाही कळत नाही. मी देखील माझ्याही नकळत हा वसा घेतला आणि ठरवलं- ‘उतणार नाही, मातणार नाही- घेतला वसा टाकणार नाही.’
प्रत्येक सैनिकासाठी…मग तो ऑफिसर असो किंवा जवान… त्याच्यासाठी त्याचा देश हा सर्वप्रथम असतो. त्यानंतर असते त्याची पलटण (रेजिमेंट) , मग नंबर येतो तो त्याच्या रेजिमेंट मधल्या ऑफिसर्स आणि जवान यांचा. आणि त्यानंतर त्याच्या बायको मुलांचा नंबर लागतो. याशिवाय एक खास कप्पा त्याच्या कोर्समेट्स करता राखीव असतो… आणि तिथे कोणालाही प्रवेश नसतो- अगदी बायकोला सुद्धा..ही वस्तुस्थिती एकदा स्वीकारली की मग तुम्ही कायम सुखी आणि समाधानी… पण एकदा का तुम्ही त्याच्या मनाच्या सिंहासनावर विराजमान झालात की तिथून तुम्हाला कोणीही उठवू शकत नाही… तुमचं राज्ञीपद अढळ आहे हे नक्की.
प्रत्येक वीरपत्नी ला ही खात्री असते की जर कधी देश आणि परिवार यांच्यात निवड करायची वेळ आली तर तिचा जोडीदार मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्याच्या मातृभूमी च्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावेल.पण या बाबतीत तिची काहीच तक्रार नसते, कधीच! उलट तिला या गोष्टीचा सार्थ अभिमान असतो!
आणि हे सगळं तिच्या जोडीदारालाही मनोमन माहित असतं, म्हणूनच तर तो सगळा संसार तिच्या भरवशावर सोडून देशासाठी जीव द्यायला देखील तयार असतो.
तसं पाहिलं तर ‘समोरच्या व्यक्तीला समजून घेणं’ ही प्रत्येक नात्याची मूलभूत गरज आणि अपेक्षा असते. पण एका सैनिकाच्या परिवारात, त्यांच्यातल्या नात्यात त्याचं प्रमाण खूप जास्त असावं लागतं.….. जर नवऱ्यानी एखादं प्रॉमिस केलं असेल आणि तो ते पाळू शकला नाही तर त्यामागे तसंच काहीतरी सबळ कारण असेल- हा विश्वास , ही खात्री प्रत्येक सॅनिकपत्नीला असते. मग ते प्रॉमिस कोणतंही असो…मुलांबरोबर एखादं outing असो किंवा annual leave मधे hometown ला जायचा प्लॅन असो. कोणताही प्लॅन कुठल्याही क्षणी कॅन्सल किंवा postpone होऊ शकतो. पण अशावेळी आपल्या नवऱ्याच्या intentions वर शंका घेत, त्याला दहा गोष्टी ऐकवण्याची चूक आम्ही करत नाही. कारण त्यामागची त्याची असहायता आम्हाला माहीत असते. आणि या असल्या क्षुल्लक कारणावर भांडत बसायला आमच्याकडे वेळही नसतो. हिरमुसलेल्या मुलांना समजावण्याचं खूप महत्त्वाचं काम असतं आमच्यासमोर- आणि आम्ही ते अगदी लीलया करतो.
आपल्या देशाच्या शत्रूसाठी कर्दनकाळ असलेल्या या कणखर शिपायाचं मन तितकंच हळवं ही असतं… फक्त आपल्या भावना इतरांसमोर व्यक्त करण्याची त्याची पद्धत जरा रांगडी असते. पण त्याचा परिवार ही त्याची strength असते. आणि त्याचं हे परिवारावरचं प्रेमच त्याला मोठमोठ्या संकटांना सामोरं जायचं बळ देतं.
या नात्यात ‘मिलना – बिछडना ‘ हा सिलसिला सतत चालू असतो. आम्हां आर्मी वाल्यांसाठी दर दोन तीन वर्षांनंतर वेगळं राहायची वेळ येते. मग अशा वेळी anniversary, स्वतःचे आणि मुलांचे वाढदिवस, त्यांचे annual day, sports day सारखे कार्यक्रम, त्यांची आजारपणं, अभ्यास परीक्षा , पाहुणे रावळे सगळं सगळं आम्हाला एकटीला manage करावं लागतं.त्याबद्दल आमची कधीच काही तक्रार नसते.. १९९९ पासून २००२ पर्यंत – म्हणजे सलग चार वर्षं मी आणि माझा नवरा आमची anniversary एकत्र celebrate करू शकलो नव्हतो.कारण पहिली तीन वर्षं तो राजौरीला होता आणि चौथ्या वर्षी नक्की कुठे होता ते मला अजूनही माहीत नाहीये. (कारण त्यावेळी Operation Parakram साठी आपली सेना बॉर्डरवर तैनात होती.पण तेव्हा परिस्थिती इतकी गंभीर होती की कोण कुठे आहे याबद्दल ची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. अगदी आम्हां कुटुंबियांपासून सुद्धा !) पण मग २००३ साली आम्ही एक जंगी पार्टी करून आधीच्या चार वर्षांची उणीव भरून काढली. कितीतरी वेळा आम्ही आमच्या मुलींचे वाढदिवस दोनदोन वेळा साजरे केले आहेत….एक actual त्या दिवशी आणि एक त्यांचे बाबा आल्यानंतर ! ‘साधू संत येती घरा’ सारखं आमच्या बाबतीत ‘नवरेबुवा असती घरा तोचि दिवाळी दसरा ‘….
अशा खास दिवसांसाठी एकत्र असणं हीच आमच्यासाठी पर्वणी असते…आणि म्हणूनच ‘तुझ्या नवऱ्यानी तुला काय गिफ्ट दिलं?’ हा प्रश्न आम्ही बायका एकमेकींना कधीच विचारत नाही. कारण आम्हाला अशा गिफ्ट्स चं काहीच अप्रूप नसतं. पूर्ण परिवार एकत्र असणं हेच आमचं गिफ्ट.
आम्ही सगळं काही एकटीनी निभावून नेतो पण जर कधी मुलं आजारी पडली ना- तर मात्र वाटतं की ‘आत्ता नवरा जवळ असायला हवा होता.’
प्रत्येक फौजी घरात एक ‘ready to go’ अशी ट्रंक तयार असते. बऱ्याच वेळा नवऱ्याला अचानक शॉर्ट नोटीस वर बाहेरगावी जावं लागतं…कधी एक दोन दिवसांच्या तर कधी काही तासांच्या नोटीस वर. अशा वेळी ही ट्रंक उपयोगी ठरते. तिच्यात इतर आवश्यक सामानाबरोबरच प्रत्येक प्रकारच्या युनिफॉर्म चा किमान एक तरी सेट कायम धुवून, प्रेस करून तयार असतो, हो ! आर्मी मधे जवळजवळ पाच सहा प्रकारचे uniforms असतात. आणि त्याप्रमाणे shoes पण वेगवेगळे असतात.
कितीतरी वेळा असंही होतं की सकाळी मुलं शाळेत जातात तेव्हा त्यांचे बाबा घरी असतात पण दुपारी शाळेतून परत आल्यावर त्यांना कळतं की ‘बाबा गावाला गेले. आणि कधी परत येणार ते माहीत नाही’ ….No parting hugs … no good byes ..फक्त आपले बाबा लवकर परत यावे म्हणून त्यांची वाट बघत बसण्यापलीकडे ती मुलं काही करू शकत नाहीत. आम्हां बायकांची अवस्था पण फारशी वेगळी नसते. आणि म्हणूनच जेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो तेव्हा अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत प्रत्येक दिवस साजरा करतो… पुढे येणाऱ्या दुराव्याच्या दिवसांसाठी गोड अशा आठवणी साठवून ठेवतो.
हे सगळं लिहिणं खूप सोपं आहे पण ते आचरणात आणणं तितकंच अवघड आहे. त्यासाठी जबरदस्त इमोशनल आणि मेंटल strength लागते.
पण या अशा अनिश्चीततेमुळे बऱ्याच वेळा आमच्या घरचे लोक थोडे वैतागतात. मला जेव्हा माझे बाबा आमच्या सुट्टीच्या तारखांबद्दल , पुण्याला जाण्याच्या प्रोग्रॅम बद्दल विचारायचे तेव्हा मी सगळं तारखेनिशी सांगून शेवटी एक वाक्य जोडायचे- ‘सध्या तरी हा प्लॅन आहे. जर ऐनवेळी काही बदल झाला तर सांगता येत नाही.’ हे माझं वक्तव्य ऐकलं की ते खूप वैतागायचे; म्हणायचे-‘तुमचं कधीच काही नक्की नसतं.’ पण या अशा uncertainty च्या मागचं खरं कारण ते कधीच समजू शकले नाहीत. कदाचित त्यांच्या मनातल्या पितृप्रेमापुढे त्यांना हे जाणवत नसेल….
पण त्याहूनही जास्त – अशा बदललेल्या किंवा रद्द झालेल्या प्रोग्रॅम मुळे आमचा जो विरस व्हायचा तो खूप कमी लोकांच्या लक्षात यायचा.
आर्मी नी मला खूप काही दिलं… आणि तेही अगदी भरभरून….
माझ्यातल्या कितीतरी सुप्त कलागुणांची मला जाणीव झाली …खूप काही शिकले मी इथे…म्हणजे अगदी dry flower arrangements पासून ते seven course dinner बनवण्यापर्यंत!
Cultural events मधे सूत्र संचालन करण्यापासून ते एकांकिकेची script लिहिण्यापर्यंत सगळं करवून घेतलं या आर्मी नी माझ्याकडून! सगळं म्हणजे शब्दशः स…ग…ळं…
हे सगळे नवनवे अनुभव माझ्या खात्यात जमा होत गेले आणि त्यामुळे माझं जीवन समृद्ध होत गेलं.
एखादा बाशा ( छोटंसं गवताचं घरकुल) असो नाही तर राजमहालासारखा प्रशस्त बंगला….. त्या राहत्या जागेत नंदनवन फुलवण्याचं कसब याच आर्मी कडून शिकले मी.
माझी आई नेहेमी म्हणायची,” जे आहे ते गोड मानून घेता आलं पाहिजे!” लहान होते तेव्हा या वाक्याचा नक्की अर्थ कळायचा नाही, पण आर्मीमुळे आईच्या त्या वाक्याचा खरा अर्थ समजला… नुसता समजलाच नाही तर माझ्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग झाला. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी राहायची संधी मिळाली.. कधी मोठ्या शहरांत तर कधी अगदी रिमोट ठिकाणी असणाऱ्या आडगावात…अशी गावं की ज्यांची नावं पण कधी ऐकली नव्हती.
सर्वधर्मसमभाव…. किती भारदस्त शब्द आहे नाही हा! पण आर्मी नी या शब्दाचा अर्थ अगदी सोप्पा केला … समोरच्या व्यक्तीला ती जशी आहे तशी स्वीकारणं….अशा वेळी त्या व्यक्तीचा धर्म, श्रद्धा, जात, भाषा, प्रदेश, आहार या आणि अशा क्षुल्लक गोष्टींना काडीचीही किंमत राहत नाही…सगळे जण एकत्र येतात…एक परिवार म्हणून राहतात..
जितक्या श्रद्धेनी एखादी मराठी व्यक्ती गुरुद्वारा मधे जाऊन गुरू ग्रंथ साहिब चे पाठ म्हणते तितक्याच भक्तीनी एखादी मुसलमान व्यक्ती जन्माष्टमीच्या दिवशी मंदिरात हवन करते.
आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जातो…आपल्याही नकळत.. आणि आर्मी मधे दर दोन तीन वर्षानंतर नवीन लोकांशी संपर्क झाल्यामुळे मला तर खूप काही शिकायला मिळतं. इतर प्रांतांतल्या लोकांची राहाणी, त्यांच्या कडच्या खास रेसिपीज, त्यांचे सणवार, रीती रिवाज….खरंच किती समृद्ध आहे आपल्या देशाची संस्कृती ! विभिन्न तरीही एकसंध… ‘अनेकता में एकता’ या शाळेत शिकलेल्या वाक्याचा खरा अर्थ मला आपल्या आर्मी नी शिकवला.
आधी मला वाटायचं की ‘नाती जोडणं आणि ती जपणं ही देखील एक कला आहे , आणि ती प्रत्येकाला जमतेच असं नाही.’ पण आर्मी च्या या भल्या मोठ्या कुटुंबाची एक सदस्य झाले आणि रोज एक नव्या नात्यात बांधली गेले.. आणि गंमत म्हणजे, ही नाती जपायला मला कुठलाही वेगळा प्रयत्न नाही करावा लागला. Blood is thicker than water – असा समज असणाऱ्यांनी एकदा तरी या olive green नात्यांची दखल घ्यावी, अशी माझी त्यांना अगदी नम्र विनंती आहे. एकदा का तुमची एखाद्याशी ओळख झाली की आपोआप तुम्ही एका नात्यात बांधले जाता…. आणि या नात्यांचे प्रकार तरी किती- इथे तुम्हांला अगणित मित्र मैत्रिणी मिळतात, राखी पौर्णिमेला सख्खा भावाच्या हक्कानी तुमच्याकडून राखी बांधून घेणारे ऑफिसर्स तेवढ्याच हक्कानी तुम्हाला ‘भाईदूज का शगुन’ पण देतात.करवा चौथ च्या दिवशी भल्या पहाटे तुमच्यासाठी ‘सरगी’ घेऊन येणारी एखादी सीनिअर लेडी तुमच्या सासूची जागा घेते. एखाद्या नव्या नवरीला आईच्या मायेनी समजावून, वेळ प्रसंगी हलकेच दटावून, हळू हळू या ऑलिव्ह ग्रीन परिवारात सामावून घेणारे सगळे जण लवकरच तिची फॅमिली होतात.
अश्या या आपल्या आर्मी बद्दल कितीही लिहिलं तरी कमीच आहे. असं म्हणतात की,” तुम्ही एखाद्या व्यक्तीला आर्मी मधून बाहेर काढू शकता…पण त्या व्यक्ती मधली आर्मी बाहेर काढणं कधीच शक्य नाही!”
पण या अद्भुत दुनियेबद्दल ,आपल्या सैन्याच्या अंतरंगाबद्दल बऱ्याच civilians ना खूप कमी माहिती असते. आणि मोस्टली जी थोडीफार माहिती आहे ती दुर्दैवानी चुकीची असते. याचं मुख्य कारण आहे बॉलीवूड मधले चित्रपट आणि टीव्ही वरच्या काही सिरिअल्स. मी जेव्हा लग्नानंतर पहिल्यांदा सुट्टीमधे घरी आले होते तेव्हा माझ्या सासरच्या आणि माहेरच्या नातेवाईकांनी मला बरेच प्रश्न विचारले, त्यांच्या काही शंका बोलून दाखवल्या…त्यातले काही कॉमन प्रश्न होते -“आता तुला काहीच काम करावं लागत नसेल ना? तुझ्या हाताखाली तर किती नोकर असणार.मजा आहे; नुसता आराम करायचा!” काही जणांना वाटत होतं की ” आर्मी मधे सैनिक लढतात, काम करतात; पण बायका मात्र फक्त छान छान साड्या नेसून पार्टीज ला जातात.” आम्हांला कधी कधी किती प्रतिकूल परिस्थितीत राहावं लागतं हे कोणालाच दिसत नाही. स्वतःचं घर आणि मुलं सांभाळत असताना आमच्या आर्मी च्या जबाबदाऱ्या पण आम्ही तेवढ्याच समर्थपणे पार पाडत असतो – आणि तेही स्वतःच्या हिमतीवर …. आणि ‘आमच्या हाताखाली नोकर चाकर असतात’ हा लोकांचा निव्वळ गोड गैरसमज आहे. पण कोणाकोणाला आणि किती वेळा स्पष्टीकरण देत राहणार? म्हणतात ना- जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे !!
एका मित्रानी विचारलं,”तुम्हाला तर दारू फ्री मिळते तरी नितीन कसा नाही पीत ?” त्या मित्राची तर मी अक्षरशः समोर बसवून शाळा घेतली. त्याला म्हणाले, “firstly , दारू प्यायला मिळेल म्हणून त्यानी आर्मी जॉईन नाही केली. आणि secondly दारू फ्री नसते..स्वस्त असते.”
हा एक मोठा गैरसमज असतो लोकांचा- की तुम्हाला सगळं फ्री मिळतं. पण तसं अजिबात नाहीये. कोणी म्हणतात, तुम्हाला csd canteen, मिलिटरी हॉस्पिटल च्या सुविधा असतात. मजा आहे तुमची.
या सुविधा असतात हे मान्य आहे, पण सिविलीयन्स ना पण कोणत्या ना कोणत्या रुपात सुविधा मिळतच असतात- कोणाला sodexo कुपन्स तर कोणाला फ्री हेल्थ चेक अप्स….कोणाला HRA तर कोणाला chauffeur driven car !!
पण काही लोकांना सवय असते- आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून !!
अशा मनोवृत्ती च्या लोकांना माझा एकच प्रश्न असतो- “आम्हांला ज्या सुख सुविधा मिळतात त्या सगळ्या जर तुम्हाला दिल्या तर तुम्ही पण देशासाठी प्राण द्यायला तयार होणार का?”
पण ही जाणीव खूप कमी लोकांना असते. जेव्हा एखादा पुलवामा किंवा बालाकोट घडतो किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा सगळीकडे सैनिकांच्या कौतुकाची, त्यांच्या बलिदानाबद्दल भरभरून बोलण्याची जणूकाही चढाओढ लागते. पण तेरड्याचा रंग तीन दिवस…. हळूहळू या सगळ्याचं विस्मरण होतं. ट्रेन मधे reservation नसल्यामुळे vestibule मधे बसून प्रवास करणारे सैनिक दिसायला लागतात. एखादा सुट्टीवर निघालेला सैनिक आपलं सामान सांभाळत रस्त्याच्या कडेला उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्यांकडे लिफ्ट मागताना दिसतो…पण दुर्दैवानी त्यावेळी कोणाचंही तिकडे लक्ष जात नाही.
मी हे नाही म्हणत की देशातल्या प्रत्येकानी मिलिटरी सर्विसेस जॉईन करावी. आपल्या देशाच्या उन्नतीसाठी सैनिकांबरोबरच डॉक्टर्स, engineers, शिक्षक , वकील, politicians, scientists, businessmen या आणि अशा अनेक professionals ची गरज आहे. ज्याला जे काम आवडेल त्यानी ते करावं.. फक्त एकच अपेक्षा आहे- आपलं काम प्रामाणिकपणे करावं. कॅन्टोन्मेंट च्या रस्त्यावरून जाताना एका भिंतीवर एक वाक्य लिहिलेलं वाचलं होतं –
Want to do something for a soldier? Be an Indian who is worth fighting for.